HomeArchiveअग्निसंस्कारावरही राजकीय पोळ्या...

अग्निसंस्कारावरही राजकीय पोळ्या भाजल्या!

Details
अग्निसंस्कारावरही राजकीय पोळ्या भाजल्या!

    18-Feb-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
jayant.s.karanjavkar@gmail.com
दहशतवाद्यांचा आपल्या जवानांवर हल्ला होणे काही नवीन नाही. मात्र बुधवारी पुलवामा येथे आपल्या जवानांवर झालेला हल्ला भेकड होता असे म्हणता येणार नाही. तो हल्ला पूर्वनियोजित होता. अडीच हजार जवानांचा ताफा चाललेला असताना काश्मीरच्या एका २२ वर्षाच्या युवकाने आपल्या जवानांच्या एका ताफ्यावर हल्ला करावा आणि त्यात आपले ४४ जवान शहीद व्हावेत इतकी लाजिरवाणी घटना गेल्या ७० वर्षांत झाली नाही. राग, संताप, चीड याचा उद्रेक भारतीयांच्या मनात होणारच, याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. विशेष म्हणजे जवानांच्या या ताफ्यामधील एका गाडीवर २०० किलो स्फोटकांनी भरलेली दहशतवादयाची गाडी आदळली, तेव्हा त्याच भागात काही दहशतवादी लपून होते. त्यांनी आजूबाजूच्या गाडीवर गोळीबार केला. एवढी जय्यत तयारी असताना आपल्या गुप्तचर यंत्रणेला ते कळू नये. स्वतःला जेम्स बॉण्ड समजणारे डोवाल यांनाही याची माहिती नसावी ही खरं म्हणजे लांच्छनास्पद बाब म्हणावी लागेल. एकंदरीत पाहता हा हल्ला आपल्या बेजबाबदार कार्यावर आहे. हल्ल्याची माहिती असतानाही अधिकारी बेफिकीर राहवेत याबद्दल जगात भारतीय कारभाराच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या आहेत.

केंद्र सरकार चंद्रावर मानव आणि मंगळावर जाण्याचे स्वप्न पाहत आहे. परंतु प्रत्यक्षात आपण आपला देश सुरक्षित ठेवू शकत नाही. या विषयाला केंद्र सरकारने प्राधान्य दिले पाहिजे. ज्या देशाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही, तो भारत देश महाशक्ती कसा होणार? सर्जिकल स्ट्राईक करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५६ इंच छातीची किमया दाखविली आणि त्याच छातीवर दहशतवाद्यांनी हल्ला करून आपण षंढ असल्याचे दाखवून दिले आहे. एक २० वर्षाचा काश्मिरी मुलगा पाकिस्तानातून प्रशिक्षण घेतो. पुन्हा भारतात येऊन जवानांच्या ताफ्यावर हल्ला करून ४४ जवानाच्या चिंधड्या उडवितो, याला काय म्हणावे? पुलवामा येथील दहशती हल्ल्याच्या निमित्ताने राग, चीड, संताप, निदर्शने, काळे झेंडे जे जे करता येईल ते लोक रस्त्यावर उतरून करत आहेत. अशावेळी मागचे उट्टेही काढण्यात हे लोक विसरत नाहीत. सुप्रसिद्ध क्रिकेटपटू व काँग्रेसचा मंत्री नवज्योत सिंह सिद्धू याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला जाऊन पाकिस्तानचे जे गुणगान गायले, त्याचे परिणाम म्हणून ‘कपिल शर्मा शो’मधून त्याला कायमचे हाकलून लावले. भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीय यांनी हे आंदोलन छेडले होते. इम्रान खानने भारतातील इतर क्रिकेटपटू म्हणजे सुनील गावस्कर, रवी शास्त्री यांनाही आमंत्रित केले होते. परंतु त्यांना इम्रान खानचा स्वभाव माहीत असल्यामुळे ते त्याच्या शपथविधीला गेले नाहीत. निदान खूशमस्कऱ्याया आणि मर्कट चाळे करणाऱ्या नवज्योतने गावस्करबरोबर चर्चा तरी करायला पाहिजे होती. म्हणतात ना, आधीच माकड, त्यात मद्य प्यायलेला..

आमचे राजकीय नेतेही निषेध करण्यासाठी पुढे पुढे धावले. त्यांनी जवानांच्या बलिदानाऐवजी आपल्या राजकीय हेवेदाव्यांचा हिशेब चुकता केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी शहीद जवानांविषयी वेदना व्यक्त करण्याऐवजी नरेंद्र मोदी यांच्यावर राजकीय प्रचाराचा आरोप करून त्यांच्यावर निशाणा साधला. म्हणजे संवेदनाऐवजी राजकीय स्व-वेदना अधिक होत्या. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात भरगच्च मेळावा आयोजित केला होता. मेळावा सुरू होण्यापूर्वी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. शहिदांच्या पराक्रमाचे ‘कौतुक’ केल्यानंतर नारायण राणे यांनी नेहमीचे शिवसेनाविरुद्ध नारायणास्त्र बाहेर काढले. संपूर्ण देश दुःखात असताना त्यांनी आपली जुनी मळमळ बाहेर काढली. शिवसेनेमुळे मुंबईतून मराठी टक्का कमी झाला, पण हे बोलताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ते ३९ वर्षे होते. शिवसेनाप्रमुखांनी त्यांना मुलासारखे वागविले आणि विश्वासू होता म्हणूनच त्यांनी नारायण राणेंना मुख्यमंत्री केले होते. त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांना सांगितले असते तर मराठी टक्का कमी झाला असता का? मराठी टक्का कमी होण्यात आपलाही मोलाचा वाटा आहे हे ते विसरले. आज राजकीय क्षेत्रात नारायण राणे हा एक हसण्यावारी नेण्याचा विषय झाला आहे. त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी यांच्याबरोबरची संगत हा चेष्टेचा विषय झालाच आहे आणि ज्या भाजपाबरोबर ते आहेत तोच भाजपा मातोश्रीवरील उंबरठे झिजवत आहे. नारायण राणे भाजपाच्या या चाटूगिरीवर आसूड न ओढता शिवसेनेवर सूड उगवत आहेत. पुलवामा येथे बलिदान झालेल्या शहीदांना आदरांजली वाहून झाल्यानंतर त्यांनी सिंधुदूर्ग-रत्नागिरी लोकसभेचे उमेदवार म्हणून निलेश राणे यांचे नाव जाहीर केले. दुखवट्यात शुभ घोषणा करत नाहीत. परंतु राणेंना प्रवाहाच्या विरोधात जाऊन ‘प्रहार’ करण्याची सवयच जडली आहे, त्याला कोण काय करणार?

भाजपाचे खासदार कपिल पाटील व हिंदू सेवा यांच्या संयुक्त प्रयत्नातून शहापूर येथे आदिवासींसाठी सामूहिक विवाह आयोजित करण्यात आला. शहीद जवान हे आपल्या कुटुंबापैकी एक आहे ही भावना मनात ठेवून सर्वजण शुभकार्य पुढे ढकलतात. पुढे ढकलले तर पुढच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपलब्ध असतील की नाही आणि चमकेशगिरी करण्यास मिळणार नाही या भीतीपोटी एक हजार आदिवासींचा विवाह पुढे ढकलणे म्हणजे वोटबँकला आव्हानच आहे, असा विचार करूनच कपिल पाटील यांना शहीद जवान हे क्षुल्लक वाटले असावेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि हेलिकॉप्टरची कुंडली काय जमत नाही. सध्या ते कोणत्याही कार्यक्रमाला गेले तरी हेलिकॉप्टरसारखे भरकटलेले असतात. सांगलीत हा प्रकार घडला. त्यानंतर ते औरंगाबाद येथे गेले असता त्यांना ऍसिडिटीचा त्रास झाला. ताबडतोब मुंबईला रवाना झाले. पुलवामा बॉम्बस्फोट घटनांच्या जखमा ताज्या असताना त्यांनी भाजपा-शिवसेना युती होण्यासाठी, ऍसिडिटीचा त्रास होत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. परंतु यात फडणवीसांना एकट्यांना दोष देता येणार नाही. अशावेळी उद्धव ठाकरे यांनी सध्या देशात दुःखाचे वातावरण आहे, आपण हा प्रश्न फोनवर बोलून निकालात काढू शकतो असेही सांगितले नाही. `मातोश्री’वर आलंच पाहिजे हा माजोर विचार मनात संचारात असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन पावले मागे घेऊन युती केली. परंतु लोक लाजेखातर त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि लोकहितांच्या प्रश्नांवर चर्चाच झाल्याचे सांगून दोघांनी स्वतःची अब्रू राखली. पण म्हणून, दुखवट्यात त्यांनी ‘युती’ची पोळी भाजून घेतली, हे तर नाकारता येत नाही?

लोकसभा निवडणूक आणि पुलवामा स्फोट हे मोदी सरकारपुढे मोठे आव्हान आहे. मात्र अशावेळी सर्व राजकीय पक्षांनी नरेंद्र मोदी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनी नरेंद्र मोदीवर टीका करण्याची संधी सोडली नाही. मुंब्राच्या इशरत जहाँ या अतिरेकीला त्यांच्या पक्षाचे विधानपरिषदेचे उपाध्यक्ष दिवंगत वसंत डावखरे यांनी एक लाखाचा धनादेश सकाळी पाठविला होता आणि ती इशरत अतिरेकी आहे हे समजल्यावर त्यांनी तो एक लाखाचा धनादेश संध्याकाळी मागवून घेतला. पण त्याचवेळी कळवा-मुंब्राचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी इशरतच्या कुटुंबाला आर्थिक व न्यायालयीन कामाकाजात स्वतःहून मदत केली होती. ठाण्यात अशीही चर्चा होती की इशरतच्या भावाला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या कार्यालयात नोकरीला ठेवले होते. शरद पवारांनी एक बोट नरेंद्र मोदी यांच्याकडे दाखविण्यापूर्वी या घटनेचा नक्कीच विचार करावा. राजकीय पोळी भाजा, पण त्यातही तारतम्य असले पाहिजे.”
 

Continue reading

आसाम-बंगालची निवडणूक फळली? पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही!

पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत निर्माण होणारी महागाईची स्थिती रोखण्यासाठी...

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात; ३५ वर्षीय बालेन शाह पंतप्रधान!

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली असून ३५ वर्षीय बालेन्द्र शाह (बालेन) यांनी शुक्रवारी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. काठमांडूचे माजी महापौर आणि प्रसिद्ध रॅपर ते राजकारणी असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या बालेन शाह यांनी सार्वत्रिक निवडणुकीत...

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...
Skip to content