HomeArchiveकेला नमस्कार, दाखवा...

केला नमस्कार, दाखवा चमत्कार!

Details
“केला नमस्कार, दाखवा चमत्कार!”

    25-Jan-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
shail.dinman@gmail.com
एक सदगृहस्थ आहेत, मित्र आहेत. त्यांना नमस्कार केला की ते उत्तरतात,.. दाखवा चमत्कार.. गुरूवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या गणेशपूजनासाठी एकत्र आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परस्परांना नमस्काराची देहबोली पाहून त्याचीच आठवण झाली. विविध प्रसारमाध्यमांमधून या नमस्कार-चमत्कारांच्या छायाचित्रांना ठळक प्रसिद्धी मिळाली आहे. शिवसेनाप्रमुखांचे राष्ट्रीय स्मारक पण यातूनही फडणवीस आणि उद्धव ठाकरे या राजकीय मित्रांनी (की सद्यस्थितीला प्रतिस्पर्ध्यांनी म्हणावे..) राजकीय स्वार्थच साधला आहे. परस्परांना नमस्कार करतानाची त्यांची देहबोली तरी तेच सांगत होती. नमस्कार करतोय आता चमत्कार दाखवाच.. या आशयाच्या या देहबोलीतून दोघांनीही अनेक गोष्टी साधल्या आहेत. राम मंदिर बांधायला निघालेत, आधी शिवसेनाप्रमुखांचे स्मारक बांधून दाखवा.. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. त्याचवेळी भाजपाला स्मारकाचे काहीही पडलेले नाही म्हणून राग राग करणाऱ्या शिवसेनेला युतीसाठी चुचकारण्याचे योग्य टायमिंग फडणवीस यांनी साधले आहे. युतीतील मतभेद पराकोटीचे विकोपाला गेले असल्याचे दाखवले जात असताना हा चमत्कार घडला आहे. आगामी निवडणुकांसाठी युतीचे काय ते नक्की न करता तळ्यातमळ्यात करत कुंपणावर बसून असलेल्या शिवसेनेला १०० कोटी अर्थसहाय्याचा मखमली नजराणा सरकारी खजिन्यातून म्हणजे जनतेच्या पैशांमधून भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेश केला आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला मुठीत ठेवणाऱ्या, गल्लीपासून दिल्लीपर्यंत दरारा असणाऱ्या शिवसेनाप्रमुखांचे स्मारक युतीसाठी चाललेल्या खटाटोपात गुरफटले आहे. स्वबळावर लढण्याची भाषा करणारी शिवसेना आणि पटकण्याचे इशारे देणारी भाजपा या स्मारकाच्या निमित्ताने एकमेकांचे रुसवेफुगवे दूर करू पाहात आहे. पण यासाठी स्मारकाच्या मुद्द्याचा बुद्धीबळातील मोहऱ्यासारखा उपयोग व्हावा हे बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या, त्यांच्याविषयी आदरभाव बाळगणाऱ्या कुणालाही खंत वाटावी असेच आहे. लोकसभा निवडणुकांची घोषणा आता काही आठवडेच दूर आहे. निवडणुकांचे पडघम सुरू झाल्यावरही शिवसेनेचे नक्की काय ते ठरत नसल्याने किंवा शिवसेना फारच ताणून धरत असल्यामुळे भाजपाची घालमेल सुरू आहे. ही घालमेल एकदाची संपवावी याच हेतूने स्मारकासाठी मदतीची ही शीतल फुंकर घालण्यात आली आहे. युतीबद्दल गेली दोन वर्षे उलटसुलट वक्तव्ये दोन्ही बाजूंकडून सुरू आहेत. पण शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील ठराव लक्षात घ्यायचा तर लोकसभा स्वबळावर लढवण्याचा ठराव कार्यकारिणीने मंजूर केला आहे. नुकताच जालन्यात अर्जून खोतकर यांनी त्याचा पुनरुच्चार केला होता. शिवसेना नेते संजय राऊतही स्वबळाच्या अश्वावर कधीचेच स्वार झाले आहेत. शिवसेनेचे अनेक नेते उद्धव यांचा कल आणि मन पाहून तसे बोलत असले तरी खुद्द उद्धव यांनी मात्र दोन्ही पर्याय आलटून पालटून बोलणे सुरू ठेवले आहे. या परिस्थितीत ते त्यांच्याच पक्षाचा ठराव अंमलात आणतात की धाब्यावर बसवतात हे पाहवे लागेल.

भाजपानेही शिवसेना अचानक घूमजाव करण्याची शक्यता लक्षात घेऊन दोन्ही पर्यायांची तयारी केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे युतीचा फॉर्म्युला तयार असल्याची भाषा करत असले तरी दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत काही वेगळेच सुरू आहे. दोन्ही पक्षांची युती ही गेली अनेक वर्षे टिकली आहे. पण २०१४ मधील सत्तांतरानंतर त्याला तडे जाण्यास खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. शिवसेनेचे मोठ्या भावाचे स्थान भाजपाने हिरावून घेतले. मुख्यमंत्री भाजपाचा झाला, सरकारस्थापनेत प्रारंभी विरोधाचे नाटक केले तरी सत्तेतील सहभागाचा मोह टाळता न आल्याने भाजपाला पाठिंबा द्यावाच लागला, ही सारी शल्ये शिवसेनेला टोचत आहेत. युतीचाच विषय असेल तर तो दोन्ही निवडणुकांसाठी मार्गी लावा, लोकसभेबरोबरच विधानसभेसाठीही जागावाटपाचे सूत्र ठरवा, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. तर भाजपाला सध्या लोकसभेसाठी शिवसेना जोडीला हवी असून लोकसभेतील कामगिरीनंतर विधानसभेच्या जागावाटपाविषयी काय ते ठरवता येईल, अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. लोकसभेत मुसंडी मारल्यावर विधानसभेसाठी शिवसेनेला दबवून अधिक जागा पदरात पाडून घेऊ आणि त्यामुळे सरकारही आपलेच होईल, असा भाजपाचा त्यामागील हेतू आहे.

अर्थात हा हेतू शिवसेना आणि उद्धव ठाकरे हेही जाणून आहेत. युतीचे घोडे अडले आहे ते याच मुद्द्यांभोवती. शिवसेनेकडून दररोज जे टीकेचे बाण मोदी आणि भाजपावर सोडले जात आहेत ते भाजपावर दबाव वाढवण्यासाठीच. यालाच शह देण्यासाठी नुकतीच भाजपाने एक पुडी सोडून दिली होती की, लोकसभा निवडणुकीला युती म्हणूनच सामोरे जावे अशी काही शिवसेना खासदारांची भूमिका आहे. तसे होत नसेल तर हे खासदार निवडणूक लढणार नाहीत. त्यावर लगेचच उद्धव यांनी, ज्यांना भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नये, असा रोखठोक पवित्रा घेऊन काटशह दिला. युतीबद्दल दोन्ही पक्षांचे लोकप्रतिनिधी टेन्शनमध्ये असताना फार काळ ताणून दोन्ही पक्षांच्या नेत्यांना चालणार नाही. तेवढा वेळही आता उरलेला नाही. एकतर स्वबळाचा जरीपटका किंवा कुठल्यातरी मुद्द्यांवरून पुन्हा युतीचे घोडे एवढाच काय तो चमत्कार अपेक्षित आहे!”
 

Continue reading

आसाम-बंगालची निवडणूक फळली? पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही!

पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत निर्माण होणारी महागाईची स्थिती रोखण्यासाठी...

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात; ३५ वर्षीय बालेन शाह पंतप्रधान!

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली असून ३५ वर्षीय बालेन्द्र शाह (बालेन) यांनी शुक्रवारी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. काठमांडूचे माजी महापौर आणि प्रसिद्ध रॅपर ते राजकारणी असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या बालेन शाह यांनी सार्वत्रिक निवडणुकीत...

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...
Skip to content