Details
विनय गजानन खरे
kharevinay196509@gmail.com
“जागतिक नौदल अमेरिका, रशिया, फ्रांस, जपान, इंग्लंडआधी देशांच्या नंतर सहाव्या स्थानी असलेल्या नि ‘ब्लू वॉटर नेव्ही’ असा मान मिळवण्याच्या क्षमतेच्या भारतीय नौदलाच्या दृष्टीने अतिशय दुःखाचा दिवस उजडलाच! गेल्या कालखंडात कोणीही राज्यकर्ते ना आय एन एस विक्रांतला न्याय देऊ शकले, ना आताचे आय एन एस विराटला जागा नि आर्थिक मदतीची तरतूद मिळवून देऊ शकले. त्यामुळे विक्रांतप्रमाणेच विराटवर कामगिरी बजावलेल्या नौसैनिक – अधिकारी वर्गात शोकाची लाट पसरली आहे नि संतापही व्यक्त होतोय. अनेक देशांतून अशा गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या नौकांचे जतन, संवर्धन करून इतिहास जपला जातो नि पर्यटनही जोपासले जाते. याबाबत भारतीय अब्जोपतीदेखील पुढाकार घेण्यास कमी पडले. पक्षीय निधीसाठी दारात जाणारे यासाठीचा प्रस्ताव घेऊन का गेले नाहीत अशी विचारणा होत आहे की त्यांनी देशभक्ती दुर्लक्षित करून नफा-तोटा पत्रकच पाहिले?”
आय एन एस विराट तांत्रिकदृष्ट्या २०१७ साली निवृत्त झाली असली तरी ती आपले स्मारकात रूपांतर होईल या आशेवर मुंबई गोदीत विसावली होती. कुठेतरी आधीच्या विक्रांतची भंगारात वासलात लावली गेली असल्याने आपलेही तसेच होणार ही धाकधूक तिलाही होतीच. पण विक्रांतच्या नशिबी बजाज या मोटरबाईक बनवणाऱ्या कंपनीचे दार पाहणं नशिबी होतं. त्यांनी विक्रांतच्या पत्र्याचा वापर करून विक्रांत बाईक बाजारात आणली. त्याचा लाभ त्यांना किती झाला हे बजाजच जाणोत! विराटसाठीही अनेक स्थळे पाहण्याची कागदी घोडी नाचवण्यात आली. या अवाढव्य खर्चाच्या नौकेला कोण सांभाळू शकेल याचा शोध घेण्यात आला. विशेषतः किनारपट्टीवरील राज्यांनी पुढाकार घेत सांभाळ करावा अशी केंद्र सरकारची इच्छा होती. अनेकांनी मी मी म्हणत पुढाकार घेतला. पण प्रत्यक्षात हिची ‘सोय’रिक पत्करण्यास कोणीच तयार झाले नाही हे दुर्दैव!
“अखेर तिचे सर्व कागदी सोपस्कार आटोपून विराट, आज १९ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी एकच्या सुमारास साश्रु नयनांनी गुजरातकडील अलंग बंदराकडे निघाली, जिथे जहाज तोडणीचे काम चालते. खरं तर कालच ही तिकडे रवाना होणार होती. मात्र कागदपत्रांची पूर्तता होण्यास विलंब झाल्याने आज ती अखेरच्या प्रवासास निघाली. तिथे पोहोचण्यासाठी दोन दिवस लागणार असल्याचे सांगण्यात आले. गुजरातमधील जहाज तोडणी करणाऱ्या श्रीराम शिपिंग कंपनीने ३८ कोटी ५० लाख रुपयांच्या बोलीने लिलावात ही नौका घेतली असे सूत्रांनी सांगितले.”
विराटचा जीवनपट!
“गेल्या २०१७ साली मार्चमध्ये निवृत्त झालेल्या ‘विराट’च्या जीवनपटाकडे पाहू. १८ नोव्हेंबर १९५९ रोजी रॉयल नेव्हीत विमानवाहक नौका म्हणून ‘हर्मीस’ नावाने दाखल झाली. इंग्लंडच्या बॉरो येथील विकर्स शिपयार्डमध्ये ही तयार झाली. त्यावेळी नवी कोरी असल्याने रूबाब काही औरच होता.. (अजूनही काही कमी नाही). या अत्याधुनिक युद्धनौकेवर शक्तिशाली वाफेची इंजिन, सुयोग्य कोनीय डेक, क्रांतिकारी विमान अवतरण आरसा प्रणाली, वैशिष्ट्यपूर्ण रडार, आधुनिक ए आय ओ प्रणाली, आण्विक पर्यावरणात कार्यरत राहण्याची क्षमता अशी तिची वैशिष्ट्ये होती.”
“त्यावेळी भारतीय महासागरात असलेल्या चारपैकी एक आघाडीची युद्धनौका म्हणून १९७०पर्यंत हर्मीस इंग्लंडच्या सेवेत होती. विविध प्रकारच्या विमान वाहक क्षमतेत स्कीमीटर – बक्कानीअर एम के २ इंटरसेप्टर/स्ट्राईक, गॅजेट ए ई डब्लू प्रकारची विविध हॅलिकॉप्टर यांचा समावेश होता. १९७०च्या दशकात हर्मीस युद्धनौका ही भूमिका सोडून कमांडो कॅरियर किंवा हॅलिकॉप्टर उतरवण्याची सोय अशा भूमिकेत ती गेली. १९७६पर्यंत ‘हॅंगर’ म्हणूनही तिने काम केले. १९८०पर्यंत तिने हे काम केले. मधल्या काळात सी हॅरियर जातीच्या विमान चाचण्या झाल्या. सी हॅरियर ही जगातील व्ही स्ट्रोक प्रकारची एकमेव लढाऊ विमाने आहेत. निरनिरळ्या क्षमता सिद्ध करताना १९८२च्या फॉकलंड लढ्यात सहभाग घेऊन अर्जेंटिनाकडून दोन भूभाग परत मिळवण्यात तिचा महत्त्वाचा वाटा होता. या शंभर दिवसाच्या लढाईत ९ हजार सागरी मैल प्रतिकूल हवामानात सी हॅरियरच्या २३७६ खेपा, शत्रूच्या २३ विमानांचा खात्मा अशी कामगिरी बजावताना शत्रूच्या हल्ल्यात केवळ एक विमान नौकेने गमावले. कोणताही प्रमुख बिघाड न होता नौकेची ही सर्वोत्तम कामगिरी.. आपल्या २५व्या वर्षात पदार्पण करताना २२ नोव्हेंबर १९८३ रोजी ‘हर्मिस’ने रॉयल नेव्हीची वस्त्रे उतरवली. पण, बहुधा ती नव्याने चढवण्यासाठीच!”
“साधारणत: ८०-९०च्या दशकात, विक्रांतच्या निवृत्तीनंतर काय, याची चर्चा भारतीय नौसेना करू लागली. भारतीय नौदलाला अधिक सक्षमता आणि स्थैर्य मिळवून देण्यासाठी २४ एप्रिल १९८६ रोजी संसदेत, ६३ मिलीयन पौंड खर्च करून भारत हर्मिस खरेदी करीत असल्याची घोषणा झाली. फेब्रुवारी १९८५त त्यासाठी प्रक्रिया करून हर्मिस ‘बुक’ करण्यात आली होती. नौकेची पुनर्बांधणी आणि अन्य डागडुजीनंतर इंग्लंडच्या प्लायमाऊथ येथुन हिंदुस्थानचे ब्रिटनमधील तत्कालिन उच्चायुक्त डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते जलावतरण झाले. भारतीय नौदलात ‘आय एन एस विराट’ म्हणून ती दाखल झाली, तिचे नेतृत्त्व कॅप्टन विनोद पसरिचा यांच्याकडे होते. या युद्धनौकेवर सेवा बजावलेला काही कर्मचारी मुंबई गोदीत उपस्थित होते. कोरोना आपत्तीमुळे फार कमी जण यावेळी हजर राहू शकले. या विराटचे नेतृत्त्व केलेले चारजण पुढे नौदल प्रमुख ऍडमिरल पदावर पोहोचले. त्यात ऍड माधवेन्द्र सिंग, ऍड अरूण प्रकाश, ऍड एन के वर्मा आणि ऍड डी के जोशी यांचा समावेश आहे.”
“‘जलमेव अस्य, बलमेव तस्य’ हे संस्कृत ब्रीदवाक्य विराटसाठी योजले गेले. त्याचा अर्थ असा.. जो जलात वास्तव्य करतो, विहारतो त्याने बलशाली असलेच पाहिजे. त्या समुद्रावर त्याची सत्ता असलीच पाहिजे. विराटच्या मानचिन्हात आकाश, सम्राट, गरूड आणि जे पाच बाण दाखवलेत ते त्याची मारक क्षमता दर्शवतात. आवश्यक त्या चाचण्या पुनश्च झाल्यावर विराट सज्ज झाली. विक्रांतच्या सहाय्याने शत्रूवर करडी नजर रोखून असलेल्या विराटला जुलै १९८९मध्ये इंडो श्रीलंकन शांती सेनेतील जवानांना माघारी आणण्यासाठी गेली. तमिळ-सिंहली बंडखोरी, त्यातून धुमश्चक्री असा तो प्रकार होता. तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांनी श्रीलंकेबरोबर शांतीसेना करार केला. १९८६मध्ये, त्यावरून त्यांच्यावर श्रीलंका दौऱ्यात सलामी घेताना हल्ला झाला. पुढे १९९१मध्ये तमिळ बंडखोर प्रभाकरनच्या साथीदारांनी निवडणूक प्रचारादरम्यान हत्त्या घडवून आणली. ८९नंतर काही काळ विराट (ऑपरेशन पवन) श्रीलंका समुद्रापासून अंतर ठेवून एल. टी. टी. ई. बंडावर लक्ष ठेवून होती.”
“संसदेवर २००१च्या १३ डिसेंबरला झालेल्या हल्ल्यानंतर अरबी समुद्रात ‘ऑपरेशन पराक्रम’ सुरू झाले. ऑक्टोबर २००२पर्यंत १० महिने विराटने नेतृत्त्व केले. तिच्या मारक क्षमतेत लढाऊ एअरक्राफ्ट सी-हॅरीएर, हेलिकॉप्टर सी किंग 42 बी/सी, चेतक, कमोव 31, यांचा समावेश होता. तर पंधराशे नौसैनिक-अधिकारी, 25 लढाऊ विमाने तैनात होती. देशसेवा करताना संबंधित कप्तानांच्या नेतृत्त्वाखाली विराटने सामाजिक कार्यातही भाग घेतला. वैद्यकीय-रक्तदान शिबीरे, शालेय विद्यार्थ्यांच्या बोटीवर बोटीवर भेटी, अशा उपक्रमांबरोबर देशाच्या विविध भागातील अनाथ मुलांचा सांभाळ करण्यातही विराटने पुढाकार घेतल्याचे सांगितले जाते. विराटने आपल्या कार्यकाळात २२५८ दिवसांची सेवा देशासाठी बजावली. यात ५ लाख ९० हजार नोटिकल मैल इतका संचार तिने समुद्रात केला, तर २२ हजार ६२२ तासांची उड्डाणे तिच्या डेकवरून झाल्याची माहिती नौदल प्रवक्ता कमांडर मेहुल कर्णिक यांनी दिली.”
स्मारक कशासाठी?
“आपल्या देशात विविध प्रकारची स्मारकं असताना हे अजून कशाला अशी विचारणा कोणी करेल. ‘विक्रांत’चे स्मारक यासाठी की नापाक पाकचे कंबरडे मोडण्यात मोठा वाटा होता. तरी ते स्मारक उभे नाही राहिले, किती कर्मदरिद्री आपण.. तो इतिहास सर्वांसमोर असावा. विमानवाहू नौका बघणे सहज शक्य नसते. मग ती स्मारकाच्या स्वरूपात असावी, जेणेकरून नौदलाविषयी माहिती वाढेल. त्यासाठी लहानथोरांचे कुतूहल शमेल. त्यातून सैन्यदलाविषयी आकर्षण वाढून सुयोग्य अधिकारी, जवान मिळतील हीदेखील कारणे आहेत. विक्रांत नाही तर आता विराट तरी लोकांसमोर उभी राहवी अशी भावना होती. कारण ती देशाची दुसरी विमानवाहू नौका जी निवृत्त झालीय आणि त्यानंतर स्मारक उभारायचे झाल्यास तीस वर्षं वाट पाहावी लागणार.. विक्रमादित्यकडून ३० वर्षं सेवा मिळणार आहे. मग लढाऊ, शौर्याचा वारसा कोण सांगणार?”
“या पार्श्वभूमीवर विराटचे स्मारक अत्यावश्यक वाटत होतं. पण, विविध कारणं पुढे करीत नौदल प्रमुखांनीच यात खोडा घातलाय. ३१ मे २०१७ रोजी खोडा घालणारे तत्कालीन नौदलप्रमुख निवृत्त झाले. त्यांनी विक्रांतचा दाखला देत हे स्मारक अव्यवहार्य होईल अशी भूमिका घेतली होती. युती सरकारच्याच काळात १९९७-९८ साली ‘विक्रांत’ निवृत्त झाली होती. केंद्रात राज्यात त्यावेळी भाजप शिवसेनेचे सरकार २००४पर्यंत अस्तित्त्वात असूनही स्मारकाचा निर्णय पुढील दहा-बारा वर्षं रेंगाळत पडला नि समुद्री पाण्याने झीज होऊ लागल्याने अखेर तिला भंगारात काढण्याची नामुष्की देशावर आली.”
सध्या ‘विराट’ भारतीय नौदलाच्या मुंबईतील गोदीत उभी आहे. आंध्र प्रदेशने विशाखापट्टणम बंदराजवळ स्मारक उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ‘विराट’च्या स्मारकाचा निर्णय झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक्स येथे ते उभारण्याचा प्रस्ताव होता. किनाऱ्यापासून सात किमी अंतरावर काँक्रीट पायाभरणीवर ती स्थापित होईल असे म्हटले गेले. या नौकेवर वस्तुसंग्रहालयासह अन्यही पर्यटक आकर्षित होतील अशा सुविधा दिल्या जातील. साडेआठशे कोटी रुपयांचा हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारला जाणार होता. सिंधुदुर्गात आधीच ‘सी वर्ल्ड’ येऊ घातलं असता याऐवजी हे ‘विराट’ स्मारक रायगड रत्नागिरीत उभारावे अशी मागणी होऊ नये म्हणजे मिळवले. अशा अनेक चर्चा त्यावेळेपासून होत राहिल्या. त्या वांझोट्या ठरल्या नि आम्हीही!
“‘विराट’च्या निवृत्तीपूर्वी सहा महिने अगोदर ‘विक्रांत’सारखा या जहाजाच्या स्मारकाचा खेळखंडोबा होऊ नये असे एका लेखात पूर्वी म्हटलं होतं. तत्कालीन संरक्षण मंत्री पर्रिकरांनी यात दिरंगाई करू नये असे सूचित केले होते. अखेर तीन वर्षानंतर ही तिला कोणी वाली मिळाला नाही. राज्यातील नवे सरकार काही न्याय देईल अशी अपेक्षा होती. त्यांनाही आपलं ‘बुड’ टिकवण्याचा संघर्ष मागे लागला. अजूनही तेच स्थिर नाहीत. मग विराटचे ‘बुड’ निश्चित करायला वेळच नव्हता. मुख्यमंत्री ठाकरेंची आमदारकी, नंतर कोरोना, परिषद निवडणूक यात त्यांना याकडे बघायला वेळच नाही. पण शेवटी तेच झालं. राजवट कोणाचीही असो. काही बाबी आपण जतन करण्यात कुचकामी ठरतो हेच खरे!”

