Details
सिंधू नदीच्या तीरावर असलेल्या लेह लडाख परिसरात प्रस्तरारोहक घडविण्याच्या मोहीमेचा प्रारंभ मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर माऊंटेनरिंग क्लबच्या वतीने लद्दाख माऊंटेनेरिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच सुरू करण्यात आला आहे.
“स्मारकाचे वतीने सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. अशाप्रकारचा उपक्रम राबविणारी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ही भारतातील पहिलीच संस्था ठरली आहे. सर्च अँड रेस्क्यू वर्गात हे प्रशिक्षण दिले जात आहे. सध्या २० जणांच्या तुकडीला हे प्रशिक्षण दिले जात आहे. यात मुलींची संख्याही मुलांइतकीच आहे. यापैकी काहीजण हे अनाथ असून त्यांच्यात कमालीची जिद्द आणि महत्त्वाकांक्षा असल्यामुळे त्यांची निवड केली असून या सर्वांचा या प्रशिक्षणचा संपूर्ण खर्च स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने केला आहे. झंस्कार, द्रोग्पा, आर्यन व्हॅली, शआम, नुब्रा, चांगथांग अशा दुर्गम भागातील हे प्रशिक्षणार्थी आहेत.”
“ज्या भागात हे प्रशिक्षण दिले जात आहे ते समुद्र सपाटीपासून १८,३८० फूट उंचीवर आहे. तिथे वाऱ्याचा वेग ताशी ८ किमी असतो तर गोठणारी थंडी आहे. लडाख हा भारतातील विखुरलेल्या प्रदेशांपैकी एक आहे आणि तिची संस्कृती आणि इतिहास तिबेटशी संबंधित आहे. हे दूरदूरच्या पर्वतीय सौंदर्य आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी लडाख केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित झाला आहे. त्यानंतर तिथे पहिल्यांदाच असा उपक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने राबविण्यात येत असून त्याच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीरांचे गौरव अधिकाधिक प्रमाणात जपण्यासाठी भविष्यातदेखील कार्य केले जाणार आहे, असे स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी सांगितले.”

