Details
मोदींच्या `त्या’ मुलाखतीचे रहस्य आजही गडदच!
04-May-2019
| 0
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com
महाराष्ट्रातील निवडणुकीच्या चौथ्या व अखेरीच्या टप्प्याचे मतदान पार पडत असताना देशातीलही मतदानाचा चौथा टप्पा पार पडला. सोमवारी झालेल्या मतदानानंतर देशात सुमारे पावणे चारशे मतदारसंघांमधील निवडणुका पार पडल्या. म्हणजेच सतराव्या लोकसभेमध्ये कोणत्या पक्षाचे सरकार यायचे हे जनतेने याआधीच नक्की करून टाकलेले आहे हे उघड आहे! तिसरा टप्पा पार पडला आणि चौथ्यासाठीचे मतदान चार दिवस लांब असताना वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचंड लोकप्रियतेचे दर्शन झाले आणि त्याचवेळी त्यांच्यामागे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सारे घटकपक्ष एकदिलाने, एकसंघपणाने उभे आहेत हेही देशाला दिसून आले. एकीकडे एकमेकांच्या उरावर बसणारे विरोधी पक्षांचे नेते व कार्यकर्ते आणि दुसरीकडे एकदिलाने उभी असणारी सत्तारूढ आघाडी असे चित्र सहाजिकच मतदारांपुढे गेले.
विरोधकांच्या ऐक्याचे धिंडवडे निघालेले आपण पाहतोच आहोत. मोदी-शाह नकोत, भाजपा नको असे म्हणत कर्नाटकाच्या निवडणुकीनंतर एका रांगेत उभ्या रहिलेल्या विरोधी पक्ष नेत्यांमध्ये आता चार ते पाच फळ्या स्वतंत्ररीत्या व एकमेकांच्या विरोधात काम करताना दिसत आहेत. ममतादीदींनी बंगालमध्ये काँग्रेसला सोबत घेतलेले नाही. त्यांनी कम्युनिस्टांना सोबत घेण्याचा प्रश्नच नाही. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशात सपा व बसपा यांनी काँग्रेसला झिडकारले आहे. दिल्लीत युती करूया यासाठी आपचे अरविंद केजरीवाल राहुल गांधींच्या मागे लागले होते. पण हरयाणात त्यांना काँग्रेसची साथ नको होती. त्यामुळे दिल्लीतही काँग्रेसने आपला ठेंगा दाखवला. चंद्राबाबूंनी तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जागा दिल्या. मात्र आंध्रात ते काँग्रेसला जवळ करायला तयार नाहीत. अशा साऱ्या स्थितीत एक नेता, एक अजेंडा घेऊन उभा असणारा रालोआ आणि कोणत्याही मुद्दयावर एकत्र नसणारी संपुआ वा डावी वा बंगाली वा तेलगू आघाडी यांच्यात विषमच लढाई आहे हे उघड आहे. शिवाय, पंतप्रधान मोदींनी मुंबईतील सभेत सांगितले त्याप्रमाणे 2014 ला काँग्रेसने आजवरच्या इतिहासातली सर्वात किमान जागी विजय नोंदवला तर 2019 मध्ये काँग्रेसने इतिहासात किमान जागांवर उमेदवार उभे करण्याचा विक्रम केला.
विरोधकांच्या तुलनेत सत्तारूढ आघाडी मजबूत आहे, मैत्री घट्ट आहे हा संदेश, मोदींच्या अतिविशाल अशा वाराणसी रोड शोमुळे, नक्कीच जनतेमध्ये गेला आहे. वाराणसीमध्ये त्यादिवशी दिसलेला माहौल हा रालोआच्या विजयाचा माहौल होता असेच साऱ्या टीव्ही चॅनेलवरील त्यादिवशीची दृष्ये आणि चर्चा पाहून नक्कीच वाटून गेले. तो रोड शो उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या नेत्याचा होता की देश जिंकून आलेल्या विजयी वीराचा होता असे वाटावे अशी स्थिती त्यादिवशी काशी ऊर्फ बनारस ऊर्फ वाराणसीमध्ये दिसून गेली. मोदींच्या या अतिविशाल रोड शोच्या आदी दोन दिवस एक आगळीवेगली मुलाखत सर्वच टीव्ही चॅनेलवरून दाखवली गेली.
विख्यात सिने कलावंत अक्षय कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिल्लीतील, 1 लोक न्याय मार्ग, या अधिकृत शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी मारलेल्या अगदीच निराळ्या विषयावरील गप्पा असा त्या मुलाखतीचा विषय होता. पंतप्रधानांना आंबा आवडतो का? हा त्या मुलाखतीतील पहिला प्रश्न होता. मोदी ट्विटर बघतात व त्यावर आलेली टीकाही ते पाहतात, कधी त्याचाही आनंद घेतात, हेही मुलाखतीतून पुढे आले. पंतप्रधान म्हणून अतिशय कडक असणारे मोदी दिवसाच्या चोवीस तासांपैकी फक्त साडेतीन तास कसे काय झोपू शकतात आणि इतकी कमी विश्रांती घेऊ नका हा व्यक्तीगत मित्र झालेल्या अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांचा सल्लाही ते कसे मानत नाहीत हे कोडे त्यांच्या उत्तरानेही मात्र सुटलेले नाही!
मोदी शासकीय बैठकीतही एखादा विनोद करतात, मोदींना सर्दी होते तेव्हा ते फक्त गरम पाणी पितात व 24 वा 48 तास उपवास करतात, त्यांनी एक हजार किलोमीटर अंतर पायी चालून कैलास मानसरोवरची यात्रा केली, अशा थक्क करणाऱ्या माहित्याही या मुलाखतीने दिल्या. पंतप्रधान मोदी हे कितीतरी वर्षे स्वतःचे कपडे स्वतःच धूत असत, कपडे धुण्याचा व प्रवासात बाळगण्याचा त्रास थोडा कमी व्हावा यासाठी त्यांनी शर्टाच्या बाह्या स्वतः कापून टाकल्या व अलिकडे फॅशन बनलेल्या मोदी कुर्त्याचा जन्म झाला, पुण्यातली समाजवादी मंडळी रिक्षात बसण्याच्या आधी थोडे दूर अंतर चालत जात असत म्हणजे लोकांना वाटावे की किती साधा माणूस आहे, रिक्षातही बसत नाही.. अशा अफलातून किस्सेवजा घटना अक्षय कुमारांमुळे आपल्याला कळल्या.
निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडलेला व तिसरा टप्पा पार पडत असतानाच्या टप्प्यावर आलेल्या या मुलाखतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अगदी अपरिचित असे पैलू जनतेसमोर आले, हे अतिशय महत्त्वाचे होते. पंतप्रधानांची विरोधकांनी तयार केलेली एक प्रतिमा आहे. एक प्रतिमा त्यांच्या भक्तांनी, चाहत्यांनीही मनात जपलेली आहे. या दोन्ही प्रतिमांना छेद देणारे खरेखुरे नरेंद्र मोदी कसे आहेत हे जनतेसमोर आणण्याचे मोठे काम अक्षय कुमार यांच्या या आगळ्या मुलाखतीने साधले यात शंका नाही. पण, अक्षय कुमार यांना ही मुलाखत घ्यायला कोणी सांगितले? हा डीडी नॅशनलचा कार्यक्रम होता का? की नमो टीव्हीचा हा उपक्रम होता? यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिलेली होती का? अक्षय कुमार यांना या मुलाखतीसाठी किती मानधन दिले गेले की त्यांनी दोस्ती खात्यात मुलाखत घेतली? असे अनेक प्रश्न यात पडतात. पण त्यांची उत्तरे अद्यापी पुढे आलेली नाहीत. ना विरोधकांनी त्यादृष्टीने मुद्दे उपस्थित केले आहेत ना निवडणूक आयोगाने सवाल पुढे केले आहेत!
कोणतीही मुलाखत घेतली जाते तेव्हा त्याची एक प्रस्तावना वाचकांसाठी वा श्रोत्यांसाठी प्रेक्षकांसाठीही केली जाते. ही मुलाखत कोणासाठी व कधी घेतली गेली आहे, मुलाखतीचे प्रयोजन काय हेही त्यातून कळावे अशी अपेक्षा असते. पण अक्षय कुमार यांच्या मुलाखतीच्या सुरूवातीला ते स्वतः काहीच तसे निवेदन वगैरे करत नाहीत. पंतप्रधान त्यांच्या शासकीय निवासस्थानातील एका छोट्या बोळकांडीसारख्या रस्त्यातून चालत पुढे येतात. अक्षय व्हरांड्यातील खुर्चीतून उठून पुढे येतो व दोघे बोलायला सुरूवात करतात अशी या मुलाखतीची सुरूवात होते. ही मुलाखत एकाचवेळी देशातली बहुतेक सर्व वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केली, याचा अर्थ तसे पूर्ण नियोजन आधीच झालेले होते. तासाभराची ही मुलाखत दाखवण्यासाठी या वृत्तवाहिन्यांना किती कोटी रूपये मोजले गेले की या वृत्तवाहिन्यांनीच त्यांच्या टीआरपीतील भक्कम वाढीसाठी अक्षय कुमारला वा भाजपा निवडणूक फंडाला काही रकमा देऊ केल्या, हेही सामान्य प्रेक्षक श्रोत्यांना कळायला वाव नाही! पण ही मुलाखत अतिशय उत्तम होती, त्यांचे प्रश्न सुरेख होते, लोकांना मोदींविषयी जे जे ऐकण्याची, समजून घेण्याची इच्छा आजवर झालेली असेल, ते ते सारे देण्याचा प्रयत्न त्या मुलाखतीने नक्कीच केला. त्या सर्व दृष्टीने ही मुलाखत हा एक उत्तम प्रयोग होता, यशस्वी प्रयोगही होता यात शंका नाही.
असाच एक उत्तम टीव्ही प्रयोग आपण महाराष्ट्रातही गतवर्षी पहिला होता. नेहमीच्या पत्रकार मुलाखकारांना बाजूला सारून निराळ्याच व्यक्तींना मुलाखतकार म्हणून पुढे आणण्याचा प्रयोग महाराष्ट्रात राज ठाकरे व शरद पवार यांच्या त्या प्रकट मुलाखतीने केला. 2018 मध्ये ही मुलाखत झाली व तीही भरपूर गाजली. राज ठाकरेंना राजकारणबाह्य व्यक्तिमत्त्व म्हणणे कठीण आहे. पण त्यांनी कलावंत व संस्कृतिक जीवनातील भाष्यकार या नात्यानेही शरद पवारांना त्या मुलाखतीत चांगल्या पद्धतीने बोलते केले होते. लोकांना ती मुलाखत चांगलीच भावली होती. सध्या राज ठाकरेंनी पवारांसाठी जाहीर सभा घेत मोदीच्या विरोधात मोठी वातावरण निर्मिती केली. त्या उपक्रमाची, या सहाकार्य कराराची बीजे त्या प्रकट मुलाखतीत रूजली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही! पण राज ठाकरे व अक्षय कुमार यांच्यात मूलभूत फरक असा आहे की अक्षय कुमार हे लोकप्रिय अभिनेते तर आहेतच पण समाजिक जाणिवेतून चांगले चित्रपट देणारे निर्मातेही ते बनले आहेत. देशाला ते सुपरिचित आहेतच. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक टास्क मास्टर म्हणून लोकांना माहित आहेत. या दोघांनी निराळ्या वातावरणात निराळ्या ढंगात मारलेल्या मनमोकळ्या गप्पा ऐकणे हा आनंददायक अनुभव होता. निवडणुकीच्या ऐनभरात हा आनंद जनतेला दिल्यामुळे काही राजकीय उद्द्येशही नक्कीच साधला गेला यातही शंका नाही!”

