Details
“मावळ, शिरूरची लढाई होणार प्रतिष्ठेची!”
24-Apr-2019
| 0
”
विजय भोसले, मुख्य वार्ताहर, केसरी
bhosale.vijay53@ gmail.com
देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असून थेट भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस असाच प्रचाराचा सामना असून आरोप-प्रत्यारोपाने वातावरण ढवळून निघाले आहे. काल मंगळवारी देशात तिसर्याच टप्प्यासाठी 14 राज्यातील 115 जागांसाठी मतदान झाले. प्रचारामध्ये भाजपने विकास, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्त्या, महागाई आदी महत्त्वाचे मुद्दे सोडून व्यक्तीगत टीका, जातीचे समीकरण, देशभक्तीचे डोस या मुद्यावर विरोधी पक्षांवर टीका करून जनतेमध्ये एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला. मात्र, यास जसाशतसे उत्तर काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष, बसपा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मनसे आदी पक्षांनी दिले. भाजपचे मुद्दे खोडून गेल्या पाच वर्षांत भाजपने जनतेची गेल्या 5 वर्षांत कशी फसवणूक केली याची पुराव्यासहित माहिती जनतेसमोर उघड केली. 29 एप्रिल रोजी मतदानाचा चौथा टप्पा असून 9 राज्यात 71 जागेसाठी मतदान होणार आहे. मावळ मतदारसंघात शरद पवार यांचा नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार निवडणूक रिंगणात असल्याने राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. दुसर्यान बाजूला शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हॅट्रिक केल्यानंतर चौथ्यांदा आपले नशीब अजमावत आहेत. राष्ट्रवादीने चित्रपट अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना येथून उमेदवारी देऊन आढळराव-पाटलांची पळता भुई थोडी केली आहे.
बारामतीचे मतदान संपल्यानंतर बुधवारपासून पवारांची सुमारे पाच हजार अनुभवी कार्यकर्त्यांची फौज मावळ मतदारसंघात दाखल होणार असल्याने आता या शेवटच्या चार दिवसांमध्ये या मतदारसंघातील चित्र वेगळे पाहयला मिळेल. भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर मंत्री पंकजा मुंडे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या प्रमुख्य नेत्यांच्या सभा आयोजित केल्या असून त्यामुळे मतदारसंघ ढवळून निघणार आहे. एंकदरीतच या दोन मतदारसंघात सत्ताधारी भाजप-शिवसेनेने आणि राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांनी कोणत्याही परिस्थितीत या दोन जागा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमदार लक्ष्मण जगताप यांची खर्यार अर्थाने सत्वपरिक्षा आहे. कारण, भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगताप यांना कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले पाहिजे, अशी समज दिल्यामुळे जगताप बारणे यांच्या प्रचाराच्या कामाला लागले आहेत. ठिकठिकाणी बैठका आणि बूथ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भाजप-शिवसेनेचा जाहीरनामा पोहोचविण्याचे काम केले जात आहे.
मात्र, शिवसेनेचे कार्यकर्ते ज्या तडफेने प्रचारात काम केले पाहिजे तसे काम करताना दिसत नाहीत. शिवसेनेचे पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार मात्र प्रामाणिकपणे काम करत आहेत. मात्र, त्यांनी ज्या ठिकाणी सभा आयोजित केली तेथे ते सभेसाठी भाषण करण्यास उठले आणि उपस्थित महिला व पुरूषांनी सभेतून काढता पाय घेतला. त्यामुळे बिचारे चाबुकस्वार यांना भाषण आटोपते घ्यावे लागले. बारणे यांनी पनवेल, उरण, कर्जत-खालापूर या तीन मतदारसंघात अधिक लक्ष केंद्रित केले आहे. पिंपरी, चिंचवड, मावळमध्ये आपणास लोक ओळखतात या गैरसमजामुळे त्यांनी इकडे वेळ कमी दिला आहे. मात्र, त्याचा फटका बसू शकतो. विशेष म्हणजे बारणे यांचे वास्तव्य असलेल्या थेरगावमधील त्यांच्या भावकीमधील काही जणांनी आघाडीचे उमेदवार पार्थ यांना पाठिंबा देऊन या भागातून अधिक मताधिक्य दिले जाईल, असे आश्वासन दिल्यामुळे बारणे यांच्या अडचणीत अधिक भर पडली आहे.
पार्थ यांनी मतदारसंघात प्रचाराच्या तीन फेर्याय पूर्ण केल्या असून त्यांच्या बोलण्यावरून त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून येत आहे. या मतदारसंघातील 40 विविध सामाजिक संघटनांनी कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होता कामा नये, यासाठी पार्थ यांना जाहीर पाठिंबा देऊन येणार्यास चार दिवसांत ठिकठिकाणी कोपरा सभा आणि पार्थ यांना पाठिंबा का, याबद्दलची माहितीपत्रके मतदारसंघात पोहोचविण्याचे काम केले जाणार आहे. बारणे यांनी आजपर्यंत चार प्रचार फेर्याप पूर्ण केल्या असून त्यांची पाचवी फेरी सुरू आहे. मोदीच पुन्हा पंतप्रधान का, हे सांगण्याचा प्रचारातून प्रयत्न केला जात आहे. मात्र, आता खर्याा अर्थाने मावळच्या प्रचारात रंगत वाढणार असून राष्ट्रवादीचे नेते पूर्ण मतदारसंघ सभा आणि कोपरा सभा घेऊन ढवळून काढणार आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघात यावेळेस आढळराव-पाटील यांनी आपला मतदारसंघ ढवळून काढला आहे. तर दुसर्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनीदेखील आपल्या तीन प्रचारफेर्यार पूर्ण केल्या असून त्यांना जनतेचा चांगला पाठिंबा मिळत आहेत. विशेष म्हणजे महिलांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. काही ठिकाणी ग्रामीण मतदारांकडे मोदी सरकार पुन्हा आले पाहिजे, अशी विचारणा केली असता थेट मोदींबद्दल नाराजी व्यक्क्त करून नको रे बाबा मोदी पुन्हा काँग्रेसच चालेल. कारण, या सरकारने शेतकरी, मजूर यांची घोर निराशा केली असून शेतीमालाला भाव मिळत नाही. आज कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर कांदा फेकत आहेत. अशा परिस्थितीत मोदींना का मतदान करायचे असा उलटा सवाल ग्रामीण भागातील शेतमजूर, शेतकरी करत आहेत. त्यामुळे शेतकर्यांकमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे. त्याचबरोबर आढळराव पाटलांनी कोल्हे यांच्या माळी जातीचा उल्लेख केल्यामुळे माळी समाज पेटून उटला असून माळी समाजाचे भाजपचे नगरसेवकदेखील कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वतः खर्च करून कोल्हे यांचा प्रचार करत आहे.
15 वर्षे आढळराव पाटील खासदार असताना त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना ताकद दिली नाही, अशी तक्रार शिवसेनेचे कार्यकर्ते करत आहेत. मात्र, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, त्यांच्यासाठी काम करत आहोत, असा सूरही दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या तीन निवडणुकांपेक्षा यावेळेस मात्र आढळराव पाटील यांनी तनमनधनाने प्रचारयंत्रणेला वाहून घेतले आहे. दुसर्याे बाजूला भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावर मतदारसंघाची जबाबदारी सोपविली आहे. पुढील सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असल्यामुळे ही निवडणूक एका अर्थाने ट्रेलर असल्याने लांडगेदेखील स्वतः जातीने प्रचारयंत्रणेत भाग घेत आहेत. मात्र, भोसरी विधानसभा शिवसेनेकडे आहे आणि लांडगे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. नंतर ते भाजपचे सहयोगी सदस्य झाले. पुढे त्यांना हा मतदारसंघ मिळणार का, याची त्यांना चिंता आहे. मात्र, त्यांनी आढळराव पाटलांकडून विधानसभेसाठी शब्द घेतल्याची चर्चा आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीला भोसरीतून आढळराव पाटलांना चांगले मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे यावेळेसही मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. दुसर्याि बाजूला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगाव तालुक्यावर पूर्णतः लक्ष केंद्रीत केले असून आजूबाजूच्या नारायणगाव, राजगुरूनगर या भागातही त्यांनी जातीने लक्ष घातले आहे. माजी आमदार विलास लांडे स्वतः जातीने लक्ष घालून त्यांनी आपली स्वंतत्र प्रचारयंत्रणा कामाला लावली आहे. अजित पवार यांनीही नुकतीच लांडे यांची भेट घेऊन मतदारसंघात वातावरण कसे आहे, प्रचारयंत्रणा कशी आहे, याची माहिती जाणून घेतली. त्यामुळे अजितदादांचे शिरूर मतदारसंघावरही पूर्णतः लक्ष आहे. शिरूर, हडपसर या परिसरात कोल्हे यांना चांगला पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. पिंपरी महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनीदेखील मोशी, चिखली, तळवडे हा परिसर पिंजून काढला असून प्रचारयंत्रणा घराघरात पोहोचविल्याचे चित्र दिसत आहे.
2014 ची देशातील मोदी लाट आता राहिली नाही हे भाजपलादेखील कळून चुकले आहे. मात्र, भाजपमध्ये मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्याव्यतिरिक्त बोलण्यास कोणालाच अधिकार राहिला नाही हे आपण पाहत आहोत. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन या नेत्यांना खड्यासारखे बाजूला केल्यामुळे जुन्या, ज्येष्ठ भाजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. एवढेच नव्हे तर जोशी यांनी याबाबतच्या आपल्या भावना थेट पत्राव्दारे व्यक्त केला. यामुळे भाजपमध्ये आता लोकशाही राहिलेली नाही. हुकूमशाहीकडे भाजप जाऊ लागला आहे अशा भावना व्यक्त होत असल्यामुळे भाजपची मोठी अडचण होऊन बसली आहे. मोदी यांनी शरद पवार यांच्यावर व्यक्तीगत टीका केली. ती त्यांच्याच अंगलट आली आहे. कारण, या टीकेमुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. पवार यांनी मात्र याला राजकीयच उत्तर दिले. मोदींच्या लक्षात ही चूक आल्यामुळे त्यांची नियोजित बारामतीमधील जाहीर सभा रद्द करून त्याठिकाणी अमित शाह यांची सभा घ्यावयास लावली. राज ठाकरे यांनी मात्र राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघात सभा घेऊन मोदी यांनी दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्षात केलेली कामे याचा पुराव्यासह भांडाफोड करून जनतेसमोर सत्य आणले. त्यांच्या या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांना मुंबईत सभा घेऊ नये, यासाठी आटापिटा करण्यात आला.
उमेदवार नसताना ते सभा घेत आहेत म्हणून त्यावर होणारा खर्च यावर भाजपने मोठा खल केला. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. कारण, ठाकरे हे अमूक उमेदवाराला मतदान करा, हे सांगतच नाहीत. शिवाय कोणत्या उमेदवाराचे छायाचित्र लावत नाहीत. ते केवळ मतदारांमध्ये जनजागृती करत आहेत. त्यामुळे मुंबईत त्यांना सभेला परवानगी मिळाली आहे. आता मुंबई येथे दोन, पनवेल येथे 1 आणि नाशिक येथे 1 अशा चार सभा ते घेणार आहेत. गुरूवारी 25 रोजी पनवेल येथे ठाकरे यांची सभा होणार आहे. यावेळी ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्यांच्या सभेने मात्र मावळ मतदारसंघातील चित्र बदलेल हे निश्चित. मावळमध्ये पवार साहेबांचे नातू निवडणुकीला सामोरे जात असल्यामुळे पवार यांच्या दृष्टीने ही निवडणूक व्यक्तीगत आणि राज्याच्या दृष्टीने प्रतिष्ठेची असल्याने येत्या चार दिवसांत या मतदारसंघातील वातावरण ढवळून निघेल. याची मात्र शाश्वती आहे.”

