पहिल्यांदा या आत्महत्त्या थांबवा. आत्महत्त्या करणाऱ्या मानसिकतेचे मी नेतृत्त्व करत नाही, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्त्येच्या विचारांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.
गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असणाऱ्या एसटी संपातल्या कर्मचाऱ्यांच्या काही प्रतिनिधींनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडत त्यांना या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली. हताश झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी अगदी पाया पडतो, पण हा प्रश्न सोडावा अशी विनंती केल्याचे कळते. तेव्हा राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्त्येकडे या कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले. कोणीही आत्महत्त्या करून पळपुटेपणाचा मार्ग चोखाळता कामा नये. निश्चयाने, निर्धाराने एसटी कर्मचाऱ्यांनी आपला लढा लढला पाहिजे, अशा आशयाच्या भावना व्यक्त करत राज ठाकरे यांनी त्यांना आत्महत्त्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्त्या करणाऱ्या मानसिकतेचे मी नेतृत्त्व करत नाही, असे ते म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या माध्यमातून जवळजवळ दोन हजार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यांचा संपकाळातील पगार कापण्याचाही इशारा दिला आहे. सेवेतून बडतर्फ करण्याच्या कारवाईच्या दृष्टीनेही हालचाली चालवल्या आहेत. अशा स्थितीत राज ठाकरे यांनी यात कर्मचाऱ्यांच्या बाजून मध्यस्थी करावी, अशी विनंती या कर्मचाऱ्यांनी केल्याचे कळते.
आम्ही महाराष्ट्राची, येथील जनतेची अहोरात्र सेवा करतो. पण दरवेळी आमच्या पगाराच्या वेळेस महामंडळाकडे म्हणजेच सरकारकडे पैसे नसतात. आता १२ दिवसांच्या संपानंतर विलीनीकरण समिती स्थापन झाली. ही समिती आपला अहवाल आमच्या बाजूनेच देईल, याची शाश्वती नाही. पूर्वीही अशीच एक समिती नेमली होती. तिच्या अहवालाचे काय झाले हे कोणालाही ठाऊक नाही. हिवाळी अधिवेशनामध्ये प्रस्ताव मांडा आणि अर्थसंकल्पात तरतूद करा. तेव्हाच हा प्रश्न मार्गी लागू शकतो, असेही हे कर्मचारी म्हणाल्याचे समजते.
यंदा आमच्या घरी दिवाळी साजरी झाली नाही. संपूर्ण महाराष्ट्र दिवाळी साजरी करत असताना आम्ही मात्र दारात बसून होतो. आता हा प्रश्न फक्त तुम्हीच सोडवू शकता. विलीनीकरण कधी करायचे ते करा, पण आयोग लागू करा, असेही ते म्हणाल्याचे कळते.
यावेळी राज ठाकरे यांनी सुरुवातीलाच आत्महत्त्या न करण्याची अट समोर ठेवली. राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्त्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आधी आत्महत्त्या थांबवा ही माझी अट असेल, असे त्यांनी सांगितल्याचे समजते.
या भेटीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. एसटी कर्मचारी संघटनेचे लोक राज ठाकरे यांना भेटले. त्यांच्या २८ संघटनांना बाजूला ठेवून हे एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत असे त्यांनी सांगितले. एसटी महामंडळाचे शासकीय सेवेत विलीनीकरण करावे अशी त्यांची मुख्य मागणी आहे. सरकारची भावना प्रामाणिक असेल तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा सातवा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करावा. तसे झाले तर ते महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे ते म्हणाले. मनसे सरकारशी यावर लवकरच बोलणार आहे. स्वतः राज ठाकरे या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालतील. सरकारशी बोलणे झाले की मग कर्मचाऱ्यांशी बोलेन असे राज ठाकरे म्हणाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्त्या करू नये अशी विनंतीही त्यांनी केली असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.

