Details
रावेरची ‘रक्षा’ कोणाकडे?
20-Apr-2019
| 0
”
अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार
atulm2001@gmail.com
राज्याच्या राजकारणात उत्तर महाराष्ट्रातील नेहमीच महत्त्वपूर्ण राहिलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघात यावेळी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात कांटे की टक्कर होणार असून भाजप आपला गड कायम राखणार की रावेरकरांची रक्षा काँग्रेस उमेदवार करणार हे लवकरच समजेल. वर्षानुवर्षे भाजपच्या अधिपत्याखाली राहिलेल्या या मतदारसंघात फक्त दोन वेळाच भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. उत्तर महाराष्ट्र, विशेषतः खान्देशच्या राजकारणात गेली काही वर्षे माजी मंत्री आणि भाजपचे वजनदार नेते एकनाथ खडसे यांचे प्राबल्य राहिले आहे. अनेक वर्षे ते आपला राजकीय दबदबा राखून होते. नाथाभाऊंना आडवे जाण्याची कुणाची हिंमत नव्हती. या भागात त्यांनी पक्ष रूजवायला मेहनत घेतली. नाथा बोले पक्ष हाले अशी एकवेळ परिस्थिती होती. पण राजकारणात कोणीच कधी सदासर्वदा पॉवरफुल राहत नाही आणि याच उक्तीप्रमाणे नाथा यांना पक्षांतर्गत आव्हान गिरीश महाजन यांच्या रूपाने उभे राहिले.
नाथाभाऊ मंत्री असताना काही प्रकरणांत त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागला आणि मातब्बर नेते असूनही राजकीय विजनवास त्यांच्या खात्यावर लिहिला गेला. त्यांची राजकीय ओहोटी सुरू झाली. त्याचवेळी गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाची घोडदौड सुरू झाली. महाजन पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाऊ लागले. हा झाला इतिहास. 2014 च्या मोदी लाटेत भाजपच्या रक्षा खडसे विजयी झाल्या. रक्षा या एकनाथ खडसे यांच्या स्नुषा. परिणामी यावेळीसुद्धा रक्षा यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार हे निश्चित होते. गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहे. भाजपांतर्गत गटबाजीचा फटका यावेळी रक्षा यांना बसू शकतो. कारण येथेही खडसे आणि महाजन यांना मानणारे दोन गट आहेत आणि त्यांच्यात कुरघोडीचे राजकारण नेहमी पाहवयास मिळते. या निवडणुकीतसुद्धा महाजन गट किती प्रामाणिकपणे खडसे यांना मदत करतो हे पाहणे महत्त्वपूर्ण आहे. त्यातच भाजपने शिवसेनेसोबत युती केली असली तरी येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांचे आणि खडसे यांचे अजिबात पटत नाही. त्यांच्यातून विस्तवसुद्धा जात नाही. त्यामुळे शिवसेनेचेही पाठबळ खडसे यांना कितपत राहील यावरच विजयाचे गणित मांडले जाऊ शकते.
काँग्रेसने डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पाटील यांची प्रतिमा आणि काँग्रेसांतर्गत सर्व गट एकत्र काम करत असल्याने तसेच राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्तेसुद्धा एकदिलाने काम करत असल्याने पाटील यांना विजयाची खात्री आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच आघाडीतील घटक पक्ष यांची ताकद पाटील यांच्यामागे उभी आहे. या मतदारसंघात लेवा समाजाची संख्या मोठी आहे आणि यावेळी हे दोन्ही उमेदवार लेवा समाजाचे असल्याने त्यांना इतर समाजाच्या मतावर अवलंबून राहवे लागेल. त्यातच नितीन काडेलकर हे वंचितचे उमेदवार कोणाची मते खातात यावरही विजयाची पताका कुणाची फडकते हे अवलंबून आहे. मतदारसंघात अद्यापही अनेक समस्या आहेत. सिंचनाचा प्रश्न कायम आहे, केळीवर आधारित उद्योग येथे अद्याप आले नाहीत, बेरोजगारीची समस्या आहेच. या प्रश्नांचाही परिणाम निवडणुकीत दिसणार आहे.”

