Details
kiranhegde17@gmail.com
“राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या देशातल्या एकूण रूग्णसंख्येपैकी ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असतानाच मुंबईतल्या रूग्णसंख्येनेही २२ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनाला रोखण्याच्या उपाययोजनेवर मौन बाळगताना आम्ही इकडे एक हजार खाटांचे, तिकडे दोन हजार खाटांचे तात्पुरते रूग्णालय उभारण्याच्या बाता करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आरोग्यमंत्री रोजेश टोपे आता पुरते तोंडावर आपटण्याच्या स्थितीत येऊन ठेपले आहेत. मुंबईतल्या कोणत्याही प्रकारच्या रूग्णांसाठी आज सरकारी वा खाजगी रूग्णालयात जागा उपलब्ध नाही तर काही सरकारी व निमसरकारी रूग्णालयांमध्ये मृतदेह ठेवण्याचीही पंचाईत झाल्याने प्रशासनापुढे नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे.”
“गेल्या आठवड्यापासून मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत सरासरी १२०० रूग्णांची रोज भर पडत आहे. मुंबई महापालिकेच्या सर्व रूग्णालयांमध्ये तसेच शासनाच्या जे.जे. समुहाच्या रूग्णालयांबरोबरच खाजगी रूग्णालयांमधूनही कोरोनाग्रस्तांवर उपचार केले जात आहेत. परंतु ही सर्व सुविधा अत्यंत तुटपुंजी आहे. मुंबईत बी.के.सी., वरळी, गोरेगाव आदी ठिकाणी तात्पुरती रूग्णालये उभारणाच्या कामाला गती असली तरी उद्या येथे रूग्णांची भरती झाल्यावर तेथे कर्मचारीवर्ग नेमण्यापासून सारीच बोंब आहे. सध्या सुरू असलेल्या सरकारी व निमसरकारी (महापालिकेच्या) रूग्णालयांमध्ये कोणता रूग्ण कोठे दाखल केला जातो हे रूग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनाच कळत नाही इतका भोंगळ कारभार तेथे चालू आहे.”
“शशिकांत महाडिक नावाच्या एका रूग्णाला केवळ रूग्णालयाच्या गलथान कारभारामुळे आपला जीव गमवावा लागला. एका खाटेवर मृतदेह ठेवला असताना बाजूच्या बेडवर रूग्णावर उपचार केले जात असल्याच्या कारणांवरून सायन रूग्णालयाचे डीन डॉ. प्रमोद इंगळे यांची तडकाफडकी बदली करणाऱ्या सरकारने या कृत्यावर मात्र उघड काणाडोळा केला आहे. या रूग्णाची करूण कहाणी फारच चटका लावणारी आहे. 12 मे रोजी संध्याकाळच्या सुमारास पोटात दुखत असल्याच्या तक्रारीमुळे महाडिकांना मुंबईतल्या एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न झाला. तो अयशस्वी ठरला. परिसरातील अनेक खाजगी रूग्णालयांकडून नकार मिळाल्यांनतर, अखेर त्यांना केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वॉर्डमध्ये जागा नसल्याने, 12ची संपूर्ण रात्र त्यांना वॉर्डबाहेर ठेवण्यात आले. दरम्यान, त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह निघाली.”
“13 तारखेला त्यांना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या बाजूला एक कोरानाबाधित रूग्ण होता. महाडिकांबरोबर असलेल्या लोकांनी तसेच परिवारातल्या सदस्यांनी यावर आक्षेप घेत, त्या रूग्णाला तेथून हलविण्याची वारंवार विनंती केली. मात्र, रूग्णालयाच्या प्रशासनाने त्यांची दखल घेतली नाही. महाडिकांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. कसेबसे दोन दिवस निघाले, शेवटी त्यांनी अखेरचा श्वा्स घेतला. त्यावेळी पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली तर ती पॉझिटिव्ह आली. याचा अर्थ महाडिकांना रूग्णालयात कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग झाला होता.”
आपल्या घरातल्या कर्त्या पुरूषाचे निधन झाल्यामुळे विमनस्क अवस्थेत असलेल्या महाडिकांच्या कुटुंबियांनी कोठेही तक्रार करू नये म्हणून रूग्णालयाच्या प्रशासनाने त्यांना तातडीने संस्थात्मक क्वारंटाईन करून आपला मार्ग मोकळा केला. महाडिकांचा मृतदेह त्यांना फक्त लांबूनच दाखवला आणि त्याची लगेचच विल्हेवाट लावली.
केईएमच नव्हे तर इतर सरकारी व निमसरकारी रूग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांची चाचणी करून त्यांच्यावर उपचार करण्याची यंत्रणा प्रभावीपणे वापरली जात नसल्याने अनेक डॉक्टर तसेच नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांवर क्वारंटाईन होण्याची वेळ येत आहे. एकतर काही वरिष्ठ डॉक्टर सोडले तर अनेकांना पुरेसे संरक्षण देणारे किट उपलब्ध झालेले नाही. काहीतरी थातुरमातूर संरक्षण कवच वापरून हे कर्मचारी काम करत आहेत. अशातच तपासयंत्रणा व्यवस्थित नसल्यामुळे जेव्हा कर्मचाऱ्यांची गरज आहे तेव्हाच अनेक कर्मचाऱ्यांवर स्वतःच्या जीवासाठी क्वारंन्टाईन होण्याची वेळ येत आहे. केईएम रूग्णालयातच जनरल सर्जरीच्या विभागात हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या एका रूग्णाला कोरोनाची बाधा झाल्याचे डॉक्टरांना ऑपरेशन थिएटरमध्ये लक्षात आले. त्यामुळे त्याची श्स्त्रक्रिया तर झालीच नाही परंतु त्यामुळे डॉ. राव यांचे संपूर्ण युनिट क्वारंन्टाईन झाले.
परळच्याच टाटा कॅन्सर रूग्णालयातही कोरोनाने शिरकाव केल्याने आज तेथे किमान २० ते २५ कर्मचारी क्वारंन्टाईन आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना सध्या एका हॉटेलमध्ये तसेच एका संस्थेच्या इमारतीत क्वारंन्टाईन करण्यात आले आहे. याआधी साधारण तितकेच कर्मचारी क्वारंन्टाईन होते. कॅन्सरवर उपचार करायला येणाऱ्या रूग्णांची कोरोनाविषयक योग्य ती चाचणी केली गेली असती तर ही वेळ आलीच नसती. याआधी येथील परिचारिका किंवा इतर स्टाफला पुरेसे संरक्षण कवचही उपलब्ध केले गेले नव्हते. जनरल रूग्णांमध्येच कोरोनाचेही रूग्ण ठेवले जात होते. परंतु नंतर वॉर्डबॉय वा तत्सम कर्मचाऱ्यांच्या संघटनेने काम बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर आज तेथील कर्मचाऱ्यांना संरक्षण किट उपलब्ध झाले आहे. कोरोनाबाधितांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. पाचव्या माळ्यावर उभारण्यात आलेल्या या कक्षात आज किमान १५ कर्मचारी आणि २५ रूग्ण कोरोनावरील उपचार घेत असल्याचे कळते.
शवागार फुल्ल
(क्रमशः)

