HomeArchiveबाबासाहेब आम्हाला माफ...

बाबासाहेब आम्हाला माफ करा!

Details
बाबासाहेब आम्हाला माफ करा!

    06-Dec-2018

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनोद साळवी,  मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान

vinodsalvi1@gmail.com

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले ही समाजा-समाजांची प्रतीक होऊ न झेंडे व वेगवेगळ्या जातींत सर्व आदर्शांना आम्ही कधीच आपसांत वाटून घेतले आहे. पुस्तकांच्या पानापानांत ही आदर्श त्यांचे विचार, खरा इतिहास शोधण्याऐवजी त्यांना देव्हार्‍यात बसवून आम्हीही कर्मठांचा कुटील डाव यशस्वी करण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप सर्व सोशली पद्धतीने झटतो आहोत.

प्रिय बाबासाहेब!.. 

विद्या, शिल आणि स्वाभिमान ही आपली तीन उपास्य दैवतं. त्यांची  प्राणपणाने जपणूक करा, ही शिकवण आपण आम्हाला कायम दिलीत. माझा जयजयकार करण्यापेक्षा मी सांगितलेली मूल्य आणि तत्त्वांचा अंगिकार करा, असा संदेश आपण दिलात. तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, संत कबीर, महात्मा ज्योतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज यांचे विचार देशातील तमाम शोषित, वंचित वर्गात रूजवून मानवी स्वातंत्र्य हक्कासाठी जागतिक क्रांती आपण घडवलीत. इतकेच नाही तर भारतीय संविधानाचे पान अन् पान लिहिताना छत्रपती शिवाजी महाराजांचे समतेचे, क्रांतीबा फुलेंनी सांगितलेले बंधुतेचे आणि तथागत बुद्धांनी सांगितलेल्या मानवता आणि विज्ञानाधिष्ठित विचारांवर आधारित एकसंघ भारत देशासाठी पाया रचलात. आजही हा देश विविधतेत एक आहे, ती फक्त आपली पुण्याई आहे.

आजघडीला या देशात समाजा-समाजांत जात-धर्म-पंथाच्या नावाखाली दंगली कशा घडतील, महापुरूषांचे नाव वापरून सामाजिक भावना उद्रेकात कशा परावर्तित होतील, यासाठी खटाटोप सुरू आहे. उत्तर प्रदेशसारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्याचे संविधानिक पदावरील जबाबदार मुख्यमंत्री जेव्हा धार्मिक आणि जातीय भावना भडकावतात. ‘हनुमान हा दलित होता’ हा योगी आदित्यनाथ यांनी लावलेला जातशोध हे सामाजिक समरसता किती उफाळून आली आहे, याचा निवडणूक प्रत्यय देतो. योगगुरू रामदेव बाबा यांनीही गुणांच्या आधारावर हनुमान ब्राम्हण असल्याचा शोध लावून टाकला. त्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जमातीचे नंदकुमार सहाय यांनी ‘हनुमान आदिवासी होते,’ हे संशोधनपर मांडले. अगदी गोत्र आणि जमात कोणती हेही ठासून सांगण्याचा प्रयत्न केला. जैन समाजाचे आचार्य निर्भय सागर यांनीही मध्य प्रदेश निवडणुकीत हवा करताना हनुमान जैन धर्मीय होते, असे जाहीर करून टाकले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे गोत्र कोणते, ते काश्मिरी ब्राह्मण कसे, ते भगवान शिवाचे भक्त कसे, हा आपल्या देशातील विकासाचा कार्यक्रम सध्या झोकात सुरू आहे.

‘मी प्रथम भारतीय अणि अंतिम भारतीय’ हे वचन आम्हा भारतीयांत आपण संविधानाच्या मूळ उद्देशिकेतून रूजवलेत. पण, आम्ही जाती-धर्मांत स्वत:ला वाटून घेऊन आपण लावलेल्या आणि बहरलेल्या लोकशाहीरूपी झाडाच्या फांद्या एकएक करून छाटायाला कधीच सुरूवात केली आहे. या देशातील स्त्री-पुरूषांना धार्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, भौगोलिक, अभिव्यक्ती अशी सर्व प्रकारची स्वातंत्र्ये आपण दिलीत. पण, स्वातंत्र्य, हक्कांची ही इमारत आता ढासळते की काय अशी परिस्थिती वर्तमानातील आणीबाणीमुळे निर्माण झाली आहे. फॅसिस्ट विचारांना खतपाणी घालणारा, धर्म आणि जातीच्या नावाखाली एकमेकांचे मुडदे पाडायलाही मागेपुढे न पाहणार्‍यांची माथी भडकावणारा सार्वत्रिक कार्यक्रम सध्या जोरात सुरू असल्याचा जाताभिमान आमच्या प्रत्येकांत कुटूनकुटून भरला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी व कट्टरतावादाला पुढे करून हुकुमशाही, दंडुकेशाही, झुंडशाहीचे राज्य आणण्याचा चंग बांधणार्‍यांना आम्ही दरनिवडणुकीत फशी पडतो आहे. ते तुमच्या नावाचा, फोटोचा मतांसाठी वापर करत आहेत. पण, तुमचे विचार पचनी पाडून त्यावर अमंल करण्याचे धारिष्ट्य ते दाखवत नाही आणि दाखवणारही नाहीत, हेही तितकेच सत्य.

पुतळे, स्मारके, मंदिर, मशिद यापलीकडे आमची वैचारिक झेप आजही गेलेली नाही. तुम्हाला एका विशिष्ट, समाजाचे वर्गाचे ठरवून एका जातीत बांधण्याचा प्रयत्न इथे वर्षानुवर्षे सुरू आहे. त्याला चपराक बसून आपले विचार जगमान्य असल्याची जाणीव इथल्या कर्मठांनाही झाली आहे. स्त्रियांसाठी स्वतंत्र कायदा आणावा, यासाठी हिंदू कोड बिल आपण संसदेत आणलं. त्याला विरोध झाल्याने आपण कायदे मंत्रिपदाचा राजीनामाही दिलात. तीच स्त्री तुम्ही दिलेल्या संविधानिक अधिकारांमुळे आज गुलामगिरीतून मोकळी होऊन यशाची सर्व शिखरे पादाक्रांत करायला निघाली आहे. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून ती प्रत्येक क्षेत्रांत आज अग्रेसर धडक देत आहे. आर्थिक, सामाजिक, न्यायिक सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा ती उपभोग घेते आहे. पण, ज्या बाबासाहेंबांमुळे, महात्मा फुले, सावित्रीमाई फुलेंमुळे आपल्या पुढ्यात सोन्याचे ताट आले याची जाणीव काही मोजक्याच महिलांत असल्याचे आपल्या खेदाने सांगावे लागत आहे. महिला पोलीस अधिकारी असलेल्या भाग्यश्री नेटके यांच्यात ठासून भरलेला जाताभिमान हे याच वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण. देशासाठी, समाजासाठी खाकी अंगावर चढवलेली एक महिला अधिकारी ते अमक्या समाजाचे म्हणून त्यांना फोडून काढले ते तमक्या समाजाचा म्हणून त्यांना फारसे काही केले नाही. हे कायद्याच्या राज्यात बिनधोक सुरू आहे. उत्तर प्रदेशातील बुलंद शहरात गो हत्येच्या संशयातून उसळलेल्या दंगलीत पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांची जमावाकडून गोळी घालून हत्त्या होते. बाबासाहेब इथवर आमचा अंधेरनगरीकडे वाटचाल करणारा प्रवास सुरू आहे.

आमचे पंतप्रधानही या सर्वाला मूकसंमती दिल्यागत चकार शब्दही काढत नाहीत. ते फक्त निवडणुकीत जोरदार माकेर्टिंग करून बोलतात. इथे देशातील करोडो बेरोजगारांच्या हातांना काम नसले तरी राम की बात करून काम की बात विसरायला लावणारे भावनिक राजकारण सुरू आहे. त्याला आमचीही भावनिक संमती आहेच. कारण मतदान आणि मताची किंमत आम्हाला आजही कळलीच नाही. कुणी मशिदीसाठी, कुणी मंदिरासाठी आपसांत झगडत आहे. आपल्या तरूणांच्या भारत देशाने जगातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत वेगाने प्रगती साधावी, हा विचारच आमच्यात रूजू दिला जात नाही किंबहुना जात नि धर्माभिमानामुळे आम्हालाही तो रूजवून घ्यावसा वाटत नाही. खरे देशद्रोही, भ्रष्टाचारीच आमच्याकडे बोटे दाखवत आहेत. महापुरूषांची जातीपातींत विभागणी करण्यात इथली कर्मठ व्यवस्था यशस्वी ठरली आहे. आपल्या आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा प्रकाश डोक्यात पाडण्याऐवजी त्यांच्या प्रतिमा, पुतळे पूजण्यातच आम्हाला धन्यता वाटते आहे.

स्मारके उभारण्यापलीकडे आमच्या सरकारकडे विकास कार्यक्रम उरलेला नाही. कारण प्रश्न जातीनुसार मतांचाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले ही समाजा-समाजांची प्रतीक होऊ न झेंडे व वेगवेगळ्या जातींत सर्व आदर्शांना आम्ही कधीच आपसांत वाटून घेतले आहे. पुस्तकांच्या पानापानांतही आदर्श त्यांचे विचार, खरा इतिहास शोधण्याऐवजी त्यांना देव्हार्‍यात बसवून आम्हीही कर्मठांचा कुटील डाव हाणून पाडण्याऐवजी यशस्वी करण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप सर्व सोशली पद्धतीने आम्ही झटतो आहोत. ऐकिवात, भावनिक इतिहासावर आमचा भर आहे. शिवरायांचा, बाबासाहेबांचा, फुल्यांचा मावळा म्हणून आम्हीच तुमची जयंती, पुण्यतिथी दरसाल करत आहोत. कुठेतरी चुकते आहे, ही अधूनमधून जाणीव आम्हाला होते. बाबासाहेब आम्हाला माफ करा!

एक भारतीय”
 

Continue reading

न्यायालये माणसे चालवतात, एआय नाही!

"न्यायालयं ही माणसांद्वारे चालवली जातात, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) नाही," अशा कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याची तातडीच्या सुनावणीची विनंती फेटाळून लावली. २०२१पासून प्रलंबित असलेल्या एका 'प्रथम अपिलावर' प्राधान्याने सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, न्यायाधीशांच्या मानवी मर्यादा...

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...
Skip to content