HomeArchiveआचार्य अत्रे आणि...

आचार्य अत्रे आणि कृतघ्न महाराष्ट्र!

Details
आचार्य अत्रे आणि कृतघ्न महाराष्ट्र!

    15-Jun-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे आपल्यातून जाऊन 13 जून, 2019 रोजी 50 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी त्यांचा सुवर्णस्मृती कार्यक्रम होणे आवश्यक होते. महाराष्ट्र शासनाने जंगी समारंभ करणे अपेक्षित होते. पण तसे काही घडले नाही. संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार आचार्य अत्रे म्हणजे पहाडाएवढे अष्टपैलू व्यिक्तमत्त्व होते. आचार्य अत्रे कोण नव्हते? ते शिक्षक होते, लेखक होते, संपादक होते, नाटककार होते, राजकीय नेते होते, चित्रपट निर्माते होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते झुंजार पत्रकार होते. असे म्हणतात की, विख्यात रहस्यकथाकार बाबूराव अर्नाळकर यांनी आपल्या कादंबरीतील `झुंजार’ या लोकप्रिय नायकाची व्यक्तिरेखा आचार्य अत्रे यांच्याकडे पाहूनच निर्माण केली. अर्नाळकर यांच्या कादंबरीतील झुंजार हा विनोदी, खोडकर आणि निर्भीड असतो. आचार्य अत्रे नेमके तसेच होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी विरोध करताच आचार्य अत्रे त्यांच्यावर अक्षरश: तुटून पडले. नेहरूंप्रमाणेच काँग्रेसचे नेते स. का. पाटील आणि यशवंतराव चव्हाण हेदेखील अत्रेंच्या रडारवर आले. संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली आणि आचार्य अत्रे संपूर्ण महाराष्ट्राचे महानायक बनले.

त्यांनी आपल्या वक्तृत्वाने संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधकांना घाम फोडला. आपल्या लेखणीने सत्ताधाऱ्यांचा कोथळा काढला. आपल्या हजरजबाबीपणामुळे हशा आणि टाळ्या वसूल केल्या. सारांश, आचार्य अत्रे यांच्यामुळे संयुक्त महाराष्ट्र लढ्यात सळसळते चैतन्य निर्माण झाले. कोणत्याही आंदोलनासाठी वर्तमानपत्राचा पाठिंबा हा महत्त्वाचा असतो. या पार्श्वभूमीवर सेनापती बापट यांनी अत्रेंना वर्तमानपत्र काढण्याचे आवाहन केले. त्यावर अत्रे यांनी त्वरीत ते आवाहन स्वीकारून `मराठा’ची घोषणा केली. काही महिन्यांत `मराठा’ सुरू झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला शंभर हत्तींचे बळ प्राप्त झाले. `मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, हे मराठी माणसाच्या मुखातील ब्रीदवाक्य बनले. आचार्य अत्रे प्रत्येक सभेत ते बोलू लागले. त्यावर यशवंतरावजी चव्हाण हे एकदा अत्रेंना म्हणाले की, `संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, असे आपण का म्हणता? केवळ झाला पाहिजे असे का नाही म्हणत? `च’चा आग्रह कशासाठी?’ त्यावर अत्रेसाहेब त्यांना म्हणाले, `तुमच्या आडनावातील `च’ काढा मग तोंडात काय उरते ते पाहा. तेव्हा तुम्हाला `च’चे महत्त्व समजेल.’

आचार्य अत्रे यांच्या हजरजबाबीपणाचे किती किस्से सांगावेत? संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या काळात एकदा गिरगावच्या गायवाडीत आचार्य अत्रे यांची सभा होती. अत्रेंना सभेला येण्यास उशीर झाला. ते जेव्हा भाषणासाठी उभे राहिले, तेव्हा एक वात्रट श्रोता ओरडला, `अत्रे, तुम्हाला यायला उशीर झाला’. त्यावर अत्रे पटकन म्हणाले, `मग गायवाडीत लवकर यायला मी काय बैल आहे?’ (प्रचंड हंशा) अत्रे भाषणासाठी उभे राहिले की लोक हसू लागत. मोठ्याने हसण्याच्या तयारीने सावरून बसत. कधी कधी अत्रे यांचे विनोद काही क्षण लोकांच्या डोक्यावरून जात. पण तो विनोद समजला की, बराच वेळ लोक मोठ्याने हसत राहत. असाच एक अत्रेंचा विनोद पहा: एक सभा रात्री उशिरापर्यंत चालली. अत्रेंचे भाषण सर्वात शेवटी होते. ते भाषणासाठी उभे राहिले, तेव्हा रात्री दहा वाजून गेले होते. अत्रे म्हणाले, `सभ्य स्त्री-पुरूष हो’ मग घड्याळाकडे पाहत ते म्हणाले, `आता जवळजवळ झोपण्याची वेळ झाली आहे.’ काही क्षण लोकांना हे द्विअर्थी वाक्य समजले नाही. पण जेव्हा समजले तेव्हा प्रचंड हंशा पिकला. तर असे होते, आचार्य अत्रे!

त्यांच्या लेखणीमुळे आपल्याला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळाला. पण त्यांची सुवर्णस्मृती साजरी करण्याचे भान कृतघ्न महाराष्ट्राला राहिले नाही. फक्त मुंबई मराठी पत्रकार संघाने 13 जून रोजी आचार्य अत्रे यांच्यासाठी अभिवादन सभा आयोजित करून महाराष्ट्राच्या या सुपुत्राला आदरांजली वाहिली. या कार्यक्रमात संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी, शाहीर खामकर आणि पार्टीने पोवाडे गाऊन उपस्थितांचे मनोरंजन केले. त्यानंतर सुरेश परांजपे यांनी आचार्य अत्रे यांच्या `तो मी नव्हेच’ या नाटकातील `लखोबा लोखंडे’चा एक नाट्यप्रवेश सादर केला. पत्रकार संघाचे सदस्य महेश पावसकर आणि कार्यकारिणी सदस्य विष्णू सोनावणे यांनी आचार्य अत्रे यांच्या दोन अग्रलेखांचे अभिवाचन केले. आचार्य अत्रे यांचे नातू व शिरीष पै यांचे चिरंजीव अॅड. राजेंद्र पै यांनी आपले विचार मांडताना आवर्जून मुंबई मराठी पत्रकार संघाने आचार्य अत्रे यांच्या सुवर्णस्मृतीची आठवण ठेवल्याबद्दल संघाचा गौरव केला. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी `आचार्य अत्रे आणि महाराष्ट्र’ या विषयावर सुमारे तासभर प्रभावी व्याख्यान दिले. संघाचे कार्यकारिणी सदस्य शैलेंद्र शिर्के यांनी कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून आम्ही भावे व अॅड. पै यांच्यासह आचार्य अत्रे यांचे दुसरे नातू, मीनाताई देशपांडे यांचे चिरंजीव, हर्षवर्धन देशपांडे यांचा सत्कार केला. तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या सत्कारांना दाद दिली. सारांश, आचार्य अत्रे यांना महाराष्ट्र विसरला असेल, नाट्यपरिषद विसरली असेल, महाराष्ट्र शासन विसरले असेल, पण मुंबई मराठी पत्रकार संघ विसरला नाही. आचार्य अत्रे यांच्या पवित्र स्मृतीस आमचे कोटी कोटी प्रणाम!”
 

Continue reading

न्यायालये माणसे चालवतात, एआय नाही!

"न्यायालयं ही माणसांद्वारे चालवली जातात, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) नाही," अशा कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याची तातडीच्या सुनावणीची विनंती फेटाळून लावली. २०२१पासून प्रलंबित असलेल्या एका 'प्रथम अपिलावर' प्राधान्याने सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, न्यायाधीशांच्या मानवी मर्यादा...

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...
Skip to content