HomeArchiveपवारांची चाटूगिरी व...

पवारांची चाटूगिरी व जादूगिरी…

Details
पवारांची चाटूगिरी व जादूगिरी…

    27-Dec-2018

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
jayant.s.karanjavkar@gmail.com

शरद पवार हे एक असामान्य व्यक्तिमत्व आहे याबद्दल कोणाचाच दुमत नाही. त्यांच्या ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत ते एका विचारावर कधीच ठाम राहिले नाहीत, हे त्यांचे खास वैशिष्ट्य! काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा परदेशी मुद्दा पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वेगळी चूल त्यांनी उभारली आणि ही चूल उभारत सकाळी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावाने जपमाळ ओढायचे आणि संध्याकाळी आपटे, आगाशे, डहाणूकर यांच्या बरोबर बसायचे त्यांनी कधीही सोडले नाही. नुकतेच त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे देशाचे नेतृत्त्व करण्यास समर्थ आहेत, असे विधान केले. याची प्रचिती राष्ट्रवादीच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागल्यावर त्यांना आली. त्यांच्या या विधानाने ‘जाणता राजा’ ही उपाधीही आता ओशाळली असेल. त्यांच्या या विधानातून त्यांनी सोनिया व राहुल गांधी यांचे नेतृत्त्व मान्य केले आहे. यापुढे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीत चर्चा होईल, त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक न राहता काँग्रेसबरोबर समझोता करावा, असे संकेत त्यांनी दिले आहेत आणि पक्षातील संभ्रम दूर केला एवढंच म्हणता येईल. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत पक्षातून कोणी बाहेर पडू नये याची त्यांनी ही काळजी घेतली आहे.

शरद पवारांनी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतःच्या प्रतिमेभोवतीच सतत फिरता ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पहिल्या फळीतले नेतेही आजही ज्युनिअर केजीतल्या विद्यार्थ्यांसारखे दिसतात. आज एकही नेता लोकसभा निवडणुकीला उभा राहण्यास तयार नाही. त्यामुळे पवारांना या नेत्यांच्या नाकदुऱया काढाव्या लागत आहेत. तसं पाहिलं तर राष्ट्रवादी पक्ष म्हणजे दुष्काळातील जनावरांची छावणी आहे. या छावणीत असलेल्या नेत्यांना पाहिजे तेव्हा चारा घातला जातो. एखादा नेता चलती नाण्यासारखा असतो तेव्हा ते त्याला डोक्यावर घेऊन मिरवत असतात. उदाहरण द्यायचं झालं तर आमदार छगन भुजबळ यांचं. भुजबळ हे छावणी चांगली राखत होते, तेव्हा सर्व नेते त्यांच्या पुढे-मागे लाळघोटेपणा करीत होते. त्यांनी त्यांची समता परिषद महाराष्ट्राच्या सीमेबाहेर नेली आणि शरद पवार बिथरले. कारण, त्यांच्या स्वतःच्या प्रतिमेला धक्का व तडे बसण्याची भीती त्यांना वाटू लागली. मग त्यांनी त्यांचे लाडकं लेकरू आर. आर. पाटील उर्फ आबा यांना कामाला लावले. आबांनी इमानेइतबारे पवारांची सेवा केली आणि भुजबळांची अनेक सदने कोलमडू लागली. भुजबळांची हीच सदने राष्ट्रवादीसाठी खुराक होती. पक्षाच्या हितासाठी आमदारांना बेंगलुरूला नेणे, त्यांची उठबस करणे हे सर्व काही त्यांनी पक्षासाठी केले.

चारा छावणीत मराठा, मागासवर्गीय, ओबीसी अशी विभागणी करून ठेवली होती. मात्र ठराविक मराठा आमदारांकडे साखर कारखाने, सहकारी बँका, शिक्षण संस्था, दुग्ध व्यवसाय मजबूत स्थितीत राहतील याची त्यांनी योग्य ती काळजी घेतली. या श्रीमंत मराठा नेत्यांनी त्यांच्या संस्थेत अनेक गैरव्यवहार केले पण त्यांना वाचविण्यासाठी ते आकाशपाताळ एक करत होते. नुकतेच त्यांनी अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ५०० कोटी मिळवून दिले. कारण साखर कारखाना हा हक्काचा मलिदा मिळवून देणारा डोलारा होता. साखरेच्या हा वारूळ डगमगला तर त्यातील मुंग्या चावा घेऊन कोणत्या वारूळात जाऊन बसतील याची पवारांना जाणीव आहे. मराठा समाजापेक्षा मराठा नेते हेच त्यांचे राजकारणातले हुकमी एक्के होते आणि आहेत. आज मराठा नेत्यांकडे समृद्ध अशा शिक्षण संस्था आहेत. तरीही मराठा समाज शिक्षण क्षेत्रात मागास, त्यामुळे नोकऱ्या नाहीत. मराठा समाजाला याच नेत्यांनी ‘पाटीलकी’च्या नशेत ठेऊन त्यांनी राजकीय पोळ्या भाजून घेतल्या. आज त्यामुळे मराठा समाजाला लाखोंच्या संख्येने मोर्चे काढावे लागले. परंतु हे मोर्चे काँग्रेस राष्ट्रवादीच्या कारकिर्दीत निघाले नाहीत. मराठा समाजाने शरद पवार व अन्य मराठा नेत्यांच्या विरोधात आंदोलन केले नाही. याचं आजही सर्वांना आश्चर्य वाटत आहे.

राष्ट्रवादीच्या मागासवर्गीय नेत्यांना पवारांनी त्यांच्या हक्काची महामंडळे दिली आणि त्या नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या हाताच्या कोपराला कायमचा गुळ लावून ठेवला. मग आमदार रमेश कदम यांच्यासारखे नेते मागासवर्गीय महामंडळात राष्ट्रवादीच्या नेत्यांना २५ लाख किंमतीच्या गाड्या देत होते. मृत व्यक्तीच्या नावाने कर्ज देऊन मुंबईत व स्वतःच्या मतदारसंघात ते इमले उभारत होते. महाराष्ट्रातील स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांची बारीकसारीक माहिती असणारे पवार यांनी त्याचवेळी आमदार रमेश कदम यांना का रोखले नाही? कारण एकाला ‘नादी’ लावायचं आणि त्याच समाजातील दुसरे वासरू छावणीत आणून नवीन नेतृत्त्व उभे करायचे, हे त्यांचं धोरण होतं. असंच आमदार छगन भुजबळ यांच्याबाबतीत घडले आहे. भुजबळ राष्ट्रवादीला रसद पुरवत होते, त्यावेळी तेच भुजबळ त्यांचे स्वतःचे नेतृत्त्वही तयार करत होते. त्यांनी अनेक कंपन्या राज्यात व परदेशात काढल्या. दिल्लीत अप्रतिम ‘महाराष्ट्र सदन’ बांधले आणि त्यातील भ्रष्ट्राचाराची मालिका समोर आल्या. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नसताना त्यांना अंडा सेल मध्ये दोन वर्षे ठेवण्यात आले.

त्यावेळी पवारसाहेब नेहमीप्रमाणे शांत बसले. भुजबळांऐवजी त्यांचे लाडके युवा नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांचा ओबीसी नेता म्हणून वारंवार उल्लेख करून ओबीसी नेत्यांत फूट पाडण्याचे काम ते करत होते. जितेंद्र आव्हाड यांना सरकारकडून त्रास होऊ लागला. ताबडतोब पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यात आव्हाड हे ओबीसी नेते आहेत असा उल्लेख करून तुरुंगात असलेल्या भुजबळ व त्यांच्या हितचिंतकांना भुजबळांना मोडीत काढल्याचे संकेत त्यावेळी ते देत होते. भुजबळ तुरूंगात होते तेव्हा बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार ‘गुंतता हृदय’सारखी स्तुतीसुमने एकमेकांवर उधळीत होते. हा प्रसंग पाहून ओबीसी नेते हादरले. पवारांचे मोदींकडे एवढी उठबस असताना भुजबळांना तुरूंगात उठाबशा काढायला का लावतात? आणि तेव्हापासून ओबीसी नेते बिथरले ते आजतागायत.

स्वतःची प्रतिमा सुरक्षित राहावी आणि नेतृत्त्वाला आव्हान उभे राहू नये म्हणून मराठा व्यतिरिक्त मागास समाजामध्ये भांडणे कशी निर्माण होतील याची पवार विशेष काळजी घेत होते. त्यांच्या पक्षातील आदिवासी मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि मागासवर्गीय प्रा. लक्ष्मण ढोबळे यांचा राष्ट्रवादीच्या चारा छावणीत कसा छळ व मानहानी झाली हे त्यांच्या तोंडून ऐकले तर राष्ट्रवादी पक्षच राज्यात शिल्लक राहणार नाही. मात्र मराठा नेते याबाबतीत नशीबवान ठरले. भाजपा म्हणजे मनुवादी विचारांचा पक्ष अशी लोकमानसात हेटाळणी करून आपण स्वतः पुरोगामी विचारांचा असल्याचे शरद पवार सतत दाखवीत आलेत. पण त्यांचे खायचे व दाखवायचे दात किती वेगळे आहेत हा नाट्यप्रयोग याची देही, याची डोळा महाराष्ट्राच्या जनतेने पाहिला आहे. देवेंद्र फडणवीस सरकार अल्पमतात आले तेव्हा पवारांनी फडणवीस सरकारला बाहेरून पाठींबा देण्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी पवारांकडून पाठींबा मागितला नव्हता, तरीही सत्तेची ऊब मिळावी आणि छावणीतील नेतेमंडळींना सत्तेचा आधार मिळावा, त्यातल्या त्यात मराठा नेत्यांच्या साखर कारखाने, शिक्षण संस्था, सहकारी बँका यांना कोणत्याही प्रकारे सरकारी यंत्रणेकडून त्रास होऊ नये ही खरी पवारांची धडपड होती. २२ वर्षांत फडणवीस यांना लोकांकडून शिव्या खाव्या लागल्या नाहीत ते २२ दिवसात खाव्या लागल्या, असे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वत्र सांगू लागले. याबद्दल ना शरद पवारांना आणि ना त्यांच्या नेत्यांना खेद वाटला. सत्तेच्या जवळपास राहून त्याची ऊब कायम घेणे हेच त्यांचे ध्येय होते.

पवारांचे विचार ठाम नसल्याने त्यांचे संस्थापक नेते तारिक अन्वर यांनी त्यांना न सांगता काँग्रेसचा रस्ता धरला. त्याचबरोबर राज्यातील मुनाफ हकीमसारखे प्रामाणिक नेते, ज्यांनी राष्ट्रवादीसाठी त्यांनी अहोरात्र कष्ट उपसले होते, त्यांनीही ताबडतोब राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. दुसरे संस्थापक नेते स्वर्गीय पी. ए. संगमा यांचे पवारांसोबत जमले नाही. संगमा यांची मुलगी आज नरेंद्र मोदी यांच्या बाजूने आहे. आणीबाणीच्या काळात शरद पवार यांनी पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) सरकार स्थापन करून मनुवादी जनसंघ (पवारांच्या मतानुसार), समाजवादी नेते यांना या सरकारात सामील करून घेतले. हेच सरकार इंदिरा गांधींनी पुन्हा केंद्रात आल्यावर उखडून फेकून दिले. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. सत्तेपासून दूर असलेल्या पवारांनी राजीव गांधी यांचे नेतृत्त्व मान्य करून त्यांचा लोकशाही पुरोगामी पक्ष काँग्रेस पक्षात विसर्जित केला. आता मात्र कमकुवत असलेल्या राष्ट्रवादीला पुन्हा ताकद मिळावी म्हणून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे त्यांनी समर्थन करून राष्ट्रावादीतील नेत्यांना सत्तेचं गूळ-खोबरं दाखविले आहे. पक्षातील नेत्यांचा काँग्रेसकडे जाण्याचा कल थांबविण्याचा शरद पवार यांचा हा प्रयोग आहे.

काँग्रेसमध्ये स्वतःहून जाणाऱ्या नेत्यांना काय तिथे स्थान मिळणार आहे याची जाणीव असल्याने आणि शरद पवारांच्या मागून जाण्याने त्यांना सत्तेत वाटा मिळेल, ही आशा असल्याने पवारांच्या सोनिया व राहुल गांधींच्या समर्थनाला राष्ट्रवादीतील इतरांनीही पाठिंबा दाखवला आहे. शरद पवार आणि त्यांच्या नेत्यांना सत्तेत राहण्याची कला पुन्हा साधण्याचा प्रयोग सुरू होईल. राहुल गांधी यांचे विश्वासू नेते पृथ्वीराज चव्हाण हे यावेळी काय भूमिका घेतात यावर शरद पवार आणि राष्ट्रवादीचं भवितव्य अवलंबून आहे. पृथ्वीराज चव्हाण कोणाच्या हाताला लकवा आला आहे हे आता साऱ्या महाराष्ट्राला दाखवून देणार आहेत. शरद पवारांची जादूगिरी आणि पृथ्वीराज चव्हाण यांची किमया यावेळी पाहावयाची आहे.”
 

Continue reading

आसाम-बंगालची निवडणूक फळली? पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही!

पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत निर्माण होणारी महागाईची स्थिती रोखण्यासाठी...

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात; ३५ वर्षीय बालेन शाह पंतप्रधान!

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली असून ३५ वर्षीय बालेन्द्र शाह (बालेन) यांनी शुक्रवारी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. काठमांडूचे माजी महापौर आणि प्रसिद्ध रॅपर ते राजकारणी असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या बालेन शाह यांनी सार्वत्रिक निवडणुकीत...

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...
Skip to content