Details
“देवेंद्रजी, प्रथम छुपे दहशतवादी ठेचा!”
28-Feb-2019
| 0
”
जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
jayant.s.karanjavkar@gmail.com
काश्मीरच्या पुलवामात पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारताच्या पंतप्रधानांनी लष्काराला संपूर्ण स्वातंत्र्य दिल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानवर जबरदस्त हल्ला करण्याची भविष्यवाणी वर्तवली होती. तेव्हाच त्यांनी संपूर्ण जगाला जाणीव करून दिली होती. याचा अर्थ असा की पाकिस्तानने भारताची दहशतवाद्यांच्या माध्यमातून कुरघोडी करणे थांबविणे हा अमेरिकीचा पाकिस्तानला इशारा होता.
पुलावामा येथील हल्ल्यानंतर भारतावर पुन्हा हल्ला करण्याचा पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी त्याप्रमाणे तयारी केली होती. ही आपल्या गुप्तचर यंत्रणेलाही माहिती मिळाली होती. त्यानुसार भारतीय लष्कराने बरोबर बाराव्या दिवशी १२ मिराज विमानाने नियंत्रण रेषा ओलांडून जैश-ए-मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केला आणि त्यात ३०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. त्यात अजहर मसूदचे दोन भाऊ आणि मेहुण्याची अक्षरशः राख झाली. भारत हा शक्तिमान देश आहे याबद्दल दुमत नाही. आपली शस्त्रसज्जता पाकिस्तानपेक्षा दुप्पट आहे. पण आजच्या अणुबॉम्ब असलेल्या कोणाही देशांना युद्ध परवडणारे नाही. पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुश्शरफ यांनी पाकिस्तानने भारतावर एक अणुबॉम्ब टाकला तर भारत पाकिस्तानवर एकाचवेळी २० अणुबॉम्ब टाकून पाकिस्तानची राखरांगोळी करू शकतो, हे विधान केले ते इम्रान खान यांच्यासाठी. राजकीय क्षेत्राचा अनुभव नसलेल्या, केवळ क्रिकेटच्या मैदानावर मर्दानी खेळ करून युद्ध करणे सोपे नाही हे परवेझ यांनी इम्रान खानना सांगितले. यातून दुसरा अर्थ असा की, दहशतवाद्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताला नामोहरम करून त्यांच्या प्रगतीमध्ये खीळ बसविण्याचे योग्य ठरेल, असे त्यांना सुचवावयाचे असेल.
पाकिस्तान हा रशिया, चीन व अमेरिकेसाठी खेळणं आहे. त्याचं स्वतःच असं काही अस्तित्त्व नाही. भिकेला लागलेला हा देश भारतावर छुपे युद्ध करत राहून पाकिस्तानी जनतेचे लक्ष अन्य विषयात वेधण्याचा तो सातत्याने प्रयत्न करत राहणार आहे. परकीय गंगाजळी रिकामी आणि दहशतवादाला पैसा पुरविणाऱ्या स्त्रोतांची समीक्षा करण्यासाठी स्थापन झालेल्या “फायनान्शियल अकॅशन टास्क फोर्स”ची अलीकडेच पॅरिसला बैठक झाली. या कृतीदलाने पाकला काळ्या यादीत टाकल्याने पाकिस्तानला जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळणाऱ्या कर्जावर परिणाम होणार आहे. आर्थिक कोंडीत सापडलेल्या पाकिस्तानची अनेक बाजूने नाकेबंदी होईल. परिणामी पाक सरकार काश्मीर आणि भारतातील इतर भागात दहशतवादी समर्थकांना प्रोत्साहन देईल आणि भारताला सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न करील.
मुंबईत मुंब्रा, कुर्ला, वांद्रे, महाराष्ट्रातील रायगड, औरंगाबाद, मालेगाव याठिकाणी दहशतवादी संघटनेशी संबंधित तरुण सापडलेत. हे माथेफिरू तरुण लोकसभा निवडणुकीच्या माहोलमध्ये काहीतरी गडबड किंवा रेल्वे व रेल्वेस्थानक, सिद्धिविनायक, दगडूशेठ गणपती मंदिर, शिर्डीचे साई मंदिर किंवा गर्दीच्या ठिकाण टार्गेट करण्याची शक्यता अधिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मुंब्राची इशरत जहाँ हिने दहशतवाद्याबरोबर गुजरात स्फोट घडविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. तिला व त्याच्या सहकाऱ्यांना गुजरात पोलिसांनी ठार मारले होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी इशरत जहाँच्या कुटुंबाला आर्थिक व न्यायालयीन मदत केली होती. इशरतच्या कुटुंबाचे हाल होऊ नये म्हणून त्यांनी तिच्या भावाला आपल्या कार्यालयात नोकरीला ठेवले होते अशी त्यावेळी चर्चा ठाण्यात जोरात होती. आमदार आव्हाड यांनी या बातमीचा इन्कार आजतागायत केला नाही. तत्कालीन विधान परिषदेचे उपाध्यक्ष वसंत डावखरे यांनी इशरत जहाँच्या कुटुंबियांना ज्या दिवशी तिला मारले त्याच दिवशी जहाँ कुटुंबाला एक लाखाचा धनादेश पाठविला होता. परंतु इशरत जहाँ दहशहतवादी संघटनेशी संबंधित होती हे कळताच डावखरे यांनी तो दिलेला धनादेश त्याचदिवशी ताबोडतोब मागवून घेतला. वसंत डावखरे यांना जर इशरत जहाँ दहशतवादी वाटली आणि म्हणून दिलेला धनादेश मागवून घेतला, परंतु आमदार जितेंद्र आव्हाड मात्र इशरतच्या कुटुंबियांच्या मागे कायम राहिले. दहशतवाद्यांना खतपाणी घालणारे आज आपल्या विधानसभेत आहेत. सरकारने राज्यात काही ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे असलेल्या भागात लक्ष देताना आव्हाडसारख्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांकडेही तरच देश सुरक्षित राहील.
अनेक माथेफिरू दहशतवाद्यांना मुंबईत किंवा राज्यात भाड्याने घरे मिळवून देण्यासाठी मदत करतात. त्यामुळे नवीन भाडेकरूला जागा देण्यापूर्वी पोलिसांना कळविणे किंवा राज्य सरकारने त्याप्रमाणे कायदे करावे. साधारण सन २००९ च्या दरम्यान राष्ट्रवादीच्या एका महिला आमदाराच्या आमदार निवासाच्या खोलीत दहशतवादी राहत असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी त्यांनी इन्कार केला. परंतु आमदारांकडे दहशतवादीही ये-जा करतात म्हणजे आम जनता किती सुरक्षित आहेत हे लक्षात येते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा त्यांच्या भाषणात पाकिस्तानला भारतावर अणुबॉम्ब टाकण्याची गरज नाही कारण मुंबईच्या झोपडयात पाकिस्तानी, बांगलादेशी आहेत. तेच या देशाला घातक आहेत, पण लक्षात कोण घेतोय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आता तुमचं सरकार आहे. राष्ट्रहितासाठी कारवाई करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा याचा बदला घेतला. आता राज्यात व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे झोपडपट्टीतील संशयित दहशतवादी व बांगलादेशींना बाहेर काढा. असे केल्यास पाकव्याप्त भागात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकपेक्षा हा स्ट्राईक मोठा असेल. देवेंद्रजी, तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वैचारिक मुशीतून तयार झाले स्वयंसेवक आहात. तुम्हीच ते करू शकता. कराच, महाराष्ट्र काय देशही राष्ट्रीय विचाराने ढवळून निघेल.”

