Thursday, September 19, 2024
Homeकल्चर +51व्या ‘इफ्फी’ची जल्लोषात...

51व्या ‘इफ्फी’ची जल्लोषात सांगता!

डेन्मार्कमधील इलेक्ट्रॉनिक्स कारखान्याच्या  मालकाला नाझी सैन्यासाठी उत्पादन करण्यास भाग पाडण्यात आले होते या कथानकावर आधारित चित्रपट  इन टू द डार्कनेस/ De forbandede år  या चित्रपटाने आज समारोप  झालेल्या 51व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला आहे. अँडर्स रेफन दिग्दर्शित, 152 मिनिटांच्या  या  डॅनिश चित्रपटाने नाझींच्या कब्जात देश असताना डेन्मार्कच्या जनतेला भोगाव्या लागलेल्या भावनिक समस्यांची गुंतागुंत उलगडून दाखवली आहे. नायक कार्लस्कोव्हला सामना करावा लागणाऱ्या मानसिक संघर्षाचे प्रभावी चित्रण यात करण्यात आले आहे. एकीकडे, त्याला त्याच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी जर्मन बाजारपेठेचे उत्पादन चालू ठेवण्यास आक्रमकांद्वारे भाग पाडले जात आहे तर दुसरीकडे, या निवडीच्या नैतिक अनिश्चिततेमुळे त्याच्या कुटुंबालाही यातना सोसाव्या लागत आहेत.

तैवानच्या दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्या चेन-नियन को यांना त्यांच्या 2020च्या मँड्रिन भाषेतील चित्रपट द साइलेंट फॉरेस्ट साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार प्राप्त झाला आहे. गतिमंद मुलांच्या शाळेत घडणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे वास्तववादी आणि हृदयस्पर्शी प्रदर्शन या चित्रपटातून करण्यात आले आहे.

कर्णबधिरांच्या जगातील वास्तविक घटनांवर आधारित 108 मिनिटांच्या या चित्रपटात नुकत्याच एका विशेष शाळेत दाखल केलेल्या चांग चेंग या कर्णबधिराच्या नजरेतून हे कथानक मांडण्यात आले आहे. पीडितांना  सावज बनवून  त्यांचा कसा बळी जातो याविषयीची ही वेदनादायक कहाणी तैवानमधील एका शाळेतील सत्यघटनेवर आधारित आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीच्या रौप्य मयूर पुरस्कारात प्रमाणपत्र आणि 15 लाख रुपये रोख रक्क्म यांचा समावेश आहे.

उल्लेखनीय म्हणजे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी रौप्य मयूर पुरस्काराने 17 वर्षीय तझू-चुआन लियू याला गौरविण्यात आले. त्याने  चांग चेंग या प्रमुख भूमिकेतून दिव्यांग मुलाचे भावविश्व समर्थपणे उलगडून दाखविले. लियू हा 76 हॉरर बुक स्टोअर (2020) आणि ऑन चिल्ड्रेन (2018) मधील भूमिकांसाठी देखील ओळखला जातो. प्रमाणपत्र आणि दहा लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या साठीचा रौप्य मयूर पुरस्कार पोलिश अभिनेत्री झोफिया स्टॅफिएज हिला ”आय नेव्हर क्राय” या चित्रपटातील भूमिकेसाठी प्राप्त झाला आहे ज्यात तिने परदेशातील नोकरशाहीच्या चक्रव्यूहातून स्वतःच्या वडिलांचा मृतदेह ताब्यात घेताना स्वतःची वाट चोखाळत करावा  लागणारा  संघर्ष चपखलपणे मांडला आहे. स्टॅफिएजला पुरस्कार स्वरूपात 10 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र मिळाले. स्टॅफिएज ही स्प्रावा टोमका कोमेन्डी (2020), 25 लाटनीव्हिनोस्की आणि मार्सेल (2019) या चित्रपटांसाठीदेखील ओळखली जाते.

इफ्फी 51चा विशेष ज्युरी पुरस्कार बल्गेरियन दिग्दर्शक कामिन कालेव यांच्या सन 2020मधील ”फेब्रुवारी” चित्रपटासाठी देण्यात आला आहे. या चित्रपटात आठ, अठरा आणि ब्याऐशी या तीन वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींची  जीवनकथा सांगण्यात आली आहे. आयुष्य म्हणजे विविध अवतारातील सातत्य असून माणसं  म्हणजे केवळ विस्तीर्ण आकाशाच्या खाली असलेल्या या विस्तीर्ण मोकळ्या धरतीवरील ठिपके आहेत हा जीवनाचा दृष्टिकोन काव्यमय रूपकातून सादर करण्यात आला आहे. दिग्दर्शक कामिन कालेव एक लेखक देखील आहेत आणि ईस्टर्न प्लेज (2009) आणि फेस डाउन (2015) साठीसुद्धा  ते ओळखले जातात. दिग्दर्शक कामिन कालेव यांना रौप्य मयूर, प्रमाणपत्र आणि 15 लाख रुपयांचा रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला.

इफ्फी 51चा विशेष उल्लेखनीय पुरस्कार भारतीय दिग्दर्शक कृपाल कलिता यांना त्यांच्या आसामी चित्रपट ”ब्रिज”साठी प्रदान करण्यात आला आहे ज्यात ग्रामीण आसाममध्ये दरवर्षी येणाऱ्या  पुरात सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टांचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटाद्वारे शक्तिशाली ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांमुळे दरवर्षी  येणारा पूर आणि शेतीचे नुकसान यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. कलिता यांना पुरस्काराच्या रूपात प्रमाणपत्र मिळाले.

सर्वोत्कृष्ट  दिग्दर्शक  पदार्पण हा  पुरस्कार ब्राझीलचे दिग्दर्शक कोसिओ परेरा डॉस सॅंटोस यांना 2020 मधील पोर्तुगिज चित्रपट ”व्हॅलेंटिना” यासाठी देण्यात आला आहे. सतरा वर्षांच्या ब्राझीलियन समलिंगी मुलीची कथा यात मांडण्यात आली आहे. तिच्या आईबरोबर सामान्य जीवन व्यतीत करणे हा तिचा एकमेव उद्देश आहे. दिग्दर्शक सॅंटोस यांनी ब्राझीलमधील  विद्यापीठातून  सिनेमाचा अभ्यास केला, जिथे त्यांनी  अनेक चित्रपट आणि माहितीपट दिग्दर्शित केले. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांचे चित्रपट निवडले गेले आहेत. त्यांना 50 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.

इफ्फी 51 अर्थात 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विविध श्रेणीतील  पुरस्कारांचा निर्णय  हा अर्जेंटिनाचे दिग्दर्शक पाब्लो सीझर यांच्या अध्यक्षतेखाली जगभरातील नामवंत चित्रपट निर्मात्यांचा समावेश असलेल्या  ज्युरी  मंडळाने घेतला आहे. प्रसन्ना विथानाज (श्रीलंका), अबू बकर शौकी (ऑस्ट्रिया), प्रियदर्शन (भारत) आणि रुबैयत हुसेन (बांगलादेश) हे ज्युरीमंडळाचे अन्य सदस्य होते.

51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (आयएफएफआय) सांगता सोहळा गोव्याच्या ताळीगाव मधील श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर  स्टेडियम येथे  आज, 24,जानेवारी 2021 रोजी दिमाखात पार पडला. या सोहळ्यासाठी ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री झीनत अमान आणि  अभिनेता रवि किशन हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित  होते, तर ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता विश्वजित चटर्जी यांना इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार देऊन  गौरवण्यात आले. खासदार रवि किशन, आंतरराष्ट्रीय ज्युरीचे सदस्य, दिग्दर्शक प्रियदर्शन नायर, इफ्फी  सुकाणू समितीचे सदस्य  शाजी एन. करुण,  निर्माते राहुल रावेल, मंजू बोरा आणि रवि कोट्टरकर आणि देश-विदेशातील मान्यवर या समारंभाला उपस्थित होते.

गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सध्याच्या कठीण काळातही या महोत्सवाचे उत्तम आयोजन केल्याबद्दल  आयोजकांचे कौतुक केले. चित्रपट मेंदूतून नाही तर हृदयातून  येतो, इफ्फी सारखे चित्रपट महोत्सव आपल्याला जग एक असल्याची आठवण करून देतात असे  कोश्यारी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो म्हणाले की, इफ्फीच्या या आवृत्तीने सर्व प्रकारच्या अडचणींवर मात केली आणि ते उत्कृष्टतेचे योग्य व्यासपीठ म्हणून उदयाला आले आहे. “यावर्षी सिनेमा वेगवेगळ्या रूपात म्हणजेच प्रत्यक्ष आणि ऑनलाईन अशा भिन्न स्वरूपात आपल्याकडे आला”, असे सांगत त्यांनी संमिश्र स्वरूपात महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल इफ्फीचे अभिनंदन केले.

इंडियन पर्सनालिटी ऑफ द इयर पुरस्कार स्वीकारताना ज्येष्ठ अभिनेते विश्वजित चॅटर्जी  म्हणाले: “मला या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी केंद्र  सरकार आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे मनापासून आभार मानतो. यावर्षी, आम्हाला समजले की बांगलादेश हा आपला फोकस कंट्री आहे, ज्या देशाशी माझे खूप जवळचे संबंध आहेत. जेव्हा बांगलादेशवर हल्ला होत होता तेव्हा मुंबईत महान दिग्दर्शक ऋत्विक घटक माझ्या बरोबर होते आणि आम्हाला बंगबंधू  शेख मुजीबुर रहमान यांच्या भाषणांमधून प्रेरणा मिळत होती.

51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हिंदी भाषेतील ऑस्ट्रियन चित्रपट आणि मिड फेस्ट फिल्म ‘मेहरूनिसा’ या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर पार पडला. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) 51व्या आवृत्तीचा समारोप कियोशी कुरोसावा दिग्दर्शित जपानी चित्रपट वाईफ ऑफ ए स्पाय ने झाला. काही अप्रत्याशित परिस्थितीमुळे बेदखल झालेल्या एका पती – पत्नीची कहाणी यामध्ये मांडण्यात आली आहे. भावनिक चढउतारांच्या कथेत, जिथे मत्सराच्या भावनेतून एका पत्नीला ग्रासलेले असताना, जेव्हा तिला सत्याची बाजू कळते, तेव्हा तिच्या कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अनपेक्षित काहीतरी करते.

कुरोसावा, ज्यांनी इफ्फी 51च्या समारोप समारंभात व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. सिने अभिनेत्री  सिमोन सिंग यांनी सांगता समारंभाचे सूत्रसंचालन केले. 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 60 देशांचे 126 हून अधिक चित्रपट दाखवण्यात आले ज्यात 50 भारतीय प्रीमियर, 22 आशियाई प्रीमियर, 7 वर्ल्ड प्रीमिअर आणि 6 आंतरराष्ट्रीय प्रीमियर होते.

Continue reading

होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच

होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्‍या प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने सुरू असलेल्‍या द ग्रेट होंडा फेस्‍टच्‍या फेस्टिव्‍ह मोहिमेदरम्‍यान त्‍यांची लोकप्रिय मध्‍यम आकाराची एसयूव्‍ही होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच केली आहे. मर्यादित युनिट्ससह अॅपेक्‍स एडिशन मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन (एमटी)...

राडोची दोन नवीन घड्याळे बाजारात

अत्यंत आनंदाच्या प्रसंगाची एखादी अविस्मरणीय आठवण आपल्याला हवी असते. स्विस घड्याळे बनवणारी आणि मास्टर ऑफ मटेरियल्स म्हणून प्रख्यात असलेली राडो कंपनी राडो कॅप्टन कूक हाय-टेक सिरॅमिक स्केलेटन आणि राडो सेंट्रिक्स ओपन हार्ट सुपर ज्युबिल ही दोन अफलातून घड्याळे घेऊन आली आहे, जी भेट...

मोटोरोलाने लाँच केला ‘रेडी फॉर एनीथिंग’!

मोबाईल तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधनात जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या मोटोरोलाने भारतात motorola edge50 Neo नुकताच सादर केला. मोटोरोलाच्या प्रीमियम एज स्मार्टफोन लाइनअपमध्ये सर्वात नवीन भर घालण्यात आली आहे, ज्यात शक्तिशाली वैशिष्ट्यांसह आकर्षक, कमीतकमी डिझाइनचा समावेश आहे. ज्यात 'रेडी फॉर एनीथिंग' ही टॅगलाइन समाविष्ट आहे. हे उपकरण जास्तीतजास्त...
error: Content is protected !!
Skip to content