नोटबंदीनंतर पकडण्यात आलेल्या १४ कोटी ५६ लाखांच्या बोगस नोटांचे प्रकरण दाबून टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.
बीकेसीमध्ये ८ ऑक्टोबरच्या छापेमारीत १४ कोटी ५६ लाख पकडण्यात आले. मुंबईत एकाला अटक झाली. एकाला पुण्यात अटक करण्यात आली. त्यामध्ये इम्रान आलम शेख, रियाज शेख यांची अटक झाली. नवी मुंबईमध्येही कारवाई झाली. पंरतु १४ कोटी ५६ लाख बोगस नोटांऐवजी ८ लाख ८० हजार रुपये दाखवून प्रकरण दाबण्यात आले. प्रकरण दाखल होते आणि काही दिवसांतच आरोपींना जामीन मिळतो. हे प्रकरण एनआयएकडे दिले जात नाही. या नोटा कुठून आल्या, याची अंतिम चौकशी झाली नाही. कारण, जे बोगस नोटांचे रॅकेट चालवत होते, त्यांना तत्कालिन सरकारचे संरक्षण होते, असा आरोप त्यांनी केला.
त्यासाठी गोष्ट रचण्यात आली की, तो काँग्रेसचा नेता आहे. तो कधीच काँग्रेसचा नेता नव्हता. इम्रान अली शेख याचा छोटा भाऊ हाजी अरफात शेख याला अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष बनविण्यात आले. हाजी अरफात शेख याला देवेंद्रजींनी पक्षात घेऊन त्याला अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी बसवले. देवेंद्रजी, तुम्ही मुन्ना यादवसारख्या कुख्यात गुंडाला अध्यक्ष बनवता. हैदर आलमला मौलाना आझाद महामंडळाचा अध्यक्ष बनवता, जो बांग्लादेशींना वास्तव्य देतो, असे ते म्हणाले.
मी २००५ साली मंत्री नव्हतो. आरआर पाटील यांच्यासोबत त्यावेळी फोटो व्हायरल झाले होते. त्यावेळी हा प्रश्न उपस्थित केला गेला. आम्ही मुनिरा यांच्याकडून संपत्ती घेतल्यानंतर सलीम पटेल यांचा तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. सलीम पटेल यांनी वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांमध्ये दाऊद कनेक्शन असल्याचे सांगितले होते. त्यावर न्यायालयात खटला दाखल झाला. पाच महिन्यांपूर्वी सलीम पटेल यांचे निधन झाले. सलीम पटेलने मुनिरा यांचे मुखत्यारपत्र घेतले होते. सरदार वली खानबाबत २००५मध्ये संशयित नव्हता. तो तेथील वॉचमनचा मुलगा होता. याच जागेपासून ३०० मीटरवर त्याने स्वतःचे नाव लावले होते. त्यावेळी ती जागा घेण्यासाठी पैसे दिले, हे सत्य आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
रियाज भाटी कोण आहे, याचे उत्तर देवेंद्र फडणवीस तुम्ही द्या. २९ ऑक्टोबर रोजी सहार विमानतळावर रियाज भाटी बोगस पासपोर्ट प्रकरणात पकडला गेला. त्याचे दाऊद इब्राहीम गँगसोबत संबंध आहेत. त्यावेळी संपूर्ण शहराला माहीत होते रियाज भाटी कोण आहे. त्याला डबल पासपोर्ट प्रकरणात अटक होते आणि दोन दिवसात सुटतो. यामागे काय खेळ आहे, अशी विचारणाही त्यांनी केली.

