Details
राफेलनंतर आता अगस्ता आरोपांचे भिरभिरे!
02-Jan-2019
| 0
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
shail.dinman@gmail.com
राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीतील कथित गैरव्यवहार, आक्षेप याबद्दल यथेच्छ शब्दच्छल करून झाल्यावर भारतीय जनता पार्टी काहीशी कोंडीत सापडली होती. त्याचा फटका विधानसभा निवडणुकांतही बसलाच. मध्य प्रदेश, राजस्थानसह चारही राज्यांमध्ये स्थानिक मुद्दे प्रभावी ठरले असले तरी राफेलचे ढोल काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी बडवले होते. त्याचाही काही प्रमाणात प्रभाव मतदारांवर पडला हे नाकारता येणार नाही. मात्र तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे प्रख्यात मौन काही सोडले नाही. उलट सरकारने दिलेल्या माहितीवर विसंबून राफेल प्रकरणातून अंग काढून घेऊ पाहणारे सर्वोच्च न्यायालयच व्याकरणात कच्चे आहे असे दर्शवून सर्वोच्च न्यायालयाने जणू क्लीन चीटच दिली आहे या आवेशात भाजपाच्या पत्रकार परिषदा आता दररोज सुरू आहेत. मोदी यांनी ते काम मंत्र्यांवर, नेत्यांवर सोपवले आहे. राफेल प्रकरणात विरोधी पक्षांनी जे मुद्दे किंवा आक्षेप उपस्थित केले आहेत त्याविषयी भाजपा किंवा मोदी स्वत: चकार शब्द उच्चारायला तयार नाहीत. मूळ करार आणि आताच्या करारातील तफावत, किंमतीमधील जमीन अस्मानाचा फरक, १२६ विमानांऐवजी फक्त ३६ च विमाने का आणि अर्थातच एचएएलला डावलून रिलायन्सवर विश्वास का, हे विरोधी पक्षांचे म्हणजेच मुख्यत्वेकरून काँग्रेसचे मुख्य आक्षेप आहेत. याचे उत्तर त्यांना भाजपाकडून हवे आहे. त्याचे नेमके उत्तर न देता भाजपाचे नेते, मंत्री पत्रकार परिषदा घेत आहेत.
इकडे भाजपा आणि तिकडून काँग्रेस असा कर्णकर्कश कलह सुरू असताना अचानक अगस्ता वेस्टलँडचे भिरभिरे नवी दिल्लीच्या नभांगणात ख्रिश्चन मिशेलच्या रूपात अवतरले आणि भाजपाला जणू मुक्तीचा मार्गच दिसला. दिल्लीत पंतप्रधान होऊ घातलेल्या मुलाची इटालियन आई, मिसेस गांधी ते कुणी आर अशा सुरस आणि रंजक कहाण्या मिशेलच्या मुखातून बाहेर पडल्या असल्याचे इडी सांगत आहे, असे संदेशवहन सुरू झाले. इडीकडून कोर्टातही तसेच सांगितले गेले आणि मोदी नुकतेच एका सभेत मिशेलमामा बोलेंगे.. म्हणाले होते त्याची आठवण अनेकांना झाली. मोदी बोलले आणि दोन दिवसातच मिशेलमामा इडीसमोर पोपटासारखे इटालियन स्त्री, रहस्यमय व्यक्ती आरबद्दल घडाघडा बोलत असल्याचे कोर्टात सांगण्यात आले. योगायोगांवर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण घडले ते असे. आणि यातूनच भाजपाला काँग्रेसवर भिरकवण्यासाठी आरोपांचा दारूगोळा मिळाला. तिकडे दिल्लीत अगस्ता प्रकरणात काँग्रेसने केलेल्या कथित भ्रष्टाचाराचे आणि मिसेस गांधी वगैरे रंजक बाबींचे संदेशवहन वेगाने होऊ लागले तेव्हाच भाजपाच्या नेत्यांनींही काँग्रेसच्या दिशेने अगस्ता प्रकरणाशी संबंधित आरोपांचे भिरभिरे सोडले.
महाराष्ट्रात ही जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार पाडली. पक्षीय पातळीवरच्या या आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात त्यांनी काँग्रेसच्या दिशेने आरोपांची राळ उडवली. फडणवीस सरकारचे प्रमुख म्हणून धोरणात्मक काही बोलतील अशी पत्रकार परिषदेला उपस्थित पत्रकारांची अपेक्षा होती. पण मुख्यमंत्र्यांची ही पत्रकार परिषद प्रत्यक्षात भाजपाच्या महाराष्ट्रातील तरूण तडफदार नेत्याची आरोप परिषद ठरली. फडणवीस काँग्रेसवर अगस्ता प्रकरणात तुटून पडले आणि शिवसेनेवरही घसरले. शिवसेना राज्य सरकारमधील त्यांचा मित्रपक्ष असल्यामुळे शिवसेनेची त्यांना आठवण येणे स्वाभाविक मानले तरी अगस्ता वेस्टलँड, काँग्रेस आणि त्यांच्या इतर आरोपांचा इथल्या सरकारशी काय संबंध, हे कुणीच त्यांना विचारले नाही. अगस्ता हेलिकॉप्टर खरेदीत काँग्रेसच्या नेत्यांनी ५२ टक्के दलाली घेतली असून याप्रकरणी झालेल्या तपासात चार वेळा युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी तर काही वेळा राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख आल्याने राहुल गांधी यांनी याप्रकरणी खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
भाजपा नेते म्हणून त्यांनी पक्षाची बाजू सावरणे, प्रतिपक्षाला नामोहरम करण्यासाठी आरोपांच्या फैरी झाडणे, जाब विचारणे, आपल्या पक्षनेतृत्त्वाच्या आदेशानुसार पत्रकार परिषद घेणे यात काहीही गैर नाही. प्रश्न फक्त आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार विक्रांत पाटील म्हणतात तसा, ते मुख्यमंत्री म्हणून बोलले की नेता म्हणून हा आहे.
राफेलप्रमाणेच अगस्ता खरेदी प्रकरणातही गोलमाल असू शकते. पण, अगस्ता वेस्टलँडचे कंत्राट युपीए सरकारनेच रद्द केले होते. कंपनीला दिलेले पैसेही तीन हेलिकॉप्टर आणि व्याजासहीत वसूल केले. कंपनीवर बंदी घातली होती, या बाबी कशा नजरेआड करता येतील? जी कंपनी ब्लॅकलिस्ट ठरवली गेली तिची बंदी उठवून तिला मेक इन इंडियात सहभागी का करून घेतले, याचेही उत्तर भाजपाला द्यावे लागेल. देशाच्या संरक्षणाशी निगडीत असलेली अशी प्रकरणे निवडणुकांपुरती दोन्ही पक्षांनी वापरू नयेत. जनतेला स्वच्छ आणि स्पष्ट उत्तरे हवी आहेत. नाहीतर वृथा शब्दच्छल करणाऱ्या या पक्षांना जनताच भिरकावून देईल.”

