HomeArchiveभाजपचे कोकण मेळावे...

भाजपचे कोकण मेळावे वसईतील परिवर्तनाची नांदी?

Details
भाजपचे कोकण मेळावे वसईतील परिवर्तनाची नांदी?

    23-Jan-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
vinodsalvi1@gmail.com
नारायण राणे हे प्रगल्भ नेते आहेत. भाजपने त्यांना राज्यसभेवरही घेतले आहे. राणेंसारखे नेते भाजपसोबत असणे कोकणसाठी महत्त्वाचे आहे. पण कोण नेता काय भूमिका घेतो, हे महत्त्वाचे नाही. तर कोकण असो, की संपूर्ण देशातील जनता भाजपसोबत आहे, अशा शब्दांत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी कोकण आणि कोकणचे नेते नारायण राणे यांचा गौरव केला. वसईत रविवारी झालेल्या ‘कोकण मेळाव्या’च्या निमित्ताने प्रवीण दरेकर विरारमध्ये आले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष साटम यांनी हा मेळावा आयोजित केला होता. भाजपला कोकणी माणसाचे महत्त्व समजले, जे आतापर्यंत बहुजन विकास आघाडीला समजले नव्हते. त्यामुळेच भाजपचे कोकण मेळावे हे वसईतील परिवर्तनाची नांदी म्हटले जात आहेत.

खरे तर मागील 15 वर्षांत वसई-विरारमध्ये मोठ्या प्रमाणात कोकणी माणूस वसला आहे. साहजिकच या कोकणी मतांचा मोह कोणत्याही पक्षाला व्हावा. वसई-विरार शहरात बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे. सत्तास्थापनेत प्रत्येक मोठ्या पक्षाला बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांचे समर्थन राहिले आहे. परिणामी वसईत या मित्रपक्षाला कोणीही बाधा पोहोचवली नव्हती. त्यामुळे बहुजन विकास आघाडीनेही एक-दोन मतपेढी सोडल्या तर सगळ्यांना गृहीतच धरले होते. मागील लोकसभा पोटनिवडणूक मात्र या सगळ्याला अपवाद ठरली. या निवडणुकीत भाजप-शिवसेना एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने आणि ही लढाई दोन्ही पक्षांसाठी अहंकाराची ठरल्याने बहुजन विकास आघाडीची आपल्याच घरात कोंडी झाली. अपेक्षेप्रमाणे राज्यात सत्ता असलेल्या भाजपने ‘साम, दाम, दंड, भेद’ या नीतीवर लोकसभा पोटनिवडणूक जिंकली. तेव्हापासूनच या भागात आतापर्यंत सुप्तावस्थेत गेलेला भाजप पुन्हा एकदा सक्रिय झाला. येथील स्थानिक नेतृत्वाला बळ आले. त्यांनी पुन्हा एकदा या भागात आपली ताकद वाढवायला सुरुवात केली. दोन महिन्यांपूर्वी वसईत ‘पाणी परिषद’ घेऊन बविआचे ‘पानी’पत करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा बविआच्या ‘वोट बँक’ असलेल्या भागात रविवारी शड्डू ठोकला. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने कोकणी मतांचे महत्त्व ओळखून बविआच्या वॉर्डात हळदी-कुंकू आणि कोकण मेळाव्यांचे आयोजन केले. त्यातून बविआला शह देण्याचा प्रयत्न केला.

मनवेलपाडा-कारगिलनगर हा भाग मागील निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा बाल्लेकिल्ला राहिला आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत याच भागातून बविआने मताधिक्क्यात आघाडी घेतली होती. तर महापालिका निवडणुकीत या भागाचे तब्बल पाच प्रभागांत विभाजन झाले होते. या पाचही प्रभागांतून बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक कोकणी माणसाच्या मतांवर निवडून आले होते. मागील पाच वर्षांत मनवेलपाडा-कारगिलनगर भागाची लोकसंख्या लाखाच्या घरात गेली आहे. हा संपूर्ण भाग कोकणबहुल लोकवस्तीचा आहे. 2014च्या निवडणुकीत या भागात 20 हजारच्या आसपास नोंदणीकृत मतदार होते. यावेळीही मतदारसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. हीच स्थिती वसईतील अन्य भागांतही आहे. त्यामुळेच आतापासून या वार्डांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. या भागात असलेली कोकणबहुल लोकवस्ती भाजपचे मुख्य ‘टार्गेट’ असणार आहे. मागील लोकसभा पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी भाजपने उत्तर प्रदेशचे ‘फायर ब्रँड’ नेते आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आणून याच भागात सभा घेतली होती. यातून कारगिलनगरपुढील मोरेगाव ते नालासोपार्‍यापर्यंतच्या परप्रांतीय मतांना चुचकारण्याचा भाजपचा प्रयत्न होता. राज्यातील सत्ता स्थापनेपासून भाजपच्या कुशीत विसावलेल्या बविआला ही पोटनिवडणूक भाजप-शिवसेनेतील मुख्य लढाई वाटल्याने भाजपचा धोका वाटला नव्हता. आता मात्र देशभरात वाहत असलेले भाजपचे वारे वसईच्या किल्ल्याला धडकू पाहत आहेत. याच वादळी वार्‍यांमुळे भाजप वसईत सक्रिय होत असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. याचाच परिणाम म्हणून मागील काही महिने भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजन नाईक यांचे बॅनर मोठ्या प्रमाणात शहरात झळकत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत राजन नाईक हेच भाजपचे उमेदवार असतील आणि तेच नालासोपारा विधानसभेचे आमदार असतील, अशी छातीठोक चर्चा भाजपच्या गोठात सुरू आहे.

गुजरातील आणि इतर परप्रांतीय मते भाजपचीच आहेत. पण भाजपचे कोकण मेळावे हे वसईतील परिवर्तनाची नांदी असल्याचे म्हटले जात आहे. निवडणुका आल्या की, इतर पक्षांना मतदारांची आठवण होते. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मात्र वर्षाचे बाराही महिने मतदारांसोबत आहेत. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी आम्हाला कुणाची गरज भासत नाही. आम्ही काम करून मोठे होतो. आमचा राजकारणापेक्षा समाजकारणातून जनतेचे हित साधण्यावरच भर असतो, असे मत बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी भाजपच्या या मेळाव्याला उत्तर देताना व्यक्त केले असले तरी मागील काही वर्षांत वसई-विरार शहराचा झालेला विकास (?), महापालिकेत औषधाला नसलेला विरोधक आणि प्रत्येक कामातील भ्रष्टाचार यामुळे वसईत आगामी निवडणुकांतून परिवर्तन झाले तर नवल वाटायला नको!”
 

Continue reading

रविवारी आनंद घ्या भारती प्रताप यांच्या गायनाचा 

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात, येत्या रविवारी, ५ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता संस्थेचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारती प्रताप यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्रीकृष्ण जोशी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी...

आजपासून ‘क्रेडिट स्कोअर’ होणार दर आठवड्याला अपडेट!

बुधवार, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष (२०२६-२७) सुरू होत असून, रिझर्व्ह बँकेने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (सीआयसी'ज) जसे की, सिबिल, एक्स्पेरियन, इक्विफॅक्स आणि हाय मार्क यांच्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या कर्ज घेण्याच्या प्रक्रियेवर...

आखातातल्या गुगल, एप्पल आदी १८ कंपन्यांवर आजपासून इराणचे हल्ले

इराणविरूद्ध अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धात सहभागी होण्यास युरोपातल्या बहुतांश सर्व देशांनी (नाटो संघटनेत असलेल्या) स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे. पोलंड, हंगेरी, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्लोव्हाकिया, इटली आदी देशांचा यात समावेश आहे. ब्रिटनने या संघर्षात अमेरिकेला अत्यंत मर्यादित...
Skip to content