HomeArchiveमराठीसाठी बेगडी विव्हळणे...

मराठीसाठी बेगडी विव्हळणे सोडून देऊ!

Details
मराठीसाठी बेगडी विव्हळणे सोडून देऊ!

    20-May-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, ज्येष्ठ पत्रकार
shail.dinman@gmail.com
वरचं वाक्य शंभर टक्के मनापासून लिहितोय.. अगदी खरं सांगतो. नेमेची येतो पावसाळा तसा मराठीचा कळवळा, अभिमान दाखवण्याचे दिवस असतात. त्यात मराठी राजभाषा दिन असतो. आणखी कुठला मायमराठीच्या नावाने गहिवर काढण्याचा, कळवळण्याचा, खरेतर विव्हळण्याचा दिवस असतो. तेवढ्यापुरतं आपण मराठी प्रेम साजरं करतो आणि त्यादिवशी घडाळ्याचा काटा मध्यरात्री बारावर सरकण्याच्या आतच सारं विसरूनही जातो. घरोघरी, त्याच संध्याकाळी, बेटा होमवर्क झाला का, पोएम्स पाठ केल्या का, टीचरनी सांगितलेल्या सम्स सोडवल्या का, असे प्रश्न मम्मी-पप्पांकडून सुरू असतात. कशाला मराठी असल्याचा, मराठीभाषिक असल्याचा अभिमान मिरवायचा आणि तोही काही तासांपुरता, जेमतेम एका दिवसापुरता?

अहो, ज्या राज्याच्या मऱ्हाठी शिक्षणमंत्र्यालाच, आपल्याच राज्यात मराठी ही सक्तीची बेडी वाटावी.. त्याने ते राजभाषादिनाच्या कार्यक्रमातच बोलून दाखवावे.. यापेक्षा मराठीच्या भाळी दुर्दैव दुसरे काय? मराठीसाठी बेगडी विव्हळण्याचे नाटकही आता मराठी माणसांना जमेनासे झालंय. ते मंत्रालयाच्या दारात, पायऱ्यांवर लक्तरं बिक्तरं.. ऐकून कासावीस, अस्वस्थ होण्याचे दिवस कधीच इतिहासजमा झाले. जशी मनगटं आवळली जाण्याचा, छाती अभिमानाने फुलून येण्याचा इतिहास इतिहासजमा झाला ना, तसेच हे दिवसही मावळले आहेत. आता मराठीचा गहिवर राजभाषादिनी काढला जातो आणि आणखी एकदा काढला जातो तो म्हणजे निवडणुका जवळ दिसायला लागल्या की. काही ठराविक राजकीय पक्षांना मराठी म्हणजे त्यांच्या मालकीची बटीक वगैरे वाटते. त्यांचे जाज्ज्वल्य मराठी प्रेम एकदम जागृत होते. मराठी कशी कोपऱ्यात वळचणीला उभी आहे, तिला कुणीच कसं विचारत नाही याची जाणीव त्यांना अचानक काट्यासारखी टोचायला लागते. मराठी टक्का घसरतोय, महाराष्ट्राच्या राजधानीतूनच मराठी माणूस हद्दपार होतोय, परागंदा होतोय, परराज्यांतून येणाऱ्या स्थलांतरितांचा टक्का वाढतोय याची जाणीव होते. मराठी टक्का घटल्याचा साक्षात्कार होतो. मग हा गजर निवडणुका संपेपर्यंत सुरू राहातो. निवडणुका संपल्यावर आपोआप मराठीचा मुद्दा पुन्हा झाकूनपाकून ठेवला जातो.

सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा मुद्दा शिवसेनेकडून ताब्यात घेतला आहे. मराठीचा अभिमान या मुद्द्यावर अगदी कब्जाच केला आहे म्हटलं तरी चालेल. आता विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. या निवडणुकीत मराठी माणसाला मराठी असल्याची, मराठीपण विसरल्याची खंतावणारी टोचणी दिली की मतांचीही बेगमी होते हे सर्व राजकीय पक्ष जाणून आहेत. पण त्यांना इतर समाजाची, इतर भाषिकांचीही मते प्यारी आहेत. त्यामुळे मराठीचा झेंडा सध्यातरी फक्त मनसेने खांद्यावर घेतला आहे. पण जिथे सरकारदरबारीच राजभाषा असलेली मराठी नकोशी झाली आहे, मुंबईत मराठीपेक्षा हिंदी आणि इतर भाषा हटकून कानावर येतात, मराठी माणसेही हिंदीतच बोलण्याचा अट्टाहास करतात, दुकानांच्या पाट्यांपासून ते शासकीय कार्यालये, महामंडळे येथे मराठीचा अंशही आढळत नाही, माहितीजालातील संकेतस्थळेही इंग्रजीतच असतात तिथे किती काळ मराठीसाठी आपण रडत राहयचे?

मराठी शाळा कधीच संपल्या, उरल्यासुरल्या एकदोन शर्थीने किल्ला लढवत असल्यातरी त्यांनाही इंग्रजीसमोर टिकाव धरून राहणे अवघड होत चालले आहे. आपलीच मुले नाहीत तर जे मराठीसाठी गळा काढतात त्यांचीही मुलेबाळे इंग्रजी शाळांमध्येच एबीसीडी गिरवत मोठी झाली आहेत. अशा नेत्यांच्या राज्यात आणि मराठी असूनही मराठी नकोशी वाटणाऱ्या समाजात आता मराठीसाठी बेगडी विव्हळणे खरंच आपण सोडून द्यायला हवे. महाराष्ट्राच्या राजधानीतच हिंदी आणि इंग्रजीकडून मराठी कशी चेपली जात आहे याबाबत नुकतेच एक वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्रिभाषा सूत्र तर कधीच विस्मरणात गेले. पण, आता हिंदी व इंग्रजी याच जणू काही प्रमाणभाषा आणि मराठीचे अस्तित्त्वच नाही असे मुंबापुरीतच दिसू लागले आहे. एक विरोधाभास नोंदवतो– मराठी कलाकार, मराठी चित्रपटसृष्टी, मराठी धाटणीच्या कथानकांना, व्यक्तिरेखांना नेटफ्लिक्सपासून अन्य रूपेरी माध्यमांमध्ये पायघड्या अंथरल्या जात असताना आपल्याच माणसांकडून मराठी अशी लाथाडली जात आहे. मराठीचा प्रसार करण्यासाठी काय करणार तर ‘लँग्वेज लॅब’ उघडणार, अशी भाषा भेळ करावीशी वाटते यातच मराठीचे मरण आहे.

बातम्यांच्या शीर्षकांत एखादा शब्दजरी इंग्रजी आलातरी कासावीस होणारे पत्रकार आता इतिहासजमा झाले. नेहरू विज्ञान केंद्रात सुरू असलेल्या विज्ञान ‘समागम’ प्रदर्शनात एकही माहितीफलक मराठीत नाही. हिंदी आणि इंग्रजी मात्र चमकते. ‘छत्रपती शिवाजीमहाराज वस्तू संग्रहालया’तील बालसंग्रहालयात सर्व फलकांवर विद्यार्थ्यांचे अनुभवही हिंदी आणि इंग्रजीतून, आहेत. तेथील वस्तूंच्या समोर ठेवलेल्या वहीच्या मुखपृष्ठावर हिंदी-इंग्रजीतून वस्तूचे नाव आणि अगदी शेवटी मराठीतून अशी मराठी कोपऱ्यात ढकलली जात आहे. ही उदाहरणे प्रातिनिधिक आहेत. मराठीबद्दल आपल्याच मनातील अनास्था, अनाग्रह या सगळ्याला कारणीभूत आहे.

मनसेने आंदोलन करूनही सर्वच ठिकाणी दुकानांच्या पाट्या आजही मराठीत दिसत नाहीत. सार्वजनिक फलकांवरही मराठी असतेच असे नाही. साहित्यसंमेलनाला बडोद्यात होतो. तिथल्या प्रत्येक दुकानांवरील नावाची पाटी गुजरातीत होती. इथे आपल्याकडे दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात म्हणून आंदोलने करावी लागतात. गुजरातमध्ये भेटलेले मराठी लोकही बाहेर गुजरातीतच बोलतात, तिथला गुजरातीही तुमच्या हिंदी वा इंग्रजीला सहजपणे प्रतिसाद देत नाही आणि आपल्याकडे दोन मराठी माणसे भेटली तरी हिंदीत सुरू होतात. रेल्वे तर राष्ट्रीय टेंभा मिरवत असल्यामुळे तिलाही मराठीचे वावडे आहे. आपल्याकडील रेल्वेच्या कार्यालयांमध्येही एकही पाटी मराठीत नाही. रेल्वेच्या तिकिटावरील सूचनाही मराठीत नाहीत. इतकेच काय आपल्या महापालिकेलाही मराठीचे फारसे प्रेम नाही. मराठीत पाट्या नसल्यातरी चालतय की, अशीच काहीशी भूमिका महापालिका घेत असते. यामुळेच मरिनड्राइव्ह येथील क्लीनटेक शौचालयातील सर्व सूचना फक्त हिंदी-इंग्रजीतून लावल्या आहेत. मल्टिप्लेक्स सभांमध्येही मराठी कुठे दिसते? तिथेही ती पॉपकॉर्न आणि स्वीट कॉर्नच्या गजबजाटात गुदमरलेलीच असते.

शासकीय यंत्रणा, महामंडळे, खाती यांच्या संकेतस्थळांवरही शतप्रतिशत मराठी नाही. मराठीच्या वापरासाठी दोन वर्षांपूर्वी अध्यादेश काढण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी मराठीतच बोलावे, सादरीकरण करावे, चर्चा करावी आणि कागदपत्रांवर स्वाक्षरीही मराठीतच करावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या. हे सर्व पद्धतशीरपणे विस्मरणात गेले आहे. आता तिची तितकीही पत्रे मंत्रालयात वा सरकार दरबारी ठेवली जात नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी नव्हे गुजराती अनुवाद विधिमंडळात ऐकवला जावा इतपत सत्ताधारी आणि विरोधकांचेही मराठीपण लयास गेले आहे. आपणच आपल्या मातृभाषेबद्दल आग्रही नव्हे दुराग्रही नाही याचे हे दुष्परिणाम आहेत. यामुळेच आपल्याला मनातून मराठीचा खऱोखरीच अभिमान उरला आहे का? असा प्रश्न जो-जो स्वत:ला मराठी म्हणवतो, मराठी भाषादिनाच्या शुभेच्छा देतो, त्या सर्वांनी स्वत:ला विचारायला हवा.

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे किती खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

असे कविवर्य सुरेश भट लिहून गेले होते. त्यातील प्रारंभीच्या दोन ओळी अत्यंत समर्पक आहेत. अनेक पाहुणे मराठीच्या मुलुखात घुसले आहेत, नांदत आहेत. त्यांना जागा करून देऊन मराठी वळचणीला उभी आहे. पण, असे निर्रगल खेळ पाहून मदांधतख्त फोडण्याचा मराठी बाणा मात्र हिंदी पखवडा अभिमानाने पाळणारे आजचे मऱ्हाठीजन हरवून बसले आहेत.

मराठीचा अभिमान असता तर मराठी शाळा बंद पडल्या नसत्या, मराठीचा अभिमान असता तर आहेत त्या मराठी शाळाही बंद करण्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागली नसती. मराठीचा अभिमान असता तर मुंबईसह महाराष्ट्राला परप्रांतीयांनी घडवले असे वक्तव्य कानावर आले नसते. २७ जानेवारी हा मराठी भाषा गौरवदिन, २१ फेब्रुवारी (आंतरराष्ट्रीय मातृभाषादिन) आणि २६ फेब्रुवारी मराठी राजभाषादिन. असल्या काही दिवशी आपण काही तासांपुरते मऱ्हाठी असतो. ते तरी कशाला दाखवायचे? पुरे झाले मराठीसाठी हे बेगडी विव्हळणे!”
 

Continue reading

आसाम-बंगालची निवडणूक फळली? पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही!

पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत निर्माण होणारी महागाईची स्थिती रोखण्यासाठी...

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात; ३५ वर्षीय बालेन शाह पंतप्रधान!

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली असून ३५ वर्षीय बालेन्द्र शाह (बालेन) यांनी शुक्रवारी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. काठमांडूचे माजी महापौर आणि प्रसिद्ध रॅपर ते राजकारणी असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या बालेन शाह यांनी सार्वत्रिक निवडणुकीत...

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...
Skip to content