गोव्याच्या पणजीत आजपासून 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) सुरूवात होत आहे. 20 ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवाची सुरूवात एका मंत्रमुग्ध करणाऱ्या परेडने होणार आहे. ही परेड गोव्याच्या रस्त्यांवर भारताच्या चित्रसृष्टीला साकारेल. आंध्र प्रदेश, हरियाणा आणि गोवा यांचे भव्य चित्ररथ या मिरवणुकीचे नेतृत्त्व करतील. त्यापाठोपाठ भारताच्या प्रतिष्ठित स्टुडिओंच्या चित्तथरारक कलाकृती आणि एनएफडीसीची 50 वर्षांची भावपूर्ण मानवंदना असेल. शंभर लोककलाकारांसह “भारत एक सूर”, देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातील नृत्यांना एकाच लयीत गुंफेल. उत्साह आणि नॉस्टॅल्जियाची भर घालत, छोटा भीम, चुटकी, मोटू पतलू आणि बिट्टू बहानेबाज गर्दीला मोहित करतील. ही परेड गोव्यातून मार्गक्रमण करत असताना कलात्मक जागृतीचा क्षण घोषित करेल. प्रत्येक चित्ररथ आपापल्या प्रदेशाच्या गाभ्याचं दर्शन घडवेल. प्रत्येक सादरीकरण तिथल्या लोकांच्या हृदयाच्या ठोक्यातून आलेलं असेल आणि भारताच्या गोष्ट सांगण्याच्या कालातीत प्रेमाचा पडसाद असेल. समुद्राच्या वाऱ्याप्रमाणे वाढणारे संगीत आणि स्वप्नवत विश्वाप्रमाणे उलगडणारे रंग यांसह, ही ‘शुभारंभ परेड’ असेल.
या महोत्सवात 15 स्पर्धात्मक आणि विशेष जोड-विभागांचा समावेश आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, पदार्पणातील फीचर फिल्म, आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक आणि मॅकाब्रे ड्रीम्स, डॉक्यु-मॉंटेज, प्रायोगिक चित्रपट, युनिसेफ आणि ‘रिस्टोअर्ड क्लासिक्स’ असे विशेष विभाग समाविष्ट आहेत. 56व्या इफ्फीमध्ये ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’- (सीएमओटी), वेव्हज फिल्म बाजार, द नॉलेज सिरीज, सिनेमा एआय हॅकेथॉन, इफ्फीएस्टा- कल्चरल शोकेस आणि मास्टरक्लासेस, गट आणि संवादात्मक कार्यक्रमांचा समावेश आहे.
क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो (सीएमओटी): यात 799 प्रवेश नोंदणीमधून, 124 तरूण निर्मात्यांची निवड, 13 चित्रनिर्मिती कलाकृतींची निवड करण्यात आली असून वेव्हज 2025मधील ‘सीआयसी चॅलेंज’मधील 24 ‘वाइल्डकार्ड’ विजेत्यांचा समावेश आहे.
वेव्हज फिल्म बाजार: भारतातील प्रमुख चित्रपट बाजारपेठेचे विशेष गोष्टींसह पुनरागमन: पटकथालेखक प्रयोग शाळा, मार्केट स्क्रीनिंग्ज, ‘व्ह्यूइंग रूम’ आणि सहनिर्मिती. बाजारपेठांमध्ये 300 पेक्षाही जास्त चित्रपटांचे प्रदर्शन. सहनिर्मिती बाजारपेठेत 22 फीचर फिल्म्स आणि 5 माहितीपट. एकूण 20,000 अमेरिकन डॉलर्सचे रोख अनुदान. वेव्हज फिल्म बाजार शिफारस: विविध स्वरूपांमध्ये 22 निवडक चित्रपट. सातपेक्षाही जास्त देशांमधील प्रतिनिधीमंडळे आणि 10 पेक्षाही जास्त भारतीय राज्यांमधील चित्रपट प्रोत्साहन प्रदर्शन. अत्याधुनिक व्हीएफएक्स, सीजीआय अॅनिमेशन आणि डिजिटल निर्मिती तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणारे अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त एक समर्पित दालन.
सिनेमएआय हॅकेथॉन: इफ्फी 2025मध्ये एक नवीन उपक्रम, ‘सिनेमएआय हॅकेथॉन, एलटीआयमाइंडट्री आणि व्हेवज् फिल्म बझार’ यांच्या सहकार्याने आयोजित केला जाईल. हा कार्यक्रम चित्रपट निर्मितीमध्ये कृत्रिम प्रज्ञा-चालित नवोपक्रमावर लक्ष केंद्रित करणारा आहे. चित्रपट तंत्रज्ञानाचा विकास, प्रमाणन प्रक्रिया सुलभ करणे आणि ‘पायरसी’विरोधी चौकट मजबूत करेल.
इफ्फीएस्टा–सांस्कृतिक प्रदर्शन: संगीत, सादरीकरण आणि सर्जनशील कलांचा चार दिवसांचा उत्सव इफ्फीएस्टा भरविण्यात येणार आहे. हा उत्सव 21 ते 24 नोव्हेंबर, संध्याकाळी 6 ते 8 या कालावधीत श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात आयोजित केला जाईल. यामध्ये गुरुदत्त, राज खोसला, ऋत्विक घटक, पी. भानुमती, भूपेन हजारिका आणि सलील चौधरी यांच्यासह दिग्गज चित्रपट निर्माते आणि कलाकारांच्या शताब्दी वर्षानिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. सलील चौधरी यांचा मुसाफिर आणि ऋत्विक घटक यांचा सुवर्णरेखा, हे चित्रपट दाखवले जातील. यावर्षी, दिग्गज अभिनेते रजनीकांत यांच्या चित्रसृष्टीतील कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त समारोपाच्या समारंभात रजनीकांत यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
1952मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी), दक्षिण आशियातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा चित्रपट महोत्सव म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी), गोवा राज्य सरकार यांनी संयुक्तपणे आयोजित केलेला हा महोत्सव ‘जागतिक सिनेमॅटिक पॉवरहाऊस’ म्हणून प्रस्थापित झाला आहे. यात पुनर्संचयित क्लासिक्स धाडसी प्रयोगांना सामोरे गेले जाते. सिनेमातील दिग्गज आणि निर्भय, नवागत चित्रकर्मी एकाच व्यासपीठावर एकत्र येतात. इथल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक प्रदर्शने, मास्टरक्लासेस, सन्मान आणि ऊर्जामय वेव्हज फिल्म बझार, जिथे कल्पना, सौदे आणि सहयोग एकत्रितपणे भरारी घेतात. 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान गोव्याच्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या सागरी किनारपट्टीच्या पार्श्वभूमीवर रंगणाऱ्या 56व्या इफ्फी महोत्सवात, भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाज, यांचा चमकदार मेळ पाहायला मिळेल.

