Thursday, September 19, 2024
Homeमाय व्हॉईसदंगलीसारख्या हिंसक घटनांचा...

दंगलीसारख्या हिंसक घटनांचा संबंध अनेकदा शुक्रवारशीच!

त्रिपुरा येथे अल्पसंख्याकांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. अशा हिंसक घटनांचा संबंध अनेकदा शुक्रवारशीच असतो. वाहने आणि दुकानांवर दगडफेक करण्यात आली. अनेक पोलीस कर्मचारी अधिकारी जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी लाठीमारही केला गेला. विशेषतः मालेगाव आणि अमरावती या दोन शहरात दंगली पेटल्या. त्याचे पडसाद पुहा दुसऱ्या दिवशीही उमटले.

शुक्रवारी मुस्लीम संघटनांनी मोर्चा कढला तर शनिवारी भाजपा व परिवारातील संघटनांनी बंद पुकराला होता. त्यामुळे अमरावतीत सलग दुसऱ्या दिवशीही तणाव व दंगलसदृश्य स्थिती होती. अमरावती, मालेगावप्रमाणेच नांदेड येथेही शुक्रवारी बंद-मोर्चादरम्यान समाजकंटकांनी दगडफेक आणि तोडफोड केली. नांदेड येथे पोलिसांनी प्लास्टिक गोळ्या झाडल्यानंतर हिंसक जमाव पांगला.  अमरावती येथे मोर्चादरम्यान काही दुकानांवर दगडफेक करण्यात आली. मुंब्रा शहरातही बंद पाळण्यात आला.

हे सारे लोण महाराष्ट्रात आले ते त्रिपुरातील घटनांची प्रतिक्रिया म्हणून. आणि त्रिपुरातील तणावाची सुरुवात झाली ती बांगला देशात घडलेल्या घटनांमधून. ही एक साखळीच तयार झालेली आहे. दूरदेशात कुठेतरी काहीतरी घटना घडवली जाते वा तसे काही घडल्याचे भासवले जाते. व्हॉट्सॅप नावाचा भस्मासूर त्या अफवा, खोटी माहिती व तणावपूर्ण चित्रे जगाच्या काना-कोपऱ्यात पोहोचवून देतो आणि मग माथी भडकलेले तरूण दगड आणि जुन्या ट्यूबलाईटी हातात घेऊन रस्त्यात उतरतात. दोन धर्मात तणाव निर्माण करण्याचा हा कार्यक्रम गेली काही वर्षे अत्यंत पद्धतशीरपणाने चालवला जातो आहे.

भारतातील विविध राज्यांमध्ये दंगलीच्या स्थितीत एक नाव हमखास पुढे येते, अन् ते आहे रझा अकादमीचे. स्वातंत्र्यपूर्व काळातली मुस्लीम विचारवंत लेखक, धर्मगुरू इमाम-इ-अहमद रझाखान कादरी यांचे लिखाण व विचारांचा प्रसार-प्रचार करण्यासाठी मुंबईत 1978मध्ये या संस्थेची स्थापना झाली. त्यांनी इस्लामी साहित्याच्या प्रसाराबरोबरच इस्लामचा आक्रमकपणाही पसरवण्याचे काम केले आहे. मुंबईत भिवंडीत 2006मध्ये झालेल्या दंगलींमागे याच रझा अकादमीचा हात व संघटन होते. भिवंडीत पोलीसठाण्याच्या जागेवरून दोन पोलिसांना ठार केले गेले होते. म्यानमारमध्ये झालेल्या अशाच कथित मुस्लीम अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत रझा अकादमीने आयोजित केलेल्या भव्य मोर्चा व सभेनंतर 2012मध्ये थेट पोलिसांवरच हल्ले झाले होते आणि त्यातही महिला पोलीस शिपायांना अपमानित केले गेले होते.

याच रझा अकादमीने परवा राज्यात सर्वत्र त्रिपुरातील कथित प्रकारांच्या निषेधार्थ मोर्चे काढण्याचे आवाहन केले होते. त्रिपुरात मुस्लीम समाजावर हल्ले झाले व एक मशीद जाळली गेली अशा बातम्या, फोटो समाजमाध्यमांतून पसरवले गेले होते. त्रिपुरा सरकारने वारंवार खुलासे केले आहेत की मशीद तोडली वा जाळली गेलीच नाही. त्या सुस्थितीत असणाऱ्या मशिदीचे ताजे फोटोही त्रिपुरा सरकारच्यावतीने जारी केले गेले आहेत. तरीही शुक्रवारचे मोर्चे त्या न घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ काढले गेले व त्यात हिंसाचार घडवला गेला. या हिंसाचाराची जबाबदारी आता पुन्हा रझा अकादमीच्या नेत्यांना घ्यावीच लागेल. मागे 2012च्या दंगलीची नुकसानभरपाई म्हणून राज्य सरकारने व पोलिसांनी रझा अकादमीवर तीन करोड रुपयांचा दंड लावला होता. ती रक्कम प्रत्यक्षात वसूल झाली की नाही याचाही शोध राज्य सरकारने व पोलिसांनी यानिमित्ताने घ्यायला हवा.

त्रिपुराच्या आधी बांगला देशात दुर्गापूजेच्या निमित्ताने हिंदुंना मारण्याचे, धमकावण्याचे सत्र सुरू झाले. त्याचीही सुरुवात अशीच कथित कुराण अपमानाच्या घटनेने झाली. एका दुर्गामूर्तीच्या पायाशी कुराण ठेवले आहे असे फोटो व्हायरल झाले. ते खरे होते की खोटे, की कुणीतरी मुद्दाम पवित्र धर्मग्रंथ ठेवून फोटो काढले व पसरवले याचा शोध बांगला देशी पोलिसांनी घेतला व त्या कथित उचापतखोराला बेड्याही ठोकल्या. पण त्याचे आग लावण्याचे काम करून झालेलेच होते. कुराण देवीच्या पायाशी, या फोटोनंतर ऑक्टोबर अखेरीपासून बांगला देशात अनेक हिंदुंचे शिरकाण झाले. हिंदुंची दुकाने घरे जाळली गेली. अनेकांना जखमी केले गेले. याही नुकसानीचे आकडे फुगवून सांगितले गेले व त्याहीबाबतीत अनेक अफवा पसरवल्या गेल्या असा दावा बंगला देश सरकारने केला आहे. पण जवळपास आठवडाभर हा घटनाक्रम सुरू राहिला. बांगला देशामध्ये अनेकांनी या धार्मिक हिंसाचाराविरोधात भूमिका घेतली.

बांगलादेशातील हिंसाचाराच्या घटनांनंतर २१ ऑक्टोबरला त्रिपुरात काही धार्मिक संघटनांनी मोर्चे काढले. अनेक गावांत, शहरांत असे मोर्चे निघाले. यातील काहींची अखेर पोलिसांबरोबर झालेल्या संघर्षातच झाली. त्रिपुरात झालेल्या हल्ल्यांविरोधात महाराष्ट्रातील अमरावतीत मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चादरम्यान काही समाजकंटकांनी हिंसा केल्यानं तणाव निर्माण झाला. या विरोधात भाजपाने शनिवारी अमरावती बंदची हाक दिली. मात्र, त्यातही काही समाजकंटकांनी हिंसाचार केला. यामुळे एकूणच महाराष्ट्रात शांतताभंग झाला आहे.

पोलिसांनीदेखील लाठीचार्ज करत परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण शुक्रवारच्या मुस्लीम संघटनांच्या मोर्चात जेव्हा दुकाने तुटत होती तेव्हा पोलिसांची कृती दिसली नाही आणि शनिवारी मात्र लाठ्या जोरात फिरल्या असे आरोप भाजपाने केले आहेत. ज्या शुक्रवारी महाराष्ट्रात रझा अकादमीच्या पुढाकाराने व अनेक संघटनांच्या पाठिंब्याने मोर्चे निघाले त्याचदिवशी त्रिपुराचे माहिती आणि सांस्कृतिक मंत्री सुशांत चौधरी यांनी शुक्रवारी त्रिपुरात कोणत्याही मशिदीवर हल्ला झाला नसल्याचे स्पष्ट केले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केले की, त्रिपुरात जे घडलेच नाही त्याचे संदर्भ घेत महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचे काम केले जात आहे आणि यामागे महाविकास आघाडीतील नेतेच आहेत.

अमरावतीचा गेल्या काही दशकांचा इतिहास पडताळून पाहिला तर जातीय-धार्मिक दंगलींचा एकही संदर्भ सापडत नाही. पण, शनिवारी शहरात थेट दंगलसदृश्यच स्थिती निर्माण झाली होती. भाजपच्या ‘बंद’ला व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे साहजिकच मुख्य बाजारपेठ बंद होती. पण, दंगलखोरांनी विशिष्ट समुदायातील दुकानदारांना लक्ष्य केले. बंद दुकानांची तोडफोड, जाळपोळ केली आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत गेल्या. कालपर्यंत भाजपचे स्थानिक नेते कायदा व सुव्यवस्था बिघडत चालल्याचा आरोप करीत होते. पण, प्रत्यक्षात भाजपच्याच आंदोलनात ही व्यवस्था पायदळी तुडवली गेल्याचे चित्र दिसले.

अमरावती महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या भागात भाजपाची मतसंख्या कमी होत आहे. त्यामुळेच दंगलीच्या माध्यमातून मतांचे ध्रुवीकरण भाजपाला करायचे आहे असा स्पष्ट आरोप काँग्रेसचे नेते करत आहेत. याउलट भाजपाने राष्ट्रीय स्तरावरही काँग्रेसवर ठपका ठेवला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वर्धा येथे सेवाग्राममध्ये सुरू असणाऱ्या काँग्रेसच्या शिबिरात ऑनलाईन भाषण करताना हिंदुत्ववादावर आगपाखड केली. त्यातूनच अमरावतीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी दंगली केल्याचा भाजपाचा आरोप आहे. इकडे  सेना नेते संजय राऊत यांनी कमाल केली. ते म्हणाले की, रझा अकादमी हे मुळात भाजपाचेच पिल्लू आहे. त्यांना हाताशी धरून राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचे काम केले जात आहे. त्याचा फायदा घेऊन केंद्र सरकारला मविआ सरकारवर बरखास्तीची कारवाई करता यावी असे हे सारे कट व कारस्थान आहेत!

Continue reading

विरोधकांसाठी आजही ‘दिल्ली बहोत दूर है’!

दिल्लीत गेली बारा वर्षे आम आदमी पक्षाचेच राज्य आहे. अरविंद केजरीवाल या पक्षाचे संयोजक व सर्वोच्च नेते असून तेच दिल्लीच्या गादीवर राज्य करत आहेत. सरत्या सप्ताहात त्यांनी दीर्घकाळ गाजवलेले मुख्यमंत्रीपद सोडण्याची घोषणा केली. त्यामुळे सहाजिकच राजधानीच्या राजकारणात मोठीच खळबळ...

अमेरिकेत कोण ठरणार भारी? कमला हॅरीस की डोनाल्ड ट्रंप??

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा लोकसंख्येच्या मानाने आपल्यापेक्षा कितीतरी लहान पण भौगोलिक आकारात आपल्यापेक्षा किती तरी मोठा देश आहे. त्याचवेळी जगातील सर्वात श्रीमंत देशही अमेरिकाच ठरतो. त्यांच्या अर्थव्यवस्थेचा आकार आपल्यापेक्षा दशपटींनी अधिक भरतो. आपण जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठी...

25 वर्षांपूर्वी मसूदने केलेल्या भारतीय विमान अपहरणामागचे वास्तव!

आयसी 814 विमानाच्या अपहरणाला पंचवीस वर्षे उलटून गेल्यानंतर आता त्या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. विविध भारतीय गुप्तचर यंत्रणांतील माजी प्रमुख अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणात आपल्याकडून काय काय चुका झाल्या, याचे पाढेही वाचायला सुरूवात केली आहे. या चर्चेचे निमित्त...
error: Content is protected !!
Skip to content