HomeArchiveराहुल आले, पण...

राहुल आले, पण वेळ चुकली!

Details
“राहुल आले, पण वेळ चुकली!”

    04-Mar-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com
महाराष्ट्रात 2019 मध्ये जर काँग्रेसची सत्ता आली तर सर्व गरिबांना जे चाळीत, झोपडपट्टीत, एसआरए प्रोजेक्ट, पुनर्वसन प्रकल्प आणि भाडेकरूंना 500 चौरस फुटांचे घर 10 दिवसांत देणार! आता गरिबांना 260 फुटांचे घर मिळते पण आम्ही 500 फुटांचे घर देणार, अशा जोरदार घोषणा राहुल गांधी यांनी मुंबईत येऊन केल्या खऱ्या पण, त्यांचा अपेक्षित परिणाम मात्र झाला नाही. कोणत्याही पक्षासाठी निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ ही एक महत्त्वाची घटना असते. त्यातही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरूवात ही सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची घटना ठरत आहे. येणाऱ्या निवडणुकीत विशेषतः काँग्रेसचे भवितव्य घडणार वा बिघडणार आहे. महाराष्ट्र हे मोठे व महत्त्वाचे राज्य तर आहेच, पण इथे काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रसबरोबर चांगली आघाडी बांधलेली आहे. त्यामुळे या राज्याकडून त्या पक्षाच्या अधिक आशा तयार झाल्या आहेत. पण महाराष्ट्रातील काँग्रेसच्या लोकसभा मोहिमेच्या प्रचाराच्या शुभारंभाला थोडी नाटच लागली. एखाद्या घटनेला किती प्रसिद्धी मिळायची याचे विधिलिखित निराळेच असते. ते कुणालाच आधी कळत नाही. सारे हिशेब करून, सारे आडाखे बांधून काँग्रसने लोकसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेचा जोरदार शुभारंभ नियोजित केला होता, पण त्यात दुर्दैवाने पाकड्यांच्या वाकड्या चालीत कडमडल्या.

पुलवामा घटनेचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने कारवाई केल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने भारतीय हवाई हद्दीचा भंग करीत विमाने घुसवली आणि लष्करी ठाण्यांवर बाँब टाकण्याचे प्रयत्न केले. त्यांना अत्यंत कठोर उत्तर भारतीय हवाई दलाने पुन्हा दिले आणि पाकिस्तानचे एक एफ-१६ विमान खाली पाडले. त्या हवाई लढाईत आपलेही एक मिग २९ विमान पाक एफ- ६ च्या गोळामारीत सापडले आणि पडले. ही दोन्ही विमाने पाकिस्तानी हद्दीत पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये कोसळली आणि आपले शूर वैमानिक अभिनंदन वर्थमान शत्रूच्या ताब्यात सापडले. त्यांच्याही वैमानिकाला पॅरॅशूटच्या सहाय्याने एफ- १६ मधून बाहेर पडता आले पण तो त्याच्याच लोकांच्या हातून मारला गेला. ही गोष्ट त्या हवाई सैनिकासाठी नक्कीच दुर्दैवी होती. पण अभिनंदन हा शूर वैमानिक शत्रूच्या तावडीत सापडला हे कळल्यावर सारा भारत देश खवळून उठला. भारताने कठोर भूमिका घेत त्याच्या परत पाठवणीसाठी पाकिस्तानी सरकारला बाध्य केले. जगातील अनेक मोठ्या राष्ट्रांनीही आपल्यालाच मदत केली. मुख्य म्हणजे चीननेही पाकिस्तानची पाठराखण या विषयात केली नाही आणि शुक्रवारी अभिनंदनची सुटका करण्यात आली. ४८ तासांच्या आत त्याला सोडावे लागले. भारतीय सरकारच्या, भारतीय लष्कराच्या ठाम निर्धाराचा तो विजय होता. तसाच तो भारतीय परराष्ट्र धोरणाचाही मोठा विजय होता.

त्या घटनेचे कुणीच राजकारण खरेतर करूच नये. पण राजकारणावार अशा घटनांचा परिणाम होतोच होतो! प्रत्यक्षात अभिनंदनची यांची सुटका होते की नाही अशी तणावाची स्थिती तयार झाली तेव्हा महाराष्ट्राच्या भूमीत राहुल गांधी अवतरले होते. राहुल यांचे राज्यात आगमन ही काँग्रेससाठी मोठीच घटना होती. त्याला तशीच मोठी प्रसिद्धी मिळणे अपेक्षितच होते. पण ते झाले नाही. प्रसिद्धीच्या दृष्टिकोनातून राहुल यांच्या त्यादिवशी घेतलेल्या दोन्ही सभा फ्लॉप झाल्या असेच म्हणावे लागेल. त्यांना टीव्हीवर अथवा दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांमधून जितकी मिळालया हवी होती तितकी प्रसिद्धी काही मिळाली नाही. सरत्या सप्ताहात बुधवारी व गुरूवारी राहुल गांधीच्या काही सभा काँग्रेस पक्षाने रद्द केल्या होत्या. काँग्रेस कार्यकारिणीची बैठकही त्यांनी रद्द केली होती. त्या दोन दिवसांत देशात तणावाचे जे वातावरण तयार झाले होते, त्यात काँग्रेसने घेतलेल्या सभांना कितपत प्रतिसाद मिळेल अशी साधार भीती पक्षाला वाटली होती. आणि ते खरेच होते. मोदी सरकारवर कोणतीही टीका त्या दोन-तीन दिवसांत जनतेने ऐकूनच घेतली नसती. राफेल विमान खरेदीतील कथित घोटाळा हा सध्याचा राहुल गांधीसाठी मोठा प्रचाराचा मुद्दा आहे. पण तिकडे भारतीय हवाई दल पाकच्या विमानांशी हवेतून झुंज देत आहे, तुमच्या धोरणांमुळेच त्या वैमानिकांच्या हातात अत्याधुनिक असे राफेल विमान पडलेले नाही हे खरे आहे की नाही, या जनतेच्या सवालावर राहुल वा काँग्रेसकडे काय उत्तर आहे? तुम्ही जर २००९ मध्येच त्याविषयीच्या करारांना अंतिम रूप दिले असते तर काय बिघडले असते? पण, नाही तुमच्या सरकारने ते केले नाही! सारी प्रक्रिया थांबवून ठेवली. ती मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर पूर्ण केली. या साऱ्या जनतेच्या म्हणण्यालादेखील काँग्रेस पक्षाकडे काहीच उत्तर नाही.. त्यामुळे युद्धाच्या ऐन सावटात येणारे कार्यक्रमच पक्षाने रद्द् केले.

महाराष्ट्रातील दोन्ही सभांबाबतही प्रश्नचिन्हच होते. पण अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरूवारी पाक संसदेत केली, त्यावेळी आता तणाव निवळेल असे वाटले आणि म्हणूनच राहुल गांधींच्या धुळे व मुंबईतील सभा ठरलेल्या कार्यक्रमानुसारच घेण्याचा निर्णय पक्षाने घेतला. अभिनंदन यांची सुटका सभेच्या दिवशी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत होऊन जाईल असे वाटले होते. राहुल गांधी दुपारी तीननंतर पहिल्या सभेची सुरूवात करणार होते. त्यामुळे काहीच हरकत नव्हती. उलट अभिनंदन यांच्या आगमनाचा आनंद देश साजरा करत असताना पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका करण्याची संधी घेता येईल असा हिशेब प्रदेश काँग्रेसेचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केला आणि ते कामाला लागले. राहुल त्यादिवशी सकाळीच मुंबईत दाखल झाले. त्यांनी आल्याआल्या जे पहिले काही कार्यक्रम घेतले त्यात त्यांनी पक्षांतर्गत वाद मिटवण्यावर भर दिला. आणखी एक चांगले काम त्यांनी केले. ते दिवंगत नेते गुरूदास कामत यांच्या घरी चेंबूरला जाऊन आले. गुरूदास कामतांच्या कुटुंबियांची भेट त्यांनी घेतली. खरेतर कामत गेले त्याला बरेच दिवस झाले. त्यावेळेस सोनिया गांधी व राहुल यांनी कामत कुटुंबियांचे सांत्वन केलेच होते. मग आता ते अचानक त्यांच्या घरी का बरे गेले?

त्या एका पाऊलाने राहुल यांनी पक्षापासून दुरावलेल्या कामत गटाला पुन्हा काँग्रेसबरोबर जोडून घेतले, असे म्हणता येईल. कामत २०१४ मध्ये शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांच्याकडून पराभूत झाले होते. त्याजागी कुणाला लढवावे असा प्रश्न पक्षापुढे आहे. श्रीमती कामत यांचा विचार राहुल गांधी त्या जागेसाठी करू शकतात. राहूल यांनी प्रिया दत्त यांचीही भेट घेतली. प्रिया दत्त यांचा पराभव भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी केला होता. दत्त या गेली काही वर्षे संजय निरूपम यांच्या कामाच्या पद्धतीवर नाराज आहेत. काँग्रेस पक्षावरही त्या नाराज दिसतात. मध्यंतरी त्यांनी पक्षाच्या सर्व केंद्रीय पदांचाही राजीनामा दिला होता. पक्षाच्या स्थानिक कार्यक्रमातही प्रिया दत्त येत नव्हत्या. ती नाराजी व गैरसमज दूर करून लोकसभा निवडणुकीत प्रिया यांना उभे राहण्यासाठी उद्द्युक्त करण्यात राहुल यांना यश आले आहे. ही गोष्टही काँग्रेससाठी चांगली झाली.

धुळ्याऐवजी नंदुरबारमधून राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील पक्षाच्या प्रचाराची सुरूवात करावी असे राज्यातील काँग्रेस नेत्यांना वाटत होते. तसा त्यांचा आग्रहदेखील होता. सोनिया गांधींच्या राजकारणातली प्रवेशाची सभाही नंदुरबारलाच झाली होती आणि इंदिरा गांधी याही तिथूनच राज्यातील प्रचाराचा शुभारंभ करत असत. राजीव गंधी यांच्याही चांगल्या सभा नंदुरबारलाच झाल्या होत्या. त्या जागेचा काँग्रेससाठी फायदेशीर गुण आहे.. त्याचा फायदा पक्षाला व्हावा असे या नेत्यांना वाटत होते. पण राहुल यांनी धुळे शहराची निवड प्रचाराच्या शुभारंभासाठी केली. ते आले आणि इकडे अभिनंदन मात्र भारतात आले नाहीत. यांच्या सुटकेची वेळ लांबत राहिली. त्याचा सभेवर परिणाम झालाच. अटारी-वाघा सीमेवर सारे टीव्ही चॅनेलचे कॅमेरे रोखले गेले, देशाचाही श्वास रोखला गेला. “अभिनंदन आता येतील, मग येतील, वेळ थोडी पुढे गेली आहे, ते साडेपाचला येतील, काही झाले तरी साडेसहाच्या सुमारास सूर्यास्त होईल, त्याआधी अभिनंदन नक्कीच सीमा ओलांडतील..” अशा प्रकराच्या ब्रेकिंग न्यूज सतत येत होत्या. त्यात राहुल यांच्या सभेच्या बातम्या सहाजिकच मारल्या गेल्या.”
 

Continue reading

दिल्ली विधानसभा परिसरात मुखवटाधारी व्यक्तीकडून सुरक्षेची ऐसीतैशी

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधानसभा संकुलात सोमवारी दुपारी सुरक्षेचा मोठा भंग झाल्याची खळबळजनक घटना घडली. एका मुखवटाधारी व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या 'टाटा सफारी' कारने विधानसभेचे लोखंडी गेट तोडून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे, या व्यक्तीने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर पुष्पगुच्छ ठेवला...

माझा एकच बाप – बाळासाहेब ठाकरे!

माझा एकच बाप - बाळासाहेब ठाकरे! आम्ही "मार्मिक"मुळे घडलो. आमची राजकीय जडणघडण "मार्मिक"मुळे आकाराला आली. जुना स्टँड, जळगाव जाऊन आम्ही मार्मिक घ्यायचो, तेव्हा सामनासुद्धा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी यायचा. मार्मिक आम्ही 100% वाचून काढायचो. अशी माध्यमे हवीत, समाज घडवणारी अन् माणसे...

महाराष्ट्र भाजपाने फुंकला 2029च्या निवडणुकीचा शंख!

देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या विचारधारेविषयी विश्वासाचे, सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाचा योग्य वापर करून घेण्यासाठी कालबद्ध रीतीने कार्यक्रम आखून 2029चा संपूर्ण यशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करावे, आणि देशभक्ती, राष्ट्रीयत्व आणि...
Skip to content