Thursday, September 19, 2024
Homeमाय व्हॉईसजिल्हा बँकांचे धनी...

जिल्हा बँकांचे धनी आणि भावी राजकारणाची दिशा!

कोरोनाचे जे अनेक दुष्परिणाम झाले त्यात विविध निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या हाही एक परिणाम होता. राज्य शासनाने 2020मध्ये मुदती संपलेल्या सर्वच सहकारी बँकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक-एक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. या सर्व बँकांची आर्थिक स्थिती फार सुस्थितीची नाही. अनेक बँका या परत न येणाऱ्या कर्जांच्या ओझ्याखाली वाकलेल्या आहेत. अनेक बँकांवर विविध प्रकारच्या राज्य शासनाच्या चौकशा व तपासण्याही सुरुच आहेत. पण तरीही जिल्ह्याच्या अर्थकारणात या बँकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते.

कृषी व ग्रामीण जीवनाशी निगडित अशा अर्थकारणाबाबतीत बँकांची भूमिका महत्त्वाची असते. कृषी कर्जांचे वाटप असेल वा बी-बियाण्यांसाटी पतपुरवठा असेल अथवा अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ अशा संकटांवेळी राज्य सरकार ज्या मदती शेतकऱ्यांसाठी पाठवते त्यांचे वितरण यात बँकांची भूमिका महत्त्वाची ठरते. केंद्र व राज्य शासनाकडून ज्या कृषीकर्जांची माफी दिली जाते त्यातही जिल्हा बँकेकडून गेलेल्या खातेदारांच्या याद्यांवरच पैसे वितरित होत असतात. कृषी पतपुरवठ्याची साखळी जिल्हा बँकांपासूनच सुरू होते. त्याखाली मग विविध पतसंस्थांचे जाळे काम करत असते. सर्वसाधारण कष्टकरी व शेतकरी हे या बँकांचे थेट सदस्य जरी नसले तरी पतसंस्थांच्या माध्यमांतून त्यांचे या बँकांशी नाते असते. अशा सोळा जिल्हा बँकांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. त्या टप्या-टप्प्याने पार पडत आहेत.

काही बँकांच्या निवडणुका कोरोना काळातही न्यायालयीन आदेशांमुळे घेतल्या गेल्या. त्या बँकांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झालेली असताना राज्य शासनाने निवडणुका थांबवण्याचे आदेश दिले. त्याविरोधात कुठे, कुठे लोक न्यायालयात गेले. उच्च व सर्वोच्च न्यायालयांनी दिलेल्या निकालांमुळे याआधीच यवतमाळ, अकोला, गडचिरोली, नांदेड, बीड, परभणी औरंगाबाद अहमदनगर व ठाणे जिल्हा बँकांच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. अलिकडेच रत्नागिरी, सांगली, सातारा, जळगाव व धुळे नंदुरबार या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका पार पडल्या. याशिवाय पुणे, लातूर, मुंबई, नागपूर सोलापूर अशा बँकांच्या निवडणुका पुढच्या काळात पार पडणारच आहेत.

सध्या लागलेले बँकांचे निकाल त्या-त्या जिल्ह्यातील बदलत्या राजकराणाचेही द्योतक ठरतात. शिवाय जिल्ह्यांच्या अर्थकारणाच्या चाव्या कोणा नेत्याच्या हातात राहणार हेही यातून स्पष्ट होते. सातारा व जळगाव जिल्हा बँकांच्या निवडणुका यादृष्टीने लक्षणीय ठरल्या आहेत. जळगावात एकनाथ खडसे भाजपातून अलिकडेच राष्ट्रवादीत गेले. त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची होती. त्यांना भाजपाच्या ताब्यातून बँक हिसकावून घ्यायची होती. मुळात खडसेंमुळेच ही बँक भाजपाकडे गेली होती. त्यांनी बाजू बदलताच तिथे राष्ट्रवादीची ताकद दिसून आली. पण हे तसे सोपे झाले नाही. इथे लढतच झाली नाही म्हटले तरी चालेल. भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन, खासदार उमेश पाटील तसेच भाजपाचे अन्य आमदार या निवडणुकीत आपल्या पक्षाचे संचालक निवडून यावेत यासाठी तयारी करत होते. शिवसेना व काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जागावाटपाची बोलणी सुरू होती. पण आधी ठरलेल्या भाजपाच्या जागांवरही खडसेंनी उमेदवारी दाखल केल्यानंतर भाजपाने या निवडणुकीतून निषेध म्हणून माघार घेऊन टाकली. परिणामी तिथे सध्या महाविकास आघाडीचे संचालक बसणार आहेत.

ही अशी सर्वपक्षीय मांडणी करून बँकेच्या निवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा अनेक जिल्ह्यात चालवली जाते. पण काही ठिकाणी निवडणुकाही अटळ होतात व त्यात कटुता वाढते. सातारा जिल्ह्यात अकरा संचालकांच्या जागा बिनविरोध झाल्या. पण अन्य दहा जागी निवडणूक झाली व ती अटीतटीची ठरली. बिनविरोध जागांवर रामराजे नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, राजेंद्र राजपुरे आणि शिवरुपराजे खर्डेकर आदी आधीच विजयी झाले. सहकार मंत्री राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील यांना निवडणूक लढवावी लागली व ती जिंकण्यासाठी त्यांना भाजपाची मदत घ्यावी लागली. या मदतीमुळे ते काँग्रेसचे माजी मंत्री दिवंगत विलासकाका उंडाळकर यांच्या चिरंजीवांचा, उदयसिंह यांचा आठ मतांनी पराभव करू शकले.

शेजारच्या पाटण प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघामधून सत्यजितसिंह पाटणकर 58 मते मिळवून विजयी तर शिवसेनेचे नेते व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई मात्र 44 मते घेऊन येथून पराभूत झाले. जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघात आमदार, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना 24 मते पडली तर राष्ट्रवादीचेच बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे 25 मते घेऊन विजयी झाले. या मतदारसंघात एक मत बाद झाले. ते जरी शिंदेंना पडले असते तरी मतांची बरोबरी झाली असती व थेट पराभवाची नामुष्की टळली असती. त्या पराभवाने चिडलेल्या शिंदे समर्थकांनी थेट आपल्याच पक्षाच्या साताऱ्यातील मुख्यालयावर दगडफेक केल्यामुळे शिंदेंच्या पराभवाची अधिकच वाच्च्यता झाली. या दगडफेकप्रकरणी शशिकांत शिंदे यांनी पक्षनेत्यांची जाहीर माफी मागितली खरी पण कटुता संपलेली नाही. त्याचा फटका राष्ट्रवादीला पुढेही पडणारच आहे.

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रभाव पाहायला मिळाला. विकास सोसायटी गटात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सहकार विकास पॅनेलने सातपैकी सहा जागा जिंकत हुकूमत राखली आहे. मात्र जतमध्ये काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. तेथे भाजप आणि राष्ट्रवादीची जुनी मैत्री काँग्रेसला भारी ठरली आहे. यापूर्वी महाविकास आघाडीतून शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक तर काँग्रेसचे महेंद्र लाड बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता एकूण संख्याबळात राष्ट्रवादीला सर्वाधिक ९, काँग्रेस ५, भाजप ४, शिवसेना ३ असा निकाल लागला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर, शिवसेना नेते नामदार उदय सामंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्त्वाखाली सहकार पॅनलने वर्चस्व निर्माण केले. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत निलेश राणे यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला. एकूण २१ जागांपैकी दणदणीत १८ जागांवर उदय सामंत आणि तानाजी चौरगे यांच्या सहकार पॅनेलचे उमेदवार निवडून आले. निलेश राणे यांच्या समर्थकांना अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. धुळे नंदुरबार जिल्हा बँक निवडणुकीच्या चाव्या अमरिश पटेल, राजवर्धन कदमबांडेंकडेच राहणार हे तिथल्या निकालाने स्पष्ट झाले आहे! धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांचा पराभव झाला आहे. तर काँग्रेसचे राज्यातील मंत्री आणि नंदूरबारचे पालकमंत्री के सी पाडवी यांच्या अक्राणी मतदार संघातून शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांनी सेनेच्या दोन सदस्यांना निवडून आणल्याने मंत्री पाडवींनाही हा जोरदार धक्का मानला जात आहे. या जिल्हा बँक निवडणुकीत सर्वसमावेशक शेतकरी पॅनलचे 13 सदस्य निवडून आल्यामुळे बँकेवर पुन्हा एकदा भाजपा नेते अमरिश पटेल आणि जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांचेच वर्चस्व कायम राहिले आहे. जिल्ह्याचे पुढचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार याची ही चाहूल आहे.

Continue reading

विरोधकांसाठी आजही ‘दिल्ली बहोत दूर है’!

दिल्लीत गेली बारा वर्षे आम आदमी पक्षाचेच राज्य आहे. अरविंद केजरीवाल या पक्षाचे संयोजक व सर्वोच्च नेते असून तेच दिल्लीच्या गादीवर राज्य करत आहेत. सरत्या सप्ताहात त्यांनी दीर्घकाळ गाजवलेले मुख्यमंत्रीपद सोडण्याची घोषणा केली. त्यामुळे सहाजिकच राजधानीच्या राजकारणात मोठीच खळबळ...

अमेरिकेत कोण ठरणार भारी? कमला हॅरीस की डोनाल्ड ट्रंप??

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा लोकसंख्येच्या मानाने आपल्यापेक्षा कितीतरी लहान पण भौगोलिक आकारात आपल्यापेक्षा किती तरी मोठा देश आहे. त्याचवेळी जगातील सर्वात श्रीमंत देशही अमेरिकाच ठरतो. त्यांच्या अर्थव्यवस्थेचा आकार आपल्यापेक्षा दशपटींनी अधिक भरतो. आपण जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठी...

25 वर्षांपूर्वी मसूदने केलेल्या भारतीय विमान अपहरणामागचे वास्तव!

आयसी 814 विमानाच्या अपहरणाला पंचवीस वर्षे उलटून गेल्यानंतर आता त्या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. विविध भारतीय गुप्तचर यंत्रणांतील माजी प्रमुख अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणात आपल्याकडून काय काय चुका झाल्या, याचे पाढेही वाचायला सुरूवात केली आहे. या चर्चेचे निमित्त...
error: Content is protected !!
Skip to content