50 खोके.. 50 खोके.. म्हणून आम्हाला हिणवणाऱ्यांनी आता आम्हाला पन्नास कोटी द्या म्हणून पत्र दिले. आम्हाला हिणवता आणि इथे पत्र देता? शिवसेनेच्या खात्यामधले पन्नास कोटी रुपये तत्काळ आमच्याकडे वर्ग करा, असे पत्र यांनी पाठवले आहे. कोणी पाठवले असेल, हे मी काय सांगायला नको. मग धोकेबाज कोण आहे, हे तुमच्या लक्षात आलेच असेल, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उद्धव ठाकरे यांना त्यांचे नाव न घेता लगावला.
विरोधी पक्षाने मांडलेल्या विधानसभेत मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात मुख्यमंत्री बोलत होते. परंतु आम्ही कसलाही विचार केला नाही. एका मिनिटाचाही विचार न करता तत्काळ हे पैसे दिले. आम्हाला तुमची संपत्ती नको. तुमची प्रॉपर्टी नको. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती. ज्यांना बाळासाहेबांच्या विचारांची पडली नाही, शिवसैनिकांची पडली नाही, भोळ्याभाबड्या शिवसैनिकांना हे माहितीही नाही की यांचा फक्त 50 खोक्यांवरच डोळा आहे. घरादारावर तुळशीपत्र ठेवून आम्ही शिवसेना वाढवली. पण हे युज अँड थ्रो करणारे लोक आहेत. आता रोकडे बंद झाले.. यांना खेकडे दिसायला लागले. नारायण राणे, राज ठाकरे, छगन भुजबळ, मनोहर जोशींना तर स्टेजवरून खाली उतरवले. कोणा कोणाचे पाय यांनी खेचले हे आम्हाला माहित आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आमच्या सरकारने अलीकडेच एक लाख 18 हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक आणली. त्याआधी डावोसला आम्ही एक लाख 38 हजार कोटी रुपयांच्या परदेशी गुंतवणुकीचे एमओयु केले. याआधी दावोसमध्ये कितीचे करार झाले, हे गुलदस्त्यातच आहे. आमचे सरकार चोवीस बाय सात एक्शन मोडमध्ये काम करणारे आहे. फेसबुक लाईव्ह तसेच घरून काम करणारे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
हे सरकार पडणार.. मुख्यमंत्री बदलणार.. असे नवीन नवीन ज्योतिषी अलीकडे उदयाला आले आहेत. नानाभाऊ बोलले.. पृथ्वीबाबा पण बोलले.. ते माझ्या मागे का लागले हे मला कळलेच नाही. ते माझ्या जिल्ह्यातले आहेत. पण मला माहित आहे की ते एकदा मागे लागले की चार-पाच वेळा प्रयत्न करतात. नंतर सोडून देतात असे ते म्हणताच सभागृहात हास्याचा कारंजा उडाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक जागतिक नेता म्हणून पाहिले जाते. नऊ वर्षांत त्यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. आई गेल्यानंतरही विधी करून ते पुन्हा कार्यरत राहिले. त्यांचे काम पाहून अजितदादाही आमच्याबरोबर आले. तुमची गाडी चुकली.. असे म्हणताच पुन्हा सभागृहात हंशा पिकला.
आम्ही शासन आपल्या दारी, हा कार्यक्रम राबवला. आतापर्यंत तीन महिन्यात एक कोटी तेरा लाख लाभार्थ्यांना याचा उपयोग झाला. अनिल देशमुख यांनीही हा कार्यक्रम आपल्या मतदारसंघात लावला.. असे ते म्हणताच विरोधी बाकांकडून तो जुना कार्यक्रम आहे, असे सांगितले गेले. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, तेव्हा शासन आपल्या दारी नव्हते, शासन आपल्या घरी होते आणि पुन्हा हास्याची लकेर उमटली.
अजितदादा, तटकरे साक्षीला आहेत. हॉटेल हयातमध्ये हे कोणत्या पातळीवर जाऊन बोलत होते हे तुम्ही ऐकलं आहे. पण हयातीमध्ये जे ऐकलं नव्हतं ते ऐकून घेतलं. अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये. गुवाहाटीमध्ये आम्ही गेलो. आमच्याबरोबर महिला होत्या. त्यांना हे काय बोलले हे तुम्हाला माहित आहे. आम्ही महिलांचा सन्मान करणारे लोक आहोत. मी मागेच म्हटले की, हिऱ्यापोटी गारगोटी आहे. कोल्हापूरला एक जण म्हणाले की, सूर्यापोटी मेणबत्ती आहे. आता जाऊ दे.. असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्ही दिल्लीला जातो ते राज्याच्या हितासाठी जातो, तर आम्हाला आम्हाला मुजरे करायला जातो असे म्हणता. तुम्ही जाता.. पण बालंट आलं की… दादा, अशोकराव तुम्हाला माहित आहे. पण मोदी कधी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाहीत. बघतपण नाहीत. बघितले तरीही काय होईल, याचा अंदाज तुम्हाला आहे, असा अप्रत्यक्ष इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. सरकारच्या विविध योजनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. परंतु मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने आमच्या समाधान झाले नाही असे सांगत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्त्वाखाली विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.

