HomeArchive१२ तास, ४...

१२ तास, ४ रूग्णालये आणि पदरी मृत्यू!

Details

 
 
“केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
राज्यात कोरोनाच्या चाचण्या कमी करून कोरोनाबाधितांचा आकडा कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिल्यानंतर मुंबईतल्या एका महिलेला १२ तासांत चार रूग्णालयांचे धक्के खाल्ल्यानंतरही मृत्यूला कवटाळावे लागल्याचे भीषण वास्तव भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी खासदार किरीट सोमैया यांनी जनतेसमोर आणले आहे. या महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा सवालच त्यांनी मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना विचारला आहे.
 

 
 
मुंबईतल्या भांडुप पूर्वेला राहणाऱ्या सुष्मा भेलेकर या ४३ वर्षांच्या महिलेला चार दिवसांपासून कफ, खोकला आणि श्वसनाचा त्रास जाणवत होता. हा त्रास जाणवत असताना त्यांनी त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरांकडून उपचार घेतले. रक्ताची तपासणी केली, छातीचा एक्स-रे काढला. सोमवारी, २० जुलैला सकाळी ९ वाजता त्यांना अस्वस्थ वाटू लागले तेव्हा त्यांचे पती अनिल, जे स्वतः रिक्षाचालक आहेत, यांनी त्यांना मुलूंड पूर्वेला असलेल्या महापालिकेच्या मीठागर कोविड केअर सेंटरमध्ये नेले. सुष्मा यांना श्वसनाचा तसेच सर्दी व खोकल्याचा त्रास अनावर होत होता. परंतु त्या केंद्रावरील अधिकाऱ्यांनी त्यांना दाखल करून घेतले नाही. तुमच्याकडे कोविड टेस्टचा रिपोर्ट नाही. त्यामुळे आम्ही प्रवेश देऊ शकत नाही, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते.
 
त्यानंतर अनिल यांनी आपल्या पत्नीला आपल्या मुलाच्या मदतीने मुलूंड पूर्वेच्या महापालिकेच्या सावरकर रूग्णालयात नेले. केसपेपर काढला. रूग्णाला ऑक्सिजनची नितांत गरज होती. तेथील डॉक्टरांनीही हेच सांगितले. आणि ही सुविधा आयसीयुमध्येच उपलब्ध होते. त्यामुळे तुम्ही रूग्णाला दुसरीकडे न्या, असे सांगत त्यांची बोळवण केली.
 

 
 
सावरकर रूग्णालयात नकार मिळाल्यानंतर अनिल यांनी रिक्षातून सुष्मा यांना विक्रोळी पूर्वेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात नेले. पुन्हा केसपेपर काढला. परंतु तेथील डॉक्टरांनीही कोविडचा रिपोर्ट नसल्याचे कारण पुढे करत त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. रूग्णाची तब्येत फार नाजूक आहे. परंतु आम्ही त्यांना दाखल करून घेऊ शकत नाही, असे तेथील डॉक्टरांनी सांगितले.
 
त्यानंतर भेलेकर यांनी आपल्या पत्नीला ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या रूग्णवाहिकेतून सायन हॉस्पिटलला नेले. तेव्हा संध्याकाळचे साडेसात वाजले होते. तेथील इमरजन्सी विभागात त्यांना नेण्यात आले. त्यांनी आधीच काढलेला एक्स रे दाखवला. तेव्हा डॉक्टरांनी केस गंभीर असल्याचे सांगून पहिल्या मजल्यावरच्या कोविड वॉर्ड नंबर २ मध्ये दाखल केले. तेथे उपचार सुरू होण्याआधीच डॉक्टरांनी त्यांचा श्वासोच्छवास सुरू नसल्याचे सांगितले. रात्री साडेआठ-नऊ वाजण्याच्या सुमारास सुष्मा मरण पावल्याचे घोषित करण्यात आले. अखेर कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला.
 

 
 
भांडुप पूर्वेचे सामाजिक कार्यकर्ते जनार्दन म्हात्रे यांनी ही बाब किरीट सोमैया यांच्या नजरेस आणली. त्यानंतर भेलेकर कुटुंबियांशी बोलून त्यांनी मुंबईचे महापालिका आयुक्त चहल यांना पत्र लिहून ९ तासात ४ रूग्णालये आणि पदरी मृत्यू घेणाऱ्या या घटनेला जबाबदार कोण, असा सवाल केला. या प्रकरणात झालेल्या अक्षम्य दिरंगाईची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
 
कमी चाचण्यांमुळेच संसर्ग आणि मृत्यू अधिक : देवेंद्र फडणवीस
 
दरम्यान, कमी चाचण्यांमुळेच सातत्याने कोरोना संसर्ग वाढत असून, मृत्यूचे प्रमाणसुद्धा अधिक आहे, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
कोरोना चाचण्या, त्यातून येणारे पॉझिटिव्ह रूग्ण, दैनंदिन संसर्गाचे आणि मृत्यूचे प्रमाण याचा मुंबई आणि महाराष्ट्राचा आलेख त्यांनी मांडला आहे. दिल्लीत केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्यानंतर आणि तेथे मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्यानंतर तेथे रूग्णसंख्या, मृत्यूचे प्रमाण आणि संसर्गाचा दैनंदिन दर याचे कमी होत असलेले प्रमाण, हेही त्यांनी 8 जूनपासूनची दैनंदिन स्थिती दाखवित स्पष्ट केले आहे. ते म्हणतात की, कोरोना चाचण्या सातत्याने कमी करण्यामुळे आपण काय कमाविले आणि काय गमाविले? महाराष्ट्रातील संसर्गाचा दर अगदी प्रारंभी जो 6 ते 7 टक्के होता, तो 8 जूनपर्यंत 17-18 टक्क्यांवर आला आणि आता 23 ते 24 टक्के. अर्थात 100 चाचण्यांमधून 24 जणांना कोरोनाचे निदान होते. मुंबईचा संसर्गाचा दर सातत्याने 21 ते 27 टक्क्यांवर स्थिरावलेला आहे. चाचण्यांची संख्या अतिशय कमी. 
 
 
 
1 ते 19 जुलैच्या दरम्यानची सरासरी काढली तरी केवळ 5500 चाचण्या दररोज होत आहेत. महाराष्ट्र आणि मुंबईतील कोरोनाबळींची संख्या दररोज सरासरी तेवढीच राहत आहे. नवी दिल्लीतल्या स्थितीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आणि चाचण्यांची संख्या वाढविल्यानंतर संसर्गाचा दर 30 ते 35 टक्क्यांहून आता 6 टक्क्यांवर आलेला आहे आणि कोरोना बळींच्या संख्येतही घट झाली आहे. असे असले तरी कोरोना चाचण्यांची संख्या तरीही दररोज कायम ठेवण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात चाचण्यांना दुसरा कोणताही पर्याय नाही. कोरोनावर मात करण्याचा, रूग्णसंख्या कमी करण्याचा आणि राज्यातील नागरिकांचे मृत्यू रोखण्याचा एकमात्र उपाय म्हणजे अधिकाधिक चाचण्या, संशयितांचे विलगीकरण आणि इतरांची सुरक्षा, असेही ते म्हणाले.
 “

Continue reading

दिल्ली विधानसभा परिसरात मुखवटाधारी व्यक्तीकडून सुरक्षेची ऐसीतैशी

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधानसभा संकुलात सोमवारी दुपारी सुरक्षेचा मोठा भंग झाल्याची खळबळजनक घटना घडली. एका मुखवटाधारी व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या 'टाटा सफारी' कारने विधानसभेचे लोखंडी गेट तोडून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे, या व्यक्तीने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर पुष्पगुच्छ ठेवला...

माझा एकच बाप – बाळासाहेब ठाकरे!

माझा एकच बाप - बाळासाहेब ठाकरे! आम्ही "मार्मिक"मुळे घडलो. आमची राजकीय जडणघडण "मार्मिक"मुळे आकाराला आली. जुना स्टँड, जळगाव जाऊन आम्ही मार्मिक घ्यायचो, तेव्हा सामनासुद्धा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी यायचा. मार्मिक आम्ही 100% वाचून काढायचो. अशी माध्यमे हवीत, समाज घडवणारी अन् माणसे...

महाराष्ट्र भाजपाने फुंकला 2029च्या निवडणुकीचा शंख!

देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या विचारधारेविषयी विश्वासाचे, सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाचा योग्य वापर करून घेण्यासाठी कालबद्ध रीतीने कार्यक्रम आखून 2029चा संपूर्ण यशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करावे, आणि देशभक्ती, राष्ट्रीयत्व आणि...
Skip to content