Homeमुंबई स्पेशलदक्षिण मुंबईतील ५...

दक्षिण मुंबईतील ५ लाख लीटर सांडपाण्याचा होणार पुनर्वापर!

सागरी किनारा मार्ग प्रकल्प परिसरालगत व समुद्रालगत असणाऱ्या झोपडपट्ट्यांमधील सांडपाण्याचा विसर्ग पूर्वी समुद्रात होत असे. मात्र, पर्यावरणपूरकतेच्या दृष्टीने या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्या पाण्याचा पुनर्वापर करण्याचा पथदर्शी प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे आणि सहआयुक्त (दक्षता) अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात येत असलेल्या या पथदर्शी प्रकल्पांतर्गत ४ ठिकाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत असून याद्वारे दररोज तब्बल ४ लाख ८५ हजार लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया करता येणार आहे. या पथदर्शी प्रकल्पातील ४ प्रक्रिया केंद्रांद्वारे प्रक्रिया केलेले पाणी या  परिसरातील शौचालये व उद्यानांमध्ये वापरण्यात येणार आहे. यामुळे सांडपाण्याचा योग्य वापर होण्यासोबतच पर्यावरणपूरकतादेखील जपली जाणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना व्यवसाय विकास विभागाच्या प्रमुख आणि स्माईल कौन्सिलच्या संचालक शशी बाला यांनी कळविले आहे की, सध्या पूर्णत्वाकडे वेगाने वाटचाल सुरू असलेल्या सागरी किनारा रस्ता प्रकल्पालगत विविध ४ ठिकाणी झोपडपट्टी परिसर आहे. यामध्ये टाटा उद्यानाजवळ असणारा शिवाजी नगर परिसर, महालक्ष्मी मंदिराच्या दक्षिण बाजूला असणारा दर्या सागर परिसर, महालक्ष्मी मंदिराच्या उत्तर बाजूला असणारा दर्या नगर परिसर आणि ऍनी बेझंट मार्गावरील लव्हग्रोव्ह पंपिंग स्टेशनच्या समोर असणाऱ्या मार्कंडेश्वरच्या मागील परिसर; या ४ परिसरांचा समावेश आहे. या चारही परिसरांमध्ये सुमारे ९ हजार ५०० इतकी लोकवस्ती आहे. या चारही परिसरांसाठी तेथील लोकसंख्येच्या गरजेनुसार सांडपाणी प्रकल्प उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यापैकी शिवाजी नगर येथील प्रक्रिया केंद्राचे काम आता अंतिम टप्प्यात असून उर्वरित ३ प्रक्रिया केंद्रांचे कामदेखील वेगात सुरू आहे.

शिवाजी नगर येथील प्रक्रिया केंद्राची क्षमता ही दररेज ५० हजार लीटर (KLD) सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची असून दर्या सागर प्रक्रिया केंद्राची क्षमता ही ३५ हजार लीटर इतकी आहे. तर दर्या नगर व मार्कंडेश्वर मंदिराच्या मागील परिसर येथील प्रक्रिया केंद्रांची क्षमता ही अनुक्रमे दररोज १ लाख लीटर व ३ लाख लीटर इतक्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची असणार आहे. यानुसार चारही प्रक्रिया केंद्रांची एकत्रित क्षमता दररोज ४ लाख ८५ हजार लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची असणार आहे, असे त्या म्हणाल्या.

या चारही परिसरातील सांडपाण्यावर जागीच प्रक्रिया व्हावी आणि ते पुन्हा वापरता यावे, यासाठी स्माईल कौन्सिलच्या माध्यमातून आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी इंद्र कांत झा यांच्या ‘एमर्जी एन्वायरो’ या स्टार्टअपने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित ‘इंटिग्रेटेड वेटलँड टेक्नॉलॉजी’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत प्राथमिक स्तरावर सागरी किनारा लगतच्या परिसरांमध्ये हा पथदर्शी प्रकल्प राबविला जात आहे. 

अशी होणार सांडपाण्यावर प्रक्रिया

‘इंटिग्रेटेड वेटलँड टेक्नॉलॉजी’चा पथदर्शी प्रकल्पामध्ये संबंधित परिसरातील मलजल किंवा सांडपाणी हे उदंचन पंपांच्या साहाय्याने ओढले जाते आणि ते प्रथमतः भूमिगत टाकीमध्ये साठवले जाते. या टाकीमध्ये चार कप्पे असतात आणि प्रत्येक कप्प्यांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. द्वितीयस्तरीय प्रक्रियेमध्ये कर्दळीसारख्या नैसर्गिक झाडांच्या मदतीने पाणी स्वच्छ करण्यात येते. विशेष म्हणजे या प्रक्रिया केंद्रांमध्ये सुरुवातीला सांडपाणी ओढणे आणि नंतर स्वच्छ पाणी सोडणे, या व्यतिरिक्त कुठेही पंप किंवा अन्य तंत्रज्ञानांचा वापर केला जात नाही.

प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उद्यान किंवा शौचालयांसाठी पुनर्वापर!

‘इंटिग्रेटेड वेटलँड टेक्नॉलॉजी’च्या सहाय्याने प्रक्रिया करून स्वच्छ केलेल्या पाण्याचा उद्यान किंवा शौचालयांसाठी पुनर्वापर करणे शक्य असणार आहे. तसेच प्रक्रिया केंद्र भूमिगत असल्याने ते ज्या ठिकाणी असणार आहे, त्याच्या वर झाडेही लावणे शक्य होणार आहे. प्रक्रियेदरम्यान किंवा नंतर पाण्याचा कोणताही वास किंवा घाण परिसरात पसरत नसल्यामुळे संबंधित जागा कायम वापरात राहू शकते. प्रक्रिया केंद्रे व त्यातील संयंत्रे स्वयंचलित व संगणकीय यंत्रणेवर आधारीत असल्यामुळे केवळ एक व्यक्ती या चारही संयंत्रांवर देखरेख ठेवण्यास पुरेशी आहे.

स्माईल कौन्सिलविषयी थोडक्यात

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व्यवसाय विकास विभाग अंतर्गत ‘सोसायटी फॉर मुंबई इन्क्युबेशन लॅब टू आंत्रप्रीनरशीप कौन्सिल (स्माईल)’ हे ‘सिव्हीकटेक इन्क्युबेशन केंद्र’ कार्यरत आहे. या केंद्राच्या वतीने नागरी समस्यांवर तंत्रज्ञानात्मक उपाययोजना करण्यासाठी सातत्याने नवनवीन स्टार्ट्अप्सला प्रोत्साहित केले जाते. या स्टार्टअप्सच्या माध्यमातून नवनवीन कल्पना तसेच नव-उद्यमींना प्रोत्साहन मिळण्यासोबतच नागरी समस्यांवर मात करणे सोपे जाते. त्याचबरोबर त्या माध्यमातून नागरी समस्यांचे निराकरण करण्यासाठीही बरीच मदत होत असते. सागरी किनारा प्रकल्पालगत असणाऱ्या चारही परिसरांमध्ये उभारण्यात येत असलेली प्रक्रिया केंद्रे स्माईल कौन्सिलच्या पुढाकाराने आकारास येत आहेत, अशीही माहिती शशी बाला यांनी दिली आहे.

Continue reading

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...
Skip to content