HomeArchive…तर मावळ, शिरूरमध्ये...

…तर मावळ, शिरूरमध्ये परिवर्तन!

Details
“…तर मावळ, शिरूरमध्ये परिवर्तन!”

    07-Feb-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विजय भोसले, मुख्य वार्ताहर, केसरी
bhosale.vijay53@ gmail.com
लोकसभा निवडणुकीचे पडघम देशात सर्वत्र वाजू लागल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये घमासान सुरू झाले आहे. देशातील जनतेला भारतीय जनता पार्टीने आश्वासनांची खैरात करून सत्ता काबीज केली. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर देशातच नव्हे तर संपूर्ण जगात दौरे करून आपली वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. साम, दाम, दंड या नितीचा वापर करून काँग्रेससह अन्य पक्षदेखील नामशेष करण्याचा प्रयत्न केला. देशात विरोधी पक्षांचे अस्तित्त्व आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण केली असताना गुजरात, राज्यस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी या चार राज्यांमध्ये स्वतःला पूर्णतः झोकून दिले. राहूल गांधींवर पप्पू म्हणून टीका करणाऱ्यांना गांधींनी आपल्या नेतृत्त्वाची चमक दाखविली. गांधी नेतृत्त्व करू शकतात, हे दाखवून दिल्यामुळे टीका करणारेच त्यांचे कौतुक करू लागले आहेत. शरद पवार यांचा बालेकिल्ला समजणाऱ्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात पवार यांची जादू चालणार का? कारण, पार्थच्या रूपाने मावळ काबीज होणार का? मात्र, हे काबिज करताना आपल्याकडील गद्दारांची फळी खऱ्या अर्थाने आपल्यावर प्रेम करत असेल तर निश्चितच पार्थला दिल्ली दूर नाही. पण, आपला शिष्य आमदार लक्ष्मण जगताप कोणाची आज्ञा पाळणार यावर त्याचे भवितव्य अंवलबून आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली अश्वासने प्रत्यक्षात जनतेच्या गळी उतरली नाहीत. संपूर्ण देशभर भाजपाच्या विरोधात जनतेचा प्रक्षोभ हळूहळू वाढू लागला आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची मोठी नाराजी असल्यामुळे भारतीय जनता पार्टीला ही निवडणूक सोपी नाही. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने परिवर्तनयात्रा काढून भाजपाविरोधात रान पेटवले आहे. दुसऱ्या बाजूने काँग्रेसने राज्यात मेळावे घेऊन भाजपाच्या कारकीर्दीवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. एकंदरीत पिंपरीतील अजित पवारांच्या भाषणाकडे पाहता त्यांनी पुन्हा एकदा मावळ लोकसभा आणि भोसरी, पिंपरी, चिंचवड या तीन विधानसभा परत घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, त्यांचे शिलेदार त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणार का? का पुन्हा मागील कित्ता गिरवून दादांना फसविणार, हा खरा प्रश्न आहे.

राज्यात भाजपा आणि शिवसेना सत्तेत असून गेली साडेचार वर्षे या दोन्ही पक्षातील नेते एकमेकांविरूध्द आरोप-प्रत्यारोप करून राज्यातील जनतेची करमणूक करत आहेत. कारण, साडेचार वर्षे आरोप करून पुन्हा या दोन्ही पक्षाची युती होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वक्तव्यावरून युती होणार हे आता स्पष्ट झाले आहे. शिवसेनेला 25 जागा आणि भाजपाला 23 जागा यावर शिक्कामोर्तब झाले असून काही ठराविक जागांवरून अदला-बदल करण्याबाबत एकमत होत नाही. मात्र, ते एकमत होईल हे निश्चित. त्यामुळे शिवसेनेची तलवार आता म्यान झाली आहे, हे निश्चित. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातदेखील जागावाटपाबाबत निर्णय अंतिम टप्यात आहे. विरोधी पक्षांच्या मतांची विभाजणी टाळण्यासाठी भारिप बहुजन महासंघाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघेही बरोबर घेण्यास तयार असून त्यांना सहा जागा देण्याची तयारी आहे. भारिपला 12 जागा पाहिजे आहेत. त्यामुळे भारिपने 48 जागा लढविण्याचे जाहीर केले आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने हात पुढे केला असताना भारिपने त्यास नकार दिला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर भारिप बहुजन महासंघाची युती होऊ नये, असे भाजपाला वाटत असल्यामुळे मतांचे विभाजन होऊन काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसेल. असे गणित असले तरी जनतेने साडेचार वर्षांत मतांचे विभाजन झाल्यानंतर काय भोगावे लागते, याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला म्हणावा तितका फटका बसणार नाही, ही राज्यातली वस्तुस्थिती आपण पाहिली.

पिंपरी-चिंचवड हे शरद पवार आणि अजित पवार यांचे राजकीयदृष्ट्या घरचे मैदान समजले जाते. मात्र, या मैदानाला गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्यांच्याच चेल्यांनी भगदाड पाडल्याने पवारांना मोठा राजकीय धक्का बसला. अजित पवारांना या निवडणुकीच्या निमित्ताने आपले पुत्र पार्थ यांना मैदानात उतरवून आपला वारसा पुढे चालवावा हा प्रयत्न असून गेली सहा महिने तशी चाचपणी सुरू आहे. आज मावळ लोकसभा मतदारसंघात चिंचवड, मावळ आणि पनवेल हे तीन विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे आहेत. कर्जत राष्ट्रवादी, उरण शेकाप आणि पिंपरी शिवसेना असे पक्षीय बलाबल असून लोकसभेसाठी हा मतदारसंघ भाजपाला सोडण्यात यावा, असा आग्रह भाजपाने पहिल्यापासूनच लावून धरला आहे. आमदार लक्ष्मण जगताप हे या मतदारसंघातून लोकसभेसाठी इच्छूक आहेत. जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेकडे मतदारसंघ गेला तर खासदार श्रीरंग बारणे सेनेचे उमेदवार असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार असतील. कारण, जगताप-बारणे यांचे राजकीय हाडवैर असून त्यांचे काम करतील की नाही याची शाश्वती नाही. शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला तर आम्हाला जबाबदार धरू नये, असेही जगताप यांनी अगोदरच स्पष्ट केल्यामुळे बारणे पार्थसमोर टिकतील की नाही, याची शाश्वती नाही. शेकाप यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहणार असल्यामुळे पार्थची जमेची बाजू आहे. दुसऱ्या बाजूने पवारांची नाराजी दूर करण्याची संधी यानिमित्ताने जगतापांना मिळेल. त्यामुळे ते निवडणुकीत गप्प राहतील. मात्र, ही जागा भाजपाला सोडली तर मात्र लक्ष्मण जगताप हे उमेदवार असतील आणि जगताप-पवार ही लढत राज्यात महत्त्वाची ठरेल. अजित पवार आणि शरद पवार हा धोका पत्करतील की नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे राजकारणात शेवटच्या क्षणी काहीही होऊ शकते. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात राजकीयदृष्ट्या वेगळे चित्र पाहयला मिळेल.

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेतर्फे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील सलग तीनवेळा निवडून आले आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या लोकसभा मतदारसंघात गेल्या 15 वर्षांत आढळराव-पाटील यांना टक्कर देणारा उमेदवार मिळाला नाही हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दुर्देव आहे. या मतदारसंघात आमदार महेश लांडगे निवडणूक लढणार, अशी त्यांनी हवा केली होती. मात्र, युती होणार म्हटल्यानंतर लांडगे यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. कारण, आढळराव-पाटील यांच्यासमोर निवडणुक लढविणे म्हणजे सोपे काम नाही. मतदारसंघावर असणारी त्यांची पकड, जनसंपर्क, लोकसभेतील कामकाज या त्यांच्या जमेच्या बाजू असल्याने त्यांच्याविरोधात उमेदवार उभे राहण्यासदेखील तयार होत नाही. माजी आमदार विलास लांडे यांना पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदानात उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमदार लांडगे आणि माजी आमदार लांडे हे दोघेही मामे-भाचे असून विधानसभेच्या निवडणुकीमुळे नात्यांमध्ये वितुष्ट आले होते. मात्र, पुन्हा एकदा या दोघांचे मनोमीलन झाल्याची चर्चा आहे. लांडगे यांनी विलासरावांचे काम केले, तर बराच फरक पडेल. त्यादृष्टीने लांडे पुन्हा एकदा उमेदवार होऊ शकतात.

दुसऱ्या बाजूला मंगलदास बांदल हेदेखील लोकसभेसाठी इच्छूक असून लांडे व अन्य उमेदवारांनी नकार दिल्यास बांदल यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळू शकते. एकंदरीत यावेळेस मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. राज्यातील भाजपाविरोधी असणारे वातावरण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडू शकते. मात्र, राष्ट्रवादीच्या शिलेदारांनी प्रामाणिकपणे काम केले तर अडचणीचे ठरणार नाही. पिंपरी-चिंचवडला गद्दारीचा शाप लागलेला आहे. शापमुक्त होण्याची हीच वेळ आहे. मात्र, राजकारणात शेवटच्या क्षणी काहीही घडू शकते. त्यामुळे मावळ आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघात नेमके उमेदवार कोण असणार यावर या दोन्ही पक्षाचे भवितव्य अंवलबून आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या पाच वर्षांतील कारभारावर नाराज असलेल्या जनतेचा पुरेपूर फायदा उचलला तर काँग्रेस-राष्ट्रवादीला ‘अबकी बार दिल्ली दूर नही’!”
 

Continue reading

आसाम-बंगालची निवडणूक फळली? पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही!

पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत निर्माण होणारी महागाईची स्थिती रोखण्यासाठी...

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात; ३५ वर्षीय बालेन शाह पंतप्रधान!

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली असून ३५ वर्षीय बालेन्द्र शाह (बालेन) यांनी शुक्रवारी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. काठमांडूचे माजी महापौर आणि प्रसिद्ध रॅपर ते राजकारणी असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या बालेन शाह यांनी सार्वत्रिक निवडणुकीत...

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...
Skip to content