Details
‘सोशल’ क्रांतीवीरांनो जबान संभाल के!
04-Feb-2019
| 0
”
विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
vinodsalvi1@gmail.com
‘बोलल्याने पश्चाताप अन् ऐकल्याने शहाणपणं येतं’, असं एक सुवचन आहे. त्याहीउपर उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ, असंही म्हटलं जातं. मात्र आपल्या देशात, राज्यात, एकदा का निवडणुकीचा हंगाम सुरू झाला की विविध राजकीय संप्रदायातील भक्तगणांना आपल्या आकाप्रती प्रेमाचे कढ येऊ लागतात. ते कुणाचा शब्दही पडू देत नाही. मी माझ्या नेत्याबद्दल किती निष्ठा बाळगतो हे दाखविण्यासाठी फेसबुक, व्हॉट्स अॅप आदी सोशल माध्यमांवर अंत्यत हीन पातळी गाठून कमेंट टाकण्याची स्पर्धाच लागते. अगदी कमरेचं सोडून हा कार्यक्रम आज सर्वत्र सुरू आहे. या सोशल मिडियावर निवडणूक काळात काही बंधने असावीत, असा दबाव केंद्रीय निवडणूक आयोगावर आता वाढू लागला आहे. इतकेच नाहीतर सोशल मिडिया नावाचं हे माध्यम प्रसारमाध्यमांपेक्षा अधिक प्रभावी आणि एकाचवेळी लाखो लोकांपर्यंत पोहोचत असल्याने त्याचे परिणाम जितके चांगले तितकेच वाईटही होत आहेत. राजकारण्यांनी तर आपल्या प्रसिद्धीसाठी हक्काचा अड्डा बनवला आहे. खासकरून 2014मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपात हा सोशल वारा देशभर इतका पसरला की गुजरातचे मुख्यमंत्री असलेले मोदी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यांच्या साडेचार वर्षांतील कारकीर्दीचा उंचावत गेलेला आलेखही याच सोशल मिडियाने प्रभावीपणे जनतेसमोर नेला.
जुमलेबाजी, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार नमो भक्त आणि विरोधकांतील हे सोशल युद्ध आपण दररोजचं आपल्या हातातील मोबाईल नामक खेळण्यावर बघत असतो. पण.. काही भक्त नेता, अभिनेता आणि एखाद्या बाबा-बुवाच्या भक्तिरसात इतके न्हाऊन निघतात की मी लिखित स्वरूपात कोणता नि काय मजकूर हजारो, लाखो लोकांपर्यंत पोहोचवत आहे. त्याचे परिणाम काय होतील? कुणाच्या सामाजिक, राजकीय, जातीय, धार्मिक अथवा वैयक्तिक भावना दुखावल्या जातील, हा विचार कंबरेचं सोडलेल्या मंडळींना नसतो. आता लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच हे सोशल अस्त्र प्रभावीपणे वापरलं जाऊ लागलं आहे. या सोशलगिरीचा ‘फटका’ कधी आणि कुणाला बसेल हे कुणालाच सांगता येणार नाही. तेव्हा शब्द अन् भाषा जरा जपून.. हेच येथे प्रत्येकाला सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्या पालघरमधील दोन मुलींना नाहक मनस्ताप सोसावा लागला होता. त्यांना अटकही झाली होती. हे प्रकरण 2012मधील आहे. त्यानंतर आज वर्ष 2019 उजाडल्यानंतरही हेच फेसबुक व व्हॉट्सअॅप विखारी प्रचार, आरोप, प्रत्यारोप, एकमेकांना शिवीगाळ, जातीय हिंसाचार, अफवा पसरविण्यासाठी प्रभावीपणे वापरले जात आहे. हा सोशल मीडिया एखाद्या विधायक कामासाठी व बहुपयोगी असला तरी काही डोक्यावर पडलेले लोक येथे आपल्या अकलेचे दिवे पाजळत आहेत. याच आठवड्यात भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे असाऊद्दीन ओवेसी यांच्याबद्दल अंत्यत हीन शब्दप्रयोग करणारी पोस्ट रिपाइं आठवले गटाच्या एका कार्यकर्त्याने टाकली होती. या फेसबुकमुळे संबंधित कार्यकर्त्याला भारिप कार्यकर्त्यांनी शोधून काढत त्याची पब्लिक धुलाई केली होती. भारिप किंवा रिपाइंच्या कार्यकर्त्यांची छाती अभिमानाने फुलावी, अशी ही घटना नक्कीच नाही. या घटनेत संबंधित माणसाला जीवालाही मुकावे लागले असते. या माणसानेही अशी वादग्रस्त पोस्ट टाकताना सामाजिक भावनांचा विचार न केल्याने त्याची शिक्षा त्याला भोगावी लागली. आपले राजकीय नेतेही विकासकामांचा बार उडवून देण्यासाठी कोटींच्या प्रकल्पाच्या घोषणा हवेत करत असतात.
मोठमोठे आकडे फुगवून सांगतात, आपणच जनतेचे खरे कैवारी आहोत हे भासविण्याचा प्रयत्न करतात. मात्र सोशल मिडिया नामक अस्त्रावर सरकारच्या कामाची बेरीज-वजाबाकी 24 तास सुरू असते. हे थापा आणि फेकू नेत्यांसाठी धोक्याचे ठरू लागले आहे.
सत्तेवर येण्याआधी लोकांना भुलथापा देवू आणि मग बघू! अशा भ्रमात वावरणार्या नेत्यांनी आता जनता का फैसला तिथल्या तिथं हे ‘सोशली’ लक्षात ठेवायला लावणारा हा काळ आहे. मी आज फेकेन. पण मला हे लोक उद्या सत्तेवरून मुळासकट उखडून फेकतील, याची जाणीव थापेबाज नेत्यांना होवू लागली आहे. बाळासाहेब ठाकरेंविरोधात पोस्ट केल्याने रायगडमधील महाड तालुका शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणात महाडचे आमदार भरत गोगावले यांचे पुत्र आणि युवा सेनेचे विकास गोगावले यांच्यासह 150 शिवसैनिकांविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. आगामी निवडणुकीच्या माहोलात चुलखंडात जावो तुमचं राजकारण म्हणत असलो तरी ते सुरूच राहणार किंबहुना यामध्ये एखाद्याला जीवालाही मुकावं लागेल. जे राजकारण, समाजकारण, धर्मकारण दुसर्यांचा द्वेष, घृणा करते ते आपल्याकडे मोठ्या प्रमाणात रूजू पाहत असेल तर निश्चितच आपण ‘समाजशील’प्राणी आहोत का, याचा क्षणभर का होईना, विचार करण्याची वेळ आली आहे.”

