Details
मावळ-शिरूरमध्ये धक्कादायक निकाल!
17-Apr-2019
| 0
”
विजय भोसले, मुख्य वार्ताहर, केसरी
bhosale.vijay53@ gmail.com
देशात लोकसभा निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात 91 मतदारसंघात मतदान झाले. यावेळी अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रामध्ये गडबडी झाल्याच्या तक्रारी झाल्या. सुमारे 19 निवडणूक अधिकार्यां वर निवडणूक आयोगाने कारवाई केली. दुसर्यात बाजूला काँग्रेसचे कपिल सिब्बल यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत जनतेची व देशाची फसवणूक कशाप्रकारे केली याची पुराव्यासह माहिती दिली. मात्र, प्रसारमाध्यमांमध्ये याची साधी दखलही घेतली गेली नाही. समाज माध्यमातून ही माहिती पसरल्यामुळे जनतेपर्यंत हे सगळे पोहोचले.
डिजीटल इंडियाच्या माध्यमातून अमरावती भागातील हारिसाल हे गाव डिजीटल झाल्याचे दाखविण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र, हे गाव बनावट असल्याचा भांडाफोड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उघडे पाडले. सांगण्याचे तात्पर्य यावेळेस मोदी लाट नाहीच. मात्र, ज्या पध्दतीने खोटे बोल पण रेटून बोल याप्रमाणे भाजपची प्रचारयंत्रणा चालू आहे ते मात्र, जनतेसमोर उघड झाले आहे. ही परिस्थिती देशभरच आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा समजला जात आहे. कारण, मावळमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार हे शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव आहेत. तर दुसर्याा बाजूला शिरूर लोकसभा मतदारसंघात तीन वेळा सतत लोकसभेत निवडून येणारे शिवाजीराव आढळराव-पाटील यांची मात्र सिने अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी बिकट वाट केली आहे. उमेदवारी अर्जानंतर आणि माघारीनंतर आता प्रचाराला रंगत आली असून या दोन्ही मतदारसंघात धक्कादायक निकाल लागले तर आश्चर्य करण्याचे कारण नाही.
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मावळ आणि शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवार कोण, असा प्रश्न राजकीय वतुर्ळात केला जात होता. सुरूवातीस मावळमधून शरद पवार निवडणूक लढविणार अशी चर्चा सुरू झाली. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जाहीर झाली नव्हती. तरी त्यांनी प्रचारयंत्रणा राबविण्यास सुरूवात केली होती. भारतीय जनता पक्षाने हा मतदारसंघ आपणास मिळावा, यासाठी जोरदार व्यूव्हरचना केली होती. बारणे निवडून येऊ शकत नाहीत असा प्रचारही प्रारंभी सुरू केला. भाजपकडे चिंचवड, मावळ आणि पनवेल असे तीन विधानसभा मतदारसंघ, त्याचबरोबर दोन महापालिका व नगरपालिका असे संख्याबळ असल्यामुळे भाजपची ही मागणी रास्त होती. शिवसेनेकडे पिंपरी, कर्जत-खालापूर अशा दोन विधानसभा आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांनी, बारणे निवडून येऊ शकत नाहीत. त्यामुळे उमेदवार बदला, अशी आग्रही मागणी लावून धरली होती. तर दुसर्याा बाजूला भाजप आणि शिवसेना या दोघांमधील वाद पराकोटीला गेला होता. युती होईल की नाही अशी शंका होती. मात्र, देशपातळीवर भाजपला मोठा फटका बसणार आहे असे सर्व्हे आल्यामुळे भाजपने दोन पाऊले मागे घेत अखेर शिवसेनेपुढे लोटागंण घातले आणि अखेर युती झाली.
बारणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात शिवसेनेने जाणीवपूर्वक वेळ लावला. त्याचबरोबर त्यांनी जगताप यांना शिवसेनेत येऊन लोकसभा लढवावी, असे निमंत्रणही दिले. मात्र, जगताप यांनी त्यास नकार दिला. शेवटी शिवसेनेने बारणे यांची उमेदवारी जाहीर केली. शिवसेनेने मावळ मतदारसंघात दोन संस्थामार्फत पाहणी करून जनतेची मते जाणून घेतली. त्यामध्ये बारणे यांच्या नावालाच अधिक पसंती मिळाली. ज्यावेळी भाजपचे नेते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी बारणे हेच उमेदवार असतील असे स्पष्ट करून भाजपकडूनही त्यांच्या नावाला मान्यता मिळवली. बारणे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर आमदार जगताप यांनी आपली थेट नाराजी व्यक्त करून निकाल वेगळा लागला तर आम्हाला जबाबदार धरू नये, अशी भूमिका मांडली. हे सर्व नाट्य घडले. मात्र, भाजपच्या काही नेत्यांना मोदी हेच पंतप्रधान झाले पाहिजेत यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगताप यांना, बारणे कोणत्याही परिस्थितीत निवडून आले पाहिजेत आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातून त्यांना अधिकाधिक मताधिक्य मिळाले पाहिजे अशी सक्त सूचना दिल्याची चर्चा आहे. वरून आदेश मिळाल्यानंतर जगताप-बारणे यांची गळाभेट झाली. त्यानंतर आमचे मनभेद नव्हते मात्र, राजकीय मतभेद होते असे स्पष्टीकरण देऊन उमेदवारी अर्ज दाखल करीत जगताप यांनी आपण बारणेबरोबर आहोत हे दाखवून दिले.
आमदार जगताप यांनी भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेऊन बारणे यांच्या प्रचाराबाबत सूचना दिल्या. एवढेच नव्हे तर त्यांनी 400 बूथ तयार केले असून त्या बूथवर भाजप कार्यकर्त्यांना जबाबदार्या सोपविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता चिंचवड विधानसभा मतदारसंघात प्रभागानुसार बैठका सुरू आहेत. दुसर्याा बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते घरोघरी प्रचाराचे काम करत असून एका कार्यकर्त्यांकडे पाच घरांची जबाबदारी सोपविली आहे. शिवाय भाजपने बारणे यांना आर्थिक मदत केली असल्याचीही चर्चा आहे. पार्थच्या उमेदवारीमुळे अनेकांना धक्का बसला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. वक्तृत्त्व नाही, यामुळे सुरूवातीस त्याच्यावर टीका झाली. मात्र, पार्थला मावळमध्ये उमेदवारी देण्यामागे पवार कुटुंबियांनीदेखील मोठा अभ्यास करून मान्यवर दोन संस्थांकडून या मतदारसंघाची पाहणी करून चाचपणी केली असता पार्थला अडचण भासणार नाही असा हिरवा कंदील मिळाल्यामुळे पार्थच्या उमेदवारीची घोषणा केली गेली.
पार्थनेदेखील मतदारसंघ ढवळून काढला आहे. दुसर्याा बाजूला अजित पवार स्वतः जातीने लक्ष घालून आजी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते, एवढेच नव्हे तर भाजपच्या प्रत्येक नगरसेवकांशी स्वतः दूरध्वनीवरून माझ्या मुलाला मदत करा, अशी विनंती करत आहेत. त्याचबरोबर अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा व त्याचे अन्य नातेवाईक यांनी संपूर्ण मतदारसंघ ढवळून काढला असून आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी त्याही अहोरात्र प्रयत्न करत आहेत. सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, माजी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे आदींनी सभा घेतल्या आहेत. पुढील आढवड्यात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज ठाकरे यांच्याही सभा होणार आहेत. शेकापचे जयंत पाटील व त्यांचे कार्यकर्ते घाटाखाली जोमाने पार्थसाठी काम करत आहेत. भाजप आणि शिवसेनेने ही जागा निवडून आणण्यासाठी मोठी कंबर कसली असली तरी 24 एप्रिलपासून मावळमध्ये खर्यान अर्थाने प्रचार रंगणार असून शिवसेनेला ही निवडणूक तशी सोपी राहिली नाही.
शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी पवार साहेबांनी एक नवखा आणि लोकप्रिय असलेला उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना निवडणूक रिंगणात आणल्यामुळे या मतदारसंघातील चित्रच बदलले आहे. संभाजी या मालिकेची लोकप्रियता त्याचबरोबर कोल्हे यांचा जनतेशी असलेला संवाद या बाबी जमेच्या आहेत. दुसर्या् बाजूला सलग तीनवेळा खासदार झालेले शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना मात्र यावेळेची निवडणूक सोपी राहिली नाही. आढळराव पाटील यांना ही निवडणूक सोपी नसल्याचा अंदाज असल्यामुळे त्यांचाही हळूहळू तोल घसरल्यामुळे त्यांनी कोल्हे यांच्या जातीचा उल्लेख करून वादाला तोंड फोडले. त्यामुळे मतदारसंघातील संपूर्ण माळी समाज एकवटला आहे. त्यांनी पक्ष न पाहता आपल्या समाजाचा माणूस ही धारणा बाळगल्यामुळे माळी समाजाचे कार्यकर्ते स्वतः तनमनधनाने प्रचारात सहभागी होऊन कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी सरसावल्याचे दिसून येत आहे.
ज्या-ज्या ठिकाणी ते प्रचाराला जातात त्याठिकाणी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत आहे. कोल्हे यांनी प्रचार करत असताना स्वतःहून आढळराव यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. एवढेच नव्हे तर आमदार महेश लांडगे यांचीही भेट घेऊन सुखद धक्का दिला. माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी भाजपचे अनेक नगरसेवक त्याठिकाणी उपस्थित होते. कोल्हे यांचा हा उदारपणा पाहून अनेकांना सुखद धक्का आणि आश्चर्य वाटले. भोसरीतून आमदार लांडगे प्रचार करतील की नाही याची शंका आढळराव-पाटलांना होती. मात्र, मुख्यमंत्र्यांकडून सूचना मिळाल्यानंतर लांडगे यांनी प्रचारयंत्रणेत भाग घेतल्यामुळे आढळराव पाटलांनी सुटकेचा निःश्वास टाकला. भोसरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. मात्र, महेश लांडगे अपक्ष निवडणूक लढवून निवडून आले. त्यामुळे सहा महिन्यानंतर होणार्याे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार असता कामा नये, असा शब्द आढळराव पाटलांकडून लांडगे यांनी घेतल्याची चर्चा आहे.
ही चौथी निवडणूक जिंकण्यासाठी आढळराव पाटलांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. राष्ट्रवादीने जुन्नर, आंबेगाव भागाची जबाबदारी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांच्यावर सोपविली आहे. तेही जातीने प्रयत्न करत आहेत. हडपसर विधानसभा मतदारसंघात कोल्हे यांना मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. या मतदारसंघातदेखील शरद पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सभा होणार आहेत. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोपाने निवडणुकीचे वातावरण ढवळून निघणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्यावर व्यक्तीगत टीका केल्यामुळे त्याचा परिणामही मतदारांमध्ये जाणवत आहे. कपिल सिब्बल यांनी भाजपच्या पाच वर्षांतील घोटाळ्याची माहिती जी उघड केली ती जनतेपर्यंत पोहोचविण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी कितपत यशस्वी होते, यावरही निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभादेखील पुणे जिल्ह्यात होणे महत्त्वाचे आहे. कारण, राफेल प्रकरणावरून गांधी यांनी थेट आव्हान दिल्यामुळे मोदी समोरासमोर येण्यास तयार नाहीत. त्यामुळे त्यांच्या भाषणाचादेखील परिणाम मतदारांवर होऊ शकतो. एकंदरीतच या दोन्ही मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात वातावरण ढवळून निघेल आणि धक्कादायक निकाल लागेल अशी परिस्थिती आतातरी जाणवत आहे.”

