Details
काका-पुतणे!
01-Jul-2019
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतरावजी चव्हाण आणि त्यांच्या पत्नी वेणूताई चव्हाण यांना मूलबाळ नव्हते. या उभयतांनी आपल्या पुतण्यांवर मुलांप्रमाणे प्रेम केले. त्या पुतण्यांनीदेखील आपल्या काका-काकींना मुलाबाळांची उणीव कधी भासू दिली नाही. यशवंतराव हे त्या काळातील शक्तीमान नेते होते. महाराष्ट्रातील सत्तेचे राजकारण हे त्यांच्या इशाऱ्यावर चालत होते. पण यशवंतरावजींनी कधीही आपल्या प्रिय पुतण्यांना राजकारणात आणले नाही. त्यांना आमदारकी अथवा खासदारकी दिली नाही. यशवंतराव मुंबईत आले की, आपला पुतण्या अशोक चव्हाण यांच्या मंत्रालयाजवळील `रिवेरा’ या इमारतीतील निवासस्थानी उतरत. या अशोकराव चव्हाणांना राजकारणात रस होता. त्यांना निवडणूक लढवायची होती. पण यशवंतराव हयात असेपर्यंत त्यांनी आपल्या या प्रिय पुतण्याची इच्छा कधीच पूर्ण केली नाही. त्यांनी आपला मानसपुत्र म्हणून शरद पवार यांची निवड केली. सत्तेच्या राजकारणात बारामतीच्या एका राजबिंड्या तरुणाला संधी दिली. यशवंतरावांनी आपल्या नात्यातील कोणालाही राजकारणात आणले नाही. त्यांनी गुणवत्ता पाहून उमेदवार निवडले. त्यापैकी शरद पवार आणि प्रतिभा पाटील ही उत्तम उदाहरणे आहेत. सारांश, मुख्यमंत्रीपदापासून केंद्रीय मंत्रीपदापर्यंत सत्तेत दीर्घकाळ राहूनदेखील यशवंतरावांनी आपल्या पुतण्यांना राजकारणात आणले नाही. परिणामी, त्यांना कधीही, पुतण्यांमुळे, मनस्ताप सहन करावा लागला नाही. त्यांच्या घरात आमदारकी-खासदारकीसाठी कधी भांडणे झाली नाहीत.
गेल्या काही वर्षांत मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज काका-पुतण्यांच्या संबंधांनी वेळोवेळी कडवट वळणे घेतली आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांना अत्यंत तरुण वयात राजकारणात आणले. त्यांच्यावर भारतीय विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली. स्वत:ला एक सोडून तीन मुले असतानाही बाळासाहेबांनी आपला राजकीय वारस म्हणून राज ठाकरे यांची निवड केली. मात्र उद्धव ठाकरे यांचा राजकीय क्षितीजावर उदय होताच ठाकरे घराण्यात वाद सुरू झाले. राज ठाकरे मागे पडले. बाळासाहेबांनी शिवसेनेची सूत्रे चिरंजीव उद्धव यांच्या हाती दिली. त्यानंतर काय घडले, हा इतिहास ताजा आहे.
नव्वदच्या दशकाच्या प्रारंभी शरद पवार हे केंद्रीय मंत्रिमंडळात गेले. त्यांनी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात आपला पुतण्या अजित पवार यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लावली. तोपर्यंत शरदरावांच्या कन्या सुप्रिया यांचा राजकारणात प्रवेश झाला नव्हता. पुढे काही वर्षांनंतर सुप्रिया राजकारणात आल्या. शरदरावांच्या आशीर्वादाने खासदार झाल्या. पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा पक्षाची जबाबदारी शरदरावांनी, लोकसभेतील आघाडी सुप्रिया सुळेंनी आणि महाराष्ट्रातील जबाबदारी अजित पवार यांनी सांभाळायची, असा जणू अलिखीत करार झाला. पण अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि पवार घराण्यात एका नव्या वादाला तोंड फुटले. आपल्या कुटुंबातील तीन-तीन उमेदवारांनी निवडणूक लढवू नये, असे वाटत असलेल्या पवारांनी लोकसभा निवडणुकीतून स्वत: माघार घेतली. त्यामुळे पार्थ पवार यांचा लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. पण दस्तूरखुद्द पवारांना, इच्छा असूनही, निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावे लागले.
गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे ही महाराष्ट्राच्या राजकारणातील काका-पुतण्यांची आणखी एक दिग्गज जोडी. गोपीनाथरावांनी आपल्या या पुतण्याला राजकारणात आणले. त्याला आमदार केले. मात्र पुढे या काका-पुतण्यांचे बिनसले. गोपीनाथराव हयात असतानाच धनंजय मुंडे यांनी काकांचे कट्टर शत्रू शरद पवार यांच्या पक्षात जाणे पसंत केले. शरदरावांनी धनंजयला मोठा वाव देऊन त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे चीज केले. एकेकाळी छगन भुजबळ आणि शिवसेनेच्या इतर आमदारांना फोडल्यामुळे शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात विस्तव जात नव्हता. गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांच्यातील हाडवैर तर उघड होते. आज त्या दोन काकांचे पुतणे अजित पवारांच्या काकांनी `दत्तक’ घेतले आहेत. धनंजय मुंडे राष्ट्रवादीत सुखाने नांदत आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून रुबाबात मिरवत आहेत. त्याचप्रमाणे वाळीत पडलेल्या राज ठाकरे यांना शरद पवार यांनी जवळ केले आहे. काँग्रेसने राज यांच्या मनसेला सोबत घेण्यास विरोध केला आहे. पण शरद पवार मात्र राज यांच्या पक्षाला लोकसभा उमेदवारी देण्याच्या बाबतीत ठाम आहेत. एकेकाळच्या आपल्या दोन राजकीय शत्रूंचे पुतणे शरदरावांनी आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीच्या बळावर आपल्या जवळ ओढले आहेत. पण त्यांच्या स्वत:च्या पुतण्याशी मात्र त्यांचा वाद सुरू आहे. अर्थात हा वाद तसा चव्हाट्यावर आलेला नाही. पण तो लपूनदेखील राहिलेला नाही. विशेषत: अजित पवार यांच्या रोखठोक स्वभावामुळे पवार घराण्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या काय चालले आहे, याबाबतच्या चटकदार बातम्या प्रसारमाध्यमात येत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज काका-पुतण्यांची अशी ही कहाणी आहे.”
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर