Homeब्लॅक अँड व्हाईटझेब्बुन्निसा: औरंगजेबाच्या कन्येची...

झेब्बुन्निसा: औरंगजेबाच्या कन्येची पडद्यामागील कहाणी

झेब्बुन्निसा! औरंगजेबची मोठी आणि सर्वात लाडकी मुलगी! औरंगजेब जो अतिशय निष्ठुर, पाताळयंत्री, उलट्या काळजाचा, धर्मांध! तितकाच हिंसक आणि कोणावरही विश्वास न ठेवणारा पातशहा! आपल्या भावांचा पराभव करून पित्याला कैद करून तो मुघल बादशहा झाला. औरंगजेबची कथा अनेकांनी लिहिली आहे. पण ती कथा राजकीय आणि सामाजिक स्वरूपातील आहे. पण हे पुस्तक मुघल बादशहाचे खासगी आयुष्य उलगडून दाखवते. झेब्बुन्निसा ही बादशाह औरंगजेबची लाडकी लेक असली तरीही हा उलट्या काळजाचा बाप तिच्या प्रियकराला तडपवून तडपवून कुत्र्याची मौत देतो. त्याला अनेक दिवस अंधारकोठडीत ठेवून नशेची औषधी पाजून वेडा करून ठार करतो. झेब्बुन्निसा याचा बदला घ्यायचे ठरवते. लाडकी लेक बापाच्या विरोधात जाते. पण कशी, ते वाचण्यासारखे आहे.

धूर्त औरंगजेब मुलीच्या प्रियकराला मारल्यानंतर त्याच मुलीच्या लग्नातून हुंडा म्हणून कंदहार घेऊ इच्छितो. त्यासाठी मुलीला झेब्बुन्निसाला तयार करतो. पण ती त्याचा कट उधळून लावते. लग्नाला होकार देऊन लग्न मोडते. यासाठी ती जी योजना बनवते, ती योजना इतकी कल्पक असते की कोणालाही तिच्यावर संशय येत नाही. याकामी ती मुल्ला आणि एका तरुण मुलाला कामाला लावते. ते काय करतात हे वाचून तिच्या बुद्धीला सलाम करावासा वाटतो. यासाठी तिची गुप्त यंत्रणा कशी असेल याचाही अंदाज येतो. झेब्बुन्निसाची कट्टर प्रतिस्पर्धी मलिका (तिची आत्या) रोशनआरा असते. यांच्यामध्ये, बादशहाच्या साम्राज्यावर आतून ताबा ठेवण्यासाठी स्पर्धा असते. यासाठी त्या दोघी शह-काटशह देत असतात. त्यासाठी वाट्टेल त्या थराला जाताना दिसतात.

दुर्दैवी बादशाह शहाजहां (१६८५) आग्रा येथील कैदेत असताना त्याच्यासोबत आपली लाडकी बहीण जहाँआरा हिलाही कैद केले जाते. कारण तिने दारा शुकोहला मदत केलेली असते. ती त्या काळात लोकप्रिय मलिका असते. वाचकाला या कादंबरीतून मुघलांचा जनानखाना कसा असतो ते कळते. औरंगजेब यात हा इतर बादशहामध्ये अपवाद आहे. त्याला जनानखाना आहे. पण त्यावर कोणतीही बेगम हुकूम चालवू शकत नाही. मुलगा झाला नाही म्हणून आपल्या बेगमला पाय तुटेपर्यंत मारणारा औरंगजेब जनानखान्यात जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेथे सगळ्यांना ताण आलेला असतो. जनानखाना खासगी राखण्यासाठी अतिशय कठोर बंधने औरंगजेबाने घातली होती. कितीही कठोर बंधने घातली तरीही पुरुषाच्या संगासाठी हपापल्या त्याच्या बहिणी आणि मुली काही ना काही मार्ग काढतात आणि पुरुष सहवास मिळवतात. त्याचाही फायदा झेब्बुन्निसा करून घेते. आपल्या प्रतिस्पर्धी रोशनआराला नमवण्यासाठी तिची गुपिते शोधते.

वाचकाला खिळवून ठेवणारे हे पुस्तक आहे. यात अशी बीभत्स आणि हिंसक वर्णने असली तरी ती त्या काळची माहिती देणारी आहेत. यात मुघल घराण्याची, अमीर उमराव, त्यांची श्रीमंती आणि शौक कळतो. त्यांची नैतिक-अनैतिक संबंधातून तयार झालेली जाळी समजते. एका बाजूला कट्टर इस्लाम पाळणारा औरंगजेब तर दुसऱ्या बाजूला कोणताही विधिनिषेध न बाळगणारा त्याचा गोतावळा, त्याचे सरदार! त्या काळात अतिशय दुर्दैवी आणि दारुण अवस्था असलेला हिंदू समाज कसा जिवंत होता हेही कळते. त्यांच्या केविलवाण्या जीवनाकडे पाहताना झेब्बुन्निसा किती हळवी होते याचेही वर्णन वाचताना कंठ दाटून येतो. पाडली जाणारी मंदिरे, गुरूद्वारे वाचकाला आहत करतात. संपत्तीची लूट तर मानवी इतिहासाचा स्थायीभाव आहे. पण मुघल गुरे-ढोरे, बाया आणि तरुण मुलंही लुटत. खोजा करून तरुणांची विक्री हा मुघलांचा मोठा व्यवसाय होता. गुलामांचा व्यवसाय हा ख्रिस्ती लोकांची जगाला दिलेली अमानवी देन असेल तर पुरुषाला खोजा करून महिलांसाठी कामाला लावणे हे मुघलांचे पाप या पुस्तकातून वाचायला मिळते.

औरंगजेबचे दुर्दैव असे की, त्याने ठरवलेल्या नियमांना घरातूनच सुरुंग लावला जातो. पक्का मुसलमान औरंगजेब दारूबंदी लागू करतो. गायन, संगीतावर बंदी घालतो. काव्यावर बंदी घालतो. अनेक कला कायद्याने बंद करून टाकतो. पण त्याच्याच मुली दारु पिऊन काव्याच्या मैफिली गाजवत असतात. त्याचे नेतृत्त्व त्याची सर्वात लाडकी मुलगी झेब्बुन्निसा करते. ती स्वतः कवी आहे. अनेक शायर मंडळींना आपल्या गटात सामवून घेते. बादशहाच्या विरोधात हा गट सक्रिय असतो. पुढे झेब्बुन्निसा मलिका होते. ती कशी होते? त्यासाठी तिला काय काय करावे लागते याची अतिशय रंजक आणि खिळवून ठेवणारी कथा आपण स्वतः वाचवी!

हे पुस्तक वाचक हातातून सोडत नाही. वाचत जातो. या पुस्तकाचा अनुवादही उत्तम आहे. औरंगजेबाची लाडकी मुलगी झेबुन्निसाची ही कहाणी. ही कादंबरी काल्पनिक असली तरी ती ऐतिहासिक सत्यांवर आधारलेली आहे. झेबुन्निसा ही एक प्रतिभाशाली कवयित्री होती. ‘मखबी’ या नावाने तिने काव्यरचना केल्या. मखबी या शब्दाचा अर्थ लपलेली असा होतो. तिच्या कवितांचा रुचिर शर्मा यांनी कादंबरी लिहिताना परिणामकारक वापर केला आहे. रुचिर शर्मा यांनी मुघल इतिहासाच्या गाभ्यात शिरून झेबुन्निसाची कहाणी शोधून काढली आहे. त्या काळात युरोपियन पर्यटकांनी लिहिलेल्या माहितीवरून झेबुन्निसाच्या आयुष्यावर प्रकाश पडला. खुफिया शायर महफिल (गुप्त कवी परिषदे)ची स्थापना करणे आणि ती चालवणे तसेच अकबरच्या बंडाला तिची साथ असणे या दोन सूत्रांनी झेबुन्निसाची गोष्ट रोमांचकारक बनली आहे. मुघल आणि मराठ्यांच्या इतिहासालाही कादंबरीने लहानसहान घटनांतून जिवंतपणे उभे केले आहे.

झेब्बुन्निसा: एक बंडखोर शहजादी

औरंगजेब कन्येची पडद्यामागील कहाणी

लेखक: रूचिर गुप्ता

मराठी अनुवाद: सीमा भानू

प्रकाशक: विश्वकर्मा पब्लिकेशन

पृष्ठे: २७०, मूल्य: ४२५ ₹

सवलत मूल्य: ३८० ₹. / टपालखर्च- ५० ₹.

एकूण: ४३० ₹

झेब्बुन्निसा

संपर्कः ग्रंथ संवाद वितरण (8383888148)

Continue reading

 प्रत्येक नातवाच्या संग्रही असावी, अशी ‘एका आजीची गोष्ट’!

प्रत्येक नातवाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक म्हणजे 'एका आजीची गोष्ट'. या पुस्तकाची प्रस्तावना ज्येष्ठ लेखक मधु मंगेश कर्णिक यांनी लिहिली आहे. ते लिहितात- हे पुस्तक कोकणातील रम्य आठवणींचा अल्बम आहे. कोकणची माती ही तशी सुपीक, पण पिके घ्यायला अवघड....

भेट देण्यासाठी उत्तम वाचनीय पुस्तकः हसत जगावं

ताणतणावांचा 'अभ्यास' पाश्चिमात्यांनी उत्तम केला. आपल्या परीनं 'इन्स्टंट' उत्तरंही शोधण्याचा प्रयत्न केला; पण या ताणतणावांचं व्यवस्थापन मात्र अजूनही त्यांना फारसं जमलेलं नाही. ते जमून गेलंय, भारतीय संस्कृतीलाच. ताणस्थितीत अर्जुनाला सांगितलेली 'गीता' आणि पर्यायानं 'ज्ञानेश्वरी' हे या समस्येवरील आद्यग्रंथ होत....

पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या चरित्रावर आधारित ‘देह झाला चंदनाचा’!

देह झाला चंदनाचा.. 'स्वाध्याय' परिवारचे प्रणेता पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावर आधारित कादंबरी! या एका किस्स्यानेच पांडुरंगशास्त्रींचे व्यक्तिमत्व कसे होते ते समजून येईल. मग त्यांच्या जीवनावर आधारलेले पुस्तक म्हणजे प्रश्नच नाही. 'बहारिन'मध्ये भगवद्गीता! थोड्या दडपणाखालीच पांडुरंगशास्त्री बहारिनच्या शेखकडे निघाले होते. आपली...
Skip to content