कोकणात उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
वाशिष्टी नदीतील गाळ, बेटे काढण्याचे काम तीन टप्प्यात करण्याचे; एकाचवेळी अनेक ठिकाणी गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करणे, नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी आवश्यक यांत्रिकी विभागाची यंत्रणा उभारणे; मोठ्या मशिनरी खरेदी प्रक्रिया सुरु करण्याचे जलसंपदा विभागाला निर्देश देणे, नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी आवश्यक निधी देणे; जलसंपदा विभागाला तातडीने वर्ग करण्याच्या सूचना देणे, आदी निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
कोकणातील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठल्यामुळे त्यांची वहनक्षमता कमी झाली आहे. अतिवृष्टीमुळे होणाऱ्या पूरस्थितीचा फटका नदीकाठावरील गावांना, शहरांतील नागरी वस्त्यांना वारंवार बसत आहे. नदीकाठच्या शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. महाड, चिपळूण, संगमेश्वरसह कोकण विभागात अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे नदीकाठच्या शहरांचे, गावांचे दरवर्षी होणारे नुकसान टाळण्यासाठी कोकणातील नदीपात्रातील गाळ, बेटे काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्याचे निर्देशही अजित पवार यांनी यावेळी दिले.
कोकणातील नदीकाठच्या शहरातील पूरस्थितीसंबंधात उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, ऊर्जामंत्री नितीन राऊत, सिंधुदूर्गचे पालकमंत्री उदय सामंत, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार शेखर निकम, चिपळूण बचाव समितीचे प्रतिनिधी राजेश वाजे, शाहनवाज शाह आदी यावेळी उपस्थित होते.

