Details
कोहलीची बकवास!
20-Dec-2018
| 1
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
कोणताही खेळ म्हटला की खिलाडूपणा हा आलाच. एखाद्या सामन्यात कर्णधाराची चूक झाली तर ती त्याने खिलाडूवृत्तीने कबूल करायची असते. त्यातच त्या कर्णधाराचे मोठेपण दिसून येते. पण भारतीय कर्णधार विराट कोहली याची बकवास ऐकली की, त्याच्या बालिशपणाची कींव येते. नुकताच ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर चषकासाठी चार सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना झाला. तो ऑस्ट्रेलियाने 146 धावांनी जिंकून भारताचा दणदणीत पराभव केला. या सामन्यामुळे मालिकेत 1-1 अशी उभय संघांची बरोबरी झाली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नाथन लायन याने 8 बळी घेतले. पहिल्या डावात तर त्याने 67 धावा देऊन 5 बळी खिशात टाकले. सारांश, ऑफ स्पिनर नाथन हा या सामन्यात भारताचा कर्दनकाळ ठरला.
वास्तविक भारतीय फिरकी गोलंदाज एकेकाळी जगात प्रसिद्ध होते. त्यांच्यासमोर खेळताना दिग्गज फलंदाजांची त्रेधातिरपीट उडत असे. इरापल्ली प्रसन्ना यांचा फ्लाइटमध्ये विविधता असलेला आणि व्यंकट राघवन यांचा अचूक लेंग्थ असलेला ऑफ स्पिन असो अथवा बिशनसिंग बेदी आणि भागवत चंद्रशेखर यांचा लेग स्पिन किंवा गुगली असो. जागतिक किर्तीचे फलंदाज त्यांच्यापुढे हात टेकत होते. किंबहुना एक काळ असा होता की, भारतीय क्रिकेटमध्ये कसोटी पातळीच्या वेगवान गोलंदाजांचा दुष्काळ होता. अनेकदा सुनील गावसकर अथवा एकनाथ सोलकर भारतीय डावाची गोलंदाजीने सुरूवात करत असत. त्यानंतर फिरकी गोलंदाजांकडे सूत्रे दिली जात. वर्षानुवर्षे भारतीय फिरकी गोलंदाज हे जगात कौतुकाचा विषय बनले आहेत. तथापि, गेल्या 25 वर्षांत फक्त तिसऱ्यांदा पर्थ येथील सामन्यात फिरकी गोलंदाज वगळून संघ निवडण्यात आला. अर्थात या निवडीमागे कर्णधार म्हणून विराट कोहली याची प्रमुख भूमिका होती. या सामन्यात नाथनचा ऑफ स्पिन प्रभावी ठरल्यानंतर कोहलीला आपली चूक कळायला हवी होती. ही चूक खिलाडूवृत्तीने कबूल करून त्याने या विषयावर पडदा पाडायला हवा होता. पण त्याने तसे न केल्यामुळेच तो आज अनेकांच्या टिकेचे लक्ष्य बनला आहे.
आपल्या संघाच्या निवडीचे समर्थन करताना कोहली काय म्हणतो पाहा- आम्ही जशी अपेक्षा केली होती तशीच खेळपट्टी निघाली. ऑस्ट्रेलियाचा संघ चांगला खेळल्यामुळेच भारताचा पराभव झाला.’ कोहलीचे पुढचे विधान तर अधिकच हास्यास्पद आहे. तो म्हणतो,तुम्ही जर पाहिले तर असे दिसून येईल की, खेळपट्टीकडून फिरकी गोलंदाजीला अजिबात प्रतिसाद मिळत नव्हता. नाथनने वेगात चेंडू टाकले म्हणूनच त्याला यश मिळाले. फिरकी गोलंदाज न खेळवून आम्ही चूक केली असे आम्हाला वाटत नाही.’ विराट कोहलीचे हे विधान म्हणजे विराट मूर्खपणाचा कळस आहे. फिरकीला प्रतिसाद न देणाऱ्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजाने वेगात गोलंदाजी करून बळी मिळविले असे सांगून तो आपल्या अल्प मतीचे दर्शन घडवित आहे किंवा वेड पांघरून पेडगावला जात आहे. ऑफ स्पिनर नाथन जर वेगवान गोलंदाजी करून बळी घेत होता तर मग भारताचे वेगवान गोलंदाज काय माशा मारत होते? ऑस्ट्रेलियाचे इतर वेगवान गोलंदाज वेगात आणि गोलंदाजीत कमी पडत होते? कोहलीकडे या प्रश्नांचे उत्तर नाही.
कोणताही सामना सुरू होण्याआधी कर्णधार खेळपट्टीची पाहणी करतो. खेळपट्टीवर असलेले अथवा नसलेले गवत, एकूण वातावरण आदी पाहून तो गोलंदाज निवडतो. पर्थची खेळपट्टी देखील कोहलीने सामन्याआधी न्याहाळली होती. ती वेगवान गोलंदाजांना साथ देईल असे त्याला वाटले होते. पण तसे घडले नाही. म्हणजेच कोहलीचा अंदाज चुकला. त्यामुळेच फिरकी गोलंदाजाशिवाय खेळणाऱ्या भारतीय संघावर पराभवाची नामुष्की पत्करण्याची पाळी आली. कोहलीने या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपली संघ निवडताना चूक झाली, असे जरी म्हटले असते तरी कोणी त्याच्या डोक्यात दगड घातला नसता. पण डोक्यात दगड भरल्यागत कोहली स्वत:च्या निर्णयाचे समर्थन करू लागल्यामुळेच त्याला हे खडे बोल सुनवावे लागत आहेत…”

