HomeArchiveवायुगळतीचे आणखी किती...

वायुगळतीचे आणखी किती बळी?

Details
वायुगळतीचे आणखी किती बळी?

    14-May-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
रविवारी एक वाईट घटना घडली. बोईसरच्या केमिकल कंपनीत झालेल्या वायुगळतीत तीन कामगारांचा मृत्यू झाला. ही वायुगळती इतकी भयानक होती की, कामगारांवर उपचार करणारे डॉक्टरदेखील अत्यवस्थ झाले. तारापूर एमआयडीसीतील अॅक्सवायर कंपनीत रासायनिक प्रक्रिया सुरू असताना ही दुर्घटना घडली. वायुगळतीनंतर कंपनी सील करण्यात आली आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाने तातडीने कारवाई केल्यामुळेच वायुगळती थांबली. आता कंपनीचा ताबा पोलिसांनी घेतला आहे. याप्रकरणी पोलीस सविस्तर चौकशी करतीलच. पण प्रश्न असा आहे की, विषारी वायुगळतीसारखे भीषण प्रकार घडतातच कसे? एखाद्या आस्थापनात शॉर्टसर्कीटमुळे लागणारी आग ही निष्काळजीपणामुळे लागलेली असते असा सर्वसाधारण निष्कर्ष काढला जातो. तसेच वायुगळतीसारखे प्रकार हेदेखील निष्काळजीपणाच्या गुन्ह्यातच मोडतात. त्यात भारत हा वायुगळतीच्या बाबतीत जगातील सर्वाधिक होरपळलेला देश आहे.

भोपाळ वायू दुर्घटना ही 35 वर्षांपूर्वी भारतातच घडली. दि. 2-3 डिसेंबर, 1984च्या रात्री युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड या मध्य प्रदेशातील भोपाळ येथील कारखान्यात वायुगळती झाली. जगातील ही वायुगळतीची सर्वाधिक भीषण व मोठी दुर्घटना मानली जाते. पाच लाखांहून अधिक लोक मेथाईल इसोकाईनेट (MIC) या विषारी वायुमुळे बाधित झाले. कंपनीच्या आसपास वसलेल्या गावांमध्ये आणि छोट्या शहरांमध्ये हा वायू मृत्यूचे तांडव नृत्य करीत पसरला. त्यावेळी मृतांची अधिकृत संख्या ही 2,259 इतकी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारने या वायुगळतीमुळे 3,787 लोक मृत्यूमुखी पडल्याचे जाहीर केले. 2006 साली सरकारने कोर्टात जे शपथपत्र सादर केले, त्यात 5 लाख 58 हजार 125 लोक बाधित झाल्याचे म्हटले होते. त्यांपैकी 38 हजार 478 हे तात्पुरते जखमी झाले तर 3 हजार 900 लोक कायमचे अपंग झाल्याचे म्हटले होते. दुर्घटनेनंतरच्या पुढील दोन आठवड्यात 8 हजार लोक मरण पावले तर वायुगळतीमुळे झालेल्या आजारातून आणखी 8 हजार मरण पावल्याचे सरकारने म्हटले होते.

या दुर्घटनेचे कारण अद्यापही वादाचा विषय बनले आहे. भारत सरकार आणि स्थानिक कार्यकर्ते यांच्या म्हणण्यानुसार संबंधित प्लांटची निगा नीट न राखल्यामुळे एमआयसीच्या टाकीत पाणी शिरले आणि त्यातूनच ही दुर्घटना घडली. पण युनियन कार्बाईड कॉर्पोरेशन आजही सांगत आहे की, `ही दुर्घटना म्हणजे घातपात होता.’ ते काहीही असो. या भीषण दुर्घटनेपासून आपण आजपर्यंत काहीही बोध घेतलेला नाही, हे देशात वेळोवेळी घडत असणाऱ्या वायुगळतीमुळे दिसून येते. ज्या कारखान्यात विषारी वायू वापरला जातो तेथे अत्याधिक काळजी घेण्याची आवश्यकता असते. तेथील सुरक्षिततेबाबत स्थानिक प्रशासनाने कठोर उपाययोजना करणे अपेक्षित असते. त्यासाठी सुरक्षिततेचे ऑडीट वर्षातून एकदा तरी घडलेच पाहिजे. पण दुर्दैवाने आपल्या देशात तसे घडताना दिसत नाही. वायुगळती असो अथवा इतर अपघात. सर्वत्र निष्काळजीपणातून भीषण दुर्घटना घडत असल्याचे दिसून येते.

काही दिवसांपूर्वी भायखळा येथील सुप्रसिद्ध जिजामाता उद्यानात असलेल्या भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयात एक लिफ्ट कोसळून ज्येष्ठ महिला डेंटीस्ट मरण पावल्या. त्यांच्यासोबत असलेली त्यांची तरूण मुलगीदेखील गंभीर जखमी झाली. चौकशीअंती कळले की, दि. 31 मार्च, 2019 रोजी लिफ्ट मेंटेनन्सच्या कराराची मुदत संपली होती. सदर लिफ्टची सर्व्हिसिंग न केल्यामुळेच हा अपघात घडला. सारांश, माणसाचा निष्काळजीपणा हा निरपराध लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरतो. यासंदर्भात आपण काय धडे घेणार आहोत?”
 

Continue reading

न्यायालये माणसे चालवतात, एआय नाही!

"न्यायालयं ही माणसांद्वारे चालवली जातात, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) नाही," अशा कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याची तातडीच्या सुनावणीची विनंती फेटाळून लावली. २०२१पासून प्रलंबित असलेल्या एका 'प्रथम अपिलावर' प्राधान्याने सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, न्यायाधीशांच्या मानवी मर्यादा...

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...
Skip to content