मंगळवारी दिलेल्या जाहिरातीत शिवसेनेकडून ज्या नऊ मंत्र्यांची माळ लावली आहे त्यातील पाच मंत्र्यांच्या विरोधात काही ना काही माध्यमातून बातम्या सुरू आहेत. अशा वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न या नऊ लोकांचे फोटो छापून केला आहे का, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना केला.
‘देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ या घोषणेचे काय झाले? त्याबद्दल उल्लेख करायला सरकार तयार नाही. दोघांना दिलेली आकडेवारीचा टक्का काढला तर दोघांपेक्षा इतरांना सर्वाधिक टक्केवारी जाते. इतर ५० टक्के लोकांना मुख्यमंत्री दुसरा हवा आहे हेही त्यातून स्पष्ट होते. तर ७४ टक्के लोकांना तो मुख्यमंत्री नको, असाही अर्थ निघतो. अर्थात हा चर्चेचा विषय ठरू शकतो असेही अजित पवार म्हणाले.
कालच्या जाहिरातीवर शिवसेनेच्या जबाबदार मंत्र्यांनी ती हितचिंतकांनी जाहिरात दिली असे स्पष्टीकरण दिले. परंतु तो कोण हितचिंतक आहे, पहिल्या पानावर एवढ्या महत्त्वाची जाहिरात दिली जाते. त्यामुळे असा कोण हितचिंतक तुम्हाला मिळाला आहे त्याचे नाव जाहीर करावे. कशा पद्धतीने त्याच्याकडे पैसा आला आहे, हे जाहीर करावे, असे आव्हान अजित पवार यांनी दिले.
ठाणे जिल्ह्यात संरक्षण दिलेल्या व्यक्ती कोण कोण आणि कुठल्या क्षेत्रातील याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण माहिती द्यायला संबधित लोक तयार नाही. ठाणे जिल्हयात व शहरात १०० लोकांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. असे काय घडलेय की, १०० लोकांना संरक्षण देण्याची वेळ सरकारवर आली आहे, असा सवालही पवार यांनी केला.

