Details
दहावीनंतरचे प्रश्न!
10-Jun-2019
| 0
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com
शालांत परीक्षेचे महत्त्व अलिकडे काही वर्षांत बरेचसे कमी झालेले आहे. विविध व्यावसायीक अभ्यासक्रमांसाठी आता प्रवेशपरीक्षा घेतल्या जातात. त्यातील गुण हेच त्या-त्या अभ्यासक्रमासाठी ग्राह्य धरले जातात. त्यामुळे शालांत परीक्षेतील गुण हे केवळ औपचारिकच महत्त्व राखून असतात. हे झाले बारावीचे. पण दहावीच्या गुणांचे तसे नाही. त्याचे महत्त्व अजुनही कायमच आहे. कारण, त्या गुणांवर विद्यार्थ्याला कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळायचा हे ठरत असते. अर्थात सध्याच्या शैक्षणिक पद्धतीनुसार दहावी अधिक दोनच्या स्तरावरच तो प्रवेश असतो. पण आपल्या पाल्याला उद्या म्हणजे बारावीनंतर वैद्यकीय वा आयआयटीसारख्या अथवा एनएलएसारख्या उच्च शिक्षणांच्या नामवंत संस्थेत प्रवेश घ्यायचा असेल, तसा प्रयत्न करायचा असेल, तर आताच ज्युनिअर महाविद्यालयातील त्याचा प्रवेश हा नामवंत महाविद्यालातच व्हावा अशी इच्छा व प्रयत्न सर्वच पालकांचे असतात. यंदाच्या निकालांमुळे त्या स्वप्नांवर सावट आले आहे.
नामवंत महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा तर किमान गुण जितके हवेत तितके आपल्या शालांत परीक्षा मंडळांच्या मुलांना मिळण्याची शक्यता कालच्या निकालांनी मावळलेली आहे. एसएससी बोर्डाच्या गुणांची टक्केवारी धक्कादायकरीत्या खाली आली आहे. त्या तुलनेत आयसीएससी वा सीबीएससी बोर्डांच्या विद्यार्थ्यांना भरपूर अधिक गुण मिळालेले आहेत असे दिसते. म्हणजे कालच्या निकलामध्ये मुंबई विभागातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या साधारणतः साडेपाच हजार इतकीच होती तर अन्य बोर्डांच्या ९० टक्क्यांच्या पुढे असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दहा हजारांच्या पुढे आहे. यामुळे कालच्या निकालने पालकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. हे असे का झाले? टक्केवारी एकदम खाली का आली? यावर आपले शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी म्हटले आहे की, गेली दहा-बारा वर्षे जी मार्कांची सूज आलेली होती ती उतरल्यामुळे निकाल कमी दिसतो.
मुंबई विभागाचा म्हणजेच मुंबई शहर व उपनगरे, ठाणे, पालघर व रायगड या सर्व क्षेत्राचा विचार करायचा तर गतवर्षाच्या तुलनेत यंदा दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 31 हजार 80 ने कमी झाली आहे! तीन लाख 57 हजार 55 विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिली होती. यापैकी दोन लाख 75 हजार 71 विद्यार्थींच उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी परीक्षेला बसलेल्या तीन लाख 38 हजार 609 विद्यार्थ्यांपैकी तीन लाख 6 हजार 151 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे निकालाची टक्केवारी गतवर्षाच्या 90.41 टक्क्यांवरून वरून 77.04 अशी घसरली आहे. रूईया, रूपारेल, केळकर अशा अ वर्गात गणल्या गेलेल्या महाविद्यालयांमध्ये ९० टक्क्यांचे विद्यार्थी प्रवेशासाठी प्रयत्न करत असतात. पण अन्य महाविद्यालयांमधून ७५ टक्क्यांवरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. ती संख्याही यंदा घटलेली आहे. 75 टक्क्यांहून जास्त गुण मिळविणारे केवळ 57 हजार 284 विद्यार्थी यंदा आहेत. गेल्यावर्षी ही संख्या 84 हजार 788 इतकी होती. याचा अर्थ दुसऱ्या व तिसऱ्या वर्गातील महाविद्यालांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कदाचित अधिक संधी मिळेल, पण तिथेही अन्य बोर्डांच्या अधिक गुण मिळवणाऱ्यांशी स्पर्धा होणे अटळच आहे. मुंबई विभागात पश्चिम उपनगरचा निकाल सर्वाधिक 79.59 टक्के इतका लागला आहे. त्याखालोखाल ठाणे 78.55, दक्षिण मुंबई 77.81, रायगड 76.78, पूर्व उपनगर 76.06 आणि पालघर विभागाचा सर्वात कमी म्हणजेच 71.75 असा निकाल लागला आहे. हे सर्व वीस गुणांमुळे घडले आहे. गेल्या वर्षापर्यंत आपल्या एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेचे वीस गुण मिळत होते. त्यांचा फायदा भाषा व समाजशास्त्रातील मुला-मुलींना अधिक होत होता. आता ते गुण देण्याची पद्धत रद्द झालेली आहे. तिथेच कमी टक्केवारीची खरी मेख आहे. तोंडी परीक्षा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना सीबीएसई, आयसीएसई विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी गुण मिळत आहेत. तोंडी परीक्षा रद्द करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाला पालक शिक्षक व विद्यार्थी संघटनांनी विरोधही केला होता.
राज्याचा विचार केला तर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासह, इतर मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्यांची संख्या ८० हजारांच्या आसपास आहे. तर दुसरीकडे राज्य शिक्षण मंडळाच्या निकालानुसार दहावीत ९०पेक्षा जास्त टक्के मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ २५,९४१ इतकी आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांतील अकरावी प्रवेश कठीण बनत आहे. सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई या मंडळाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण दिले जातात. त्यामुळे या मंडळाच्या नव्वदीपार विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे तर एसएससी बोर्डाने ते गुण रद्द केल्याने या आकड्यात घसरण दिसून आली. यात अधिक चिंतेची भर पडत आहे ती मागील वर्षी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे अल्पसंख्याक महाविद्यालयांमधील जागा या फक्त खुल्या आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे तेथील जागांवर मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशाचा मार्ग बंद होणार आहे. त्यामुळे पुन्हा इतर महाविद्यालयांतील प्रवेशावरील ताण वाढणार असून स्पर्धेच्या तीव्रतेचा फटका एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना बसणार आहे.
यंदा अकरावी प्रवेशासाठी मराठा आरक्षण आणि आर्थिक दुर्बल घटकांतील आरक्षण लागू होणार असल्याने खुल्या गटातील विद्यार्थ्यांच्या जागात घटच होणार आहे. अकरावी प्रवेशासाठी अर्जनोंदणीचा पहिला टप्पा कालपासूनच सुरू झाला आहे. प्रवेशाच्या या चिंतेच्या वातावरणातच कोल्हापुरातील एका विद्यार्थिनीची कहाणी प्रेरणादायी ठरावी. तिच्या पालकांनी तिला शाळाप्रवेशाच्या शर्यतीमधूनच बाजूला केले. तिने शालाबाह्य शिक्षण घेतले. तिचा शालेय स्तरावरचा हा प्रयोग महाविद्यालयीन स्तरावर नेता येऊ शकेल का हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. शिक्षण म्हटले की डोळ्यासमोर पहिल्यांदा उभी राहते ती शाळा. शाळेतले शिक्षक, फळा, खडू, झुंडीने वर्गातून बाहेर पडणारे विद्यार्थी आणि तासागणिक बदलणारी घंटा अशा असंख्य आठवणी समोर येतात. मात्र शाळेच्या याच चाकोरीबद्ध मांडणीत जान्हवी पत्की ही मुलगी अडकलीच नाही. तिने दहावीच्या परीक्षेत तब्बल ८४ टक्के गुण मिळवून घवघवित यश मिळवले आहे. जान्हवीचे हे यश कौतुकास्पद आहेच, पण खरे कौतुक तिच्या आई-वडिलांचे केले पाहिजे. त्यांनी प्रवाहाविरूद्ध पोहण्याचा पराक्रम केला आहे. वडील ऋतुराज आणि आई नीलिमा हेच तिचे शिक्षक बनले. कोल्हापुरात राहणाऱ्या पत्कींनी इयत्ता दुसरीपासून लेकीला घरीच शिकवण्याचा निर्णय घेतला व थेट दहावीलाच ती अधिकृत परीक्षेला सामोरी गेली. याबाबत तिचे वडील म्हणतात की, शाळेच्या चाकोरीतून बाहेर पडल्यावरच मुलीच्या बुद्धीला विचारांना चालना मिळेल व तिचे खरे शिक्षण होईल. विषय समजून ती मांडणी करू शकेल असा आमचा ठाम विश्वास होता, तो योग्य ठरला. जान्हवीचा हा प्रयोग दहावी अधिक दोनच्या व पुढच्या महाविद्यालयीन टप्प्यावर नेता येईल का याचा विचार आता शिक्षणतज्ज्ञांनी करायला हरकत नाही..”

