HomeArchive.. अखेर खासदार...

.. अखेर खासदार बारणेंचे जगतापांपुढे लोटांगण!

Details
.. अखेर खासदार बारणेंचे जगतापांपुढे लोटांगण!

    03-Apr-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विजय भोसले, मुख्य वार्ताहर, केसरी
bhosale.vijay53@ gmail.com
महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना उमेदवारी दिल्यामुळे ही निवडणूक पवार कुटुंबियांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरली आहे. अजितदादांनी यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्यादृष्टीने ही निवडणूक म्हणजे तारेवरची कसरत अशीच असून गेली काही वर्ष पारंपारिक राजकीय हाडवैर असणारे आमदार लक्ष्मण जगताप यांनी तटस्थ भूमिका घेतल्यामुळे नेहमीच तोऱ्यात असणाऱ्या बारणे यांनी अखेर लक्ष्मणाच्या चरणी लोटांगण घातले. मात्र, अद्यापही लक्ष्मणाने आशिर्वाद न दिल्यामुळे बारणे चिंतेत आहेत. लक्ष्मणाला विनंवणी करण्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत, भाजपचे संकटमोचक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन बारणे यांचे काम करण्याची विनंती केली. मात्र, जगताप यांनी अद्यापही होकार न दिल्यामुळे खासदार बारणे सध्यातरी गॅसवर आहेत. दुसऱ्या बाजूला अजितदादांनी आपली सर्व ताकद पणाला लावून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सर्वांना बरोबर घेऊन आपल्या मुलाला कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठी लवचिक समन्वयाची भूमिका घेऊन एक वेगळी भूमिका घेतल्याचे पाहयला मिळत आहे.

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात आमदार जगताप यांनी आपला चांगलाच दबदबा बसविला आहे. 1986 पासून आजपर्यंत ते सत्तेत आहेत. त्यांनी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विधान परिषद सदस्य, दोन वेळा आमदार, 2014 च्या निवडणुकीत त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने लोकसभेची निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांच्या विरोधात खासदार बारणे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमध्ये बारणे दिड लाखांच्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढविली असता ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे शहराध्यक्षपद जगताप यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीची सत्ता उन्मळून काढून भाजपचे कमळ फुलविले. त्यास भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचीही साथ मिळाली आणि एकहाती महापालिकेची सत्ता मिळाल्याने ज्या अजित पवारांनी सलग 15 वर्षे महापालिकेत सत्ता गाजवून शहराचा कायापालट करत विकासाची गंगा पोहोचविली, राज्यातच नव्हे तर देशात पिंपरी-चिंचवडचे नाव विकासकामाच्या बाबतीत पुढे नेले, तेथे भाजपची सत्ता आली. महापालिकेतील काही चुकीच्या माणसांच्या हातात सत्ता दिली गेल्याने राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करून भाजपने वर्षभर रान पेटविले. त्यास राष्ट्रवादीने समर्पक उत्तर न दिल्यामुळे या शहरातील जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला आणि दादांच्या साम्राज्याला धक्का लावला. पिंपरी-चिंचवडचा पराभव हा दादांना जिव्हारी लागलाच होता. मात्र, साहेबही या पराभवाची मोठी सल कायम मनात ठेवून होते. कारण, केंद्र सरकारकडून येथील विकासासाठी भरपूर निधी, त्याचबरोबर राज्य सरकारकडूनही भरपूर निधी आणि विकासासाठी लागलेल्या मंजुऱ्या देण्यात मागेपुढे पाहिले गेले नाही. त्यामुळे मनामध्ये एक मोठी नाराजी जाणवत होती. ही झाली पिंपरीतील पराभवाची पार्श्वभूमी.

जगताप यांना कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची निवडणूक लढवायची होती. त्यादृष्टीने त्यांनी तयारी केली होती. मावळ मतदारसंघातल्या चिंचवड, मावळ, पनवेल या तीन विधानसभा भाजपकडे आहेत तर पिंपरी विधानसभा शिवसेनेकडे आहे. उरण शेकाप, कर्जत-खालापूर राष्ट्रवादीकडे आहे. असे पक्षीय बलाबल असताना हा मतदारसंघ भाजपला मिळेल, त्यादृष्टीने जगताप यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मोर्चेबांधणी केली. मात्र, त्याला यश आले नाही. जगताप यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनुकूल होते. मात्र, त्यांना भाजप सोडायचा नसल्यामुळे त्यांनी शेवटपर्यंत नकार दिला. मात्र, त्यांचे बंधू शंकर यांना उमेदवारी देण्याबाबत प्रयत्न केले. मात्र, त्याला यश आले नाही आणि शेवटी बारणे यांच्या उमेदवारीची घोषणा करून जगताप लोकसभा लढणार या शक्यतेला अखेर पूर्णविराम मिळाला.

खासदार बारणे उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाले असले तरी जगताप यांनी वेगळी भूमिका घेतली तर निवडणूक जिंकणे त्यांना सोपे नाही याची कल्पना बारणे यांना आहेच. शिवाय जगताप यांनी शिवसेनेच्या नेत्यांना बारणे निवडून येऊ शकत नाहीत, तुम्ही उमेदवार बदला, असे सुचविले होते. त्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही जगताप यांची भेट घेऊन शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या प्रयत्नालाही अद्याप यश आलेले नाही. कारण जगताप यांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केली नाही. जगताप यांचे कार्यकर्ते जोपर्यंत भाऊ निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आम्ही बारणे यांचे काम करणार नाही अशा बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत. दुसऱ्या बाजूला जगताप यांनी उद्या वेगळा निकाल लागला तर आम्हाला जबाबदार धरू नये, असे बजावले आहे. शेवटचा पर्याय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत जगताप यांची शिष्टाई करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. कारण, केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, म्हणून भाजप-शिवसेना युतीचे जास्तीत-जास्त खासदार निवडून यावेत, त्यादृष्टीने दोन्ही पक्षाचे नेते प्रयत्न करत आहेत.

राष्ट्रवादीच्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची समजली जात आहे. खुद्द अजित पवारांनी व त्यांच्या कुंटुंबियांनी हा मतदारसंघ पिंजून काढण्याचे ठरविले असून त्यादृष्टीने सर्वजण प्रयत्न करत आहेत. एवढेच नव्हे तर शहरातील भाजपच्या प्रत्येक नगरसेवकाला व्यक्तीगत दूरध्वनीवरून संवाद साधून मदत करण्याची विनंती करण्यात येत आहे. आपल्या पक्षाचा उमेदवार नाही. त्यामुळे आपण पार्थला मदत करा, असे आवाहन ते करत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यातही अजितदादांना यश आले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विचार व्हावा, त्याचबरोबर लोकसभा प्रचारामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा, अशी भावना शहराध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर काँग्रेसच्या पर्यावरण विभागाच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील पार्थचे काम करण्याचा निर्णय घेऊन अजितदादांनी काँग्रेसमध्ये असलेल्या दोन गटांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली. नार्वेकर यांचे नाव कोणालाही माहित नव्हते. त्यावेळेस मोदींची लाट असतानादेखील नार्वेकर यांना 1 लाख 82 हजार मते मिळाली. यावरून ही मते कायम आहेत. शिवाय यावेळेस शेकाप राष्ट्रवादीबरोबर असल्यामुळे त्यांची सुमारे सव्वादोन लाख मते राष्ट्रवादीला मिळणार आहेत. त्याचबरोबर मनसेचीही मते राष्ट्रवादीला मिळणार आहेत. पिंपरी-चिंचवडमधील काँग्रेसची मते गेल्यावेळेस बारणे यांना मिळाली होती. यावेळेस मात्र, ती राष्ट्रवादीकडे जातील. हे सर्व गणित पाहून अजितदादांनी अजून मोठ्या प्रमाणात मते मिळण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

बारणे यांच्या बाबतीत शिवसैनिकदेखील नाराज आहेत. माजी खासदार गजानन बाबर यांना दोन वेळा आमदार, एक वेळा खासदार अशी संधी मिळाली. मात्र, त्यांनी पक्षसंघटना वाढविली नाही. तिच रेघ बारणे यांनी ओढल्यामुळे त्यांच्या कारकीर्दीत महापालिका निवडणुकीत 14 नगरसेवकांवरून 9 संख्याबळ झाले. यावरून शहरात शिवसेनेचे संघटन कशाप्रकारे आहे, हे दिसून येते. याचे कारण संघटनेमध्ये त्यांनी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना पदे वाटली. त्यामुळे त्यांच्यावर निष्ठावंत शिवसैनिक नाराज आहेत. महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे हेदेखील बारणे यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे ते बारणे यांचे कितपत काम करतील, याची शंका आहे. मावळमधील शिवसैनिक नाराज आहेत. पक्षसंघटना मजबूत न केल्यामुळे, त्याचबरोबर कार्यकर्त्यांना ताकद न दिल्यामुळे बारणे यांची आज मोठी अडचण होऊन बसली आहे. त्यामुळे बारणे या सर्व बाबींना कसे तोंड देणार आणि त्यांची नाराजी कशी दूर करणार हा खरा प्रश्न आहे.

अजून उमेदवारी अर्ज दाखल व्हावयाचे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचारयंत्रणा राबणार आहे, आरोप-प्रत्यारोप रंगणार आहेत. कारण, दोन ते तीन महिन्यांपूर्वी बारणे आणि अजितदादा यांचे चांगले संबंध होते. जगताप आणि बारणे यांचे राजकीय हाडवैर आणि महापालिकेतील जगतापांमुळे गेलेली सत्ता याबाबींमुळे बारणे आणि अजितदादा यांची जवळीक चांगली होती. मात्र, आता या जवळीकीत एकमेकांवर आरोप करून खऱ्या अर्थाने राजकीय वातावरण तापणार आहे. राजकारणात कोण कधी मित्र, कोण कधी वैरी होईल, असे म्हटले जाते. त्याचा अनुभव आता आपण मावळ लोकसभा मतदारसंघात घेत आहोत. स्थानिक आणि बाहेरचा वाद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविकता लोकसभा मतदारसंघात आपण देश स्वतंत्र झाल्यापासून पाहिल्यास इतर राज्यातले उमेदवार दुसऱ्या राज्यात उभे राहिलेले पाहिले आहेत. महाराष्ट्रत पी. व्ही. नरसिंहराव, जगन्नाथ जोशी, गुलाब नबी आझाद अशी अनेक उदाहरणे आपणास देता येतील. त्यामुळे स्थानिक व बाहेरचा वाद हा निरर्थक आहे. एकंदरीतच मावळ लोकसभा निवडणूक ही पवारांच्या प्रतिष्ठेची निवडणूक ठरणार आहे.”
 

Continue reading

दिल्ली विधानसभा परिसरात मुखवटाधारी व्यक्तीकडून सुरक्षेची ऐसीतैशी

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधानसभा संकुलात सोमवारी दुपारी सुरक्षेचा मोठा भंग झाल्याची खळबळजनक घटना घडली. एका मुखवटाधारी व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या 'टाटा सफारी' कारने विधानसभेचे लोखंडी गेट तोडून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे, या व्यक्तीने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर पुष्पगुच्छ ठेवला...

माझा एकच बाप – बाळासाहेब ठाकरे!

माझा एकच बाप - बाळासाहेब ठाकरे! आम्ही "मार्मिक"मुळे घडलो. आमची राजकीय जडणघडण "मार्मिक"मुळे आकाराला आली. जुना स्टँड, जळगाव जाऊन आम्ही मार्मिक घ्यायचो, तेव्हा सामनासुद्धा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी यायचा. मार्मिक आम्ही 100% वाचून काढायचो. अशी माध्यमे हवीत, समाज घडवणारी अन् माणसे...

महाराष्ट्र भाजपाने फुंकला 2029च्या निवडणुकीचा शंख!

देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या विचारधारेविषयी विश्वासाचे, सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाचा योग्य वापर करून घेण्यासाठी कालबद्ध रीतीने कार्यक्रम आखून 2029चा संपूर्ण यशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करावे, आणि देशभक्ती, राष्ट्रीयत्व आणि...
Skip to content