मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजपाने जिंकल्या. ठाकरेंच्या शिवसेनेला दूर ठेऊन मुंबईवर कब्जा करण्याचे भाजपाचे स्वप्न यावेळी पूर्ण झाले. पंचाहत्तर हजार कोटींचे बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर आता पुढील पाच वर्षे भाजपाचे वर्चस्व असणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईकर ठाकरेंच्या सेनेला घरी बसवतील, उद्धव ठाकरेंना मुंबईतून गाशा गुंडाळावा लागेल, सर्वाधिक नुकसान राज ठाकरे यांचे होईल, असे भाकीत भाजपाने वर्तवले होते. पण मुंबईकरांनी ठाकरे बंधुंना ७१ जागी निवडून दिले. ठाकरेंच्या हातून पंचवीस वर्षांनी मुंबई महापालिकेची सत्ता निसटली. पण ठाकरे बंधुंनी भाजपाशी निकराने लढत दिली. मुंबईत एकच जाहीर सभा घेऊन महापालिका जिंकता येते का? ठाकरे आणि शिवसेना यांचे मुंबईतील मराठी माणासाचे भावनिक नाते आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अथक परिश्रमातून उभारलेल्या पक्षाचा मुंबईत झालेला पराभव ही पक्षनेतृत्त्वाला इशारा घंटा आहे. ठाकरे बंधू एकत्र आले याचा शिवसैनिकांना व मनसैनिकांना आनंद झाला. पण त्याचे अपेक्षित यश मिळाले नाही. बलाढ्य भाजपाशी लढताना शिवसेना संपली नाही, पण ठाकरे बंधुंचे संघटनकौशल्य, निवडणूक व्यवस्थापन आणि ताकद कमी पडली.
शिवसेना संपली असे पालुपद गेली अनेक वर्षे ऐकायला मिळत आहे. वैयक्तिक कारणासाठी किंवा महत्त्वाकांक्षेपोटी जे शिवसेनेतून बाहेर पडतात, ते तर (गणेश नाईक वगळता) असे नेहमीच बोलत असतात. डॉ. हेमचंद्र गुप्ते यांनी शिवसेना सोडली तेव्हाही त्यांनी शिवसेना संपली, असे म्हटले होते. शिवसेना संपली असे नारायण राणे यांनी सेनेतून बाहेर पडल्यावर कित्येकदा म्हटले आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते प्रमोद नवलकर यांनी याच मुद्यावर एक लेख लिहिला होता, त्याचा उल्लेख मनोहर जोशींनी शिवसेना काल, आज व उद्या या पुस्तकात केला आहे. प्रमोद नवलकर लिहितात- शिवसेना म्हणजे सहजतेने वितळणारा नैनिताल किंवा काश्मीरमधील बर्फ नाही. तो त्याही पलिकडे जाऊन मजबुतीने उभा राहिलेला हिमालयाचा कडा आहे. तो लक्षावधी शिवसैनिकांच्या त्यागातून व परिश्रमातून उभा राहिल्याने कधीच सहज वितळणार नाही. शिवसेना केवळ मराठी माणसांचीच नव्हे तर काळाची गरज आहे…
निकालानंतर शर्मिला ठाकरे यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरे, रश्मी आणि राज यांचा मला अभिमान वाटतो. मी त्यांचे अभिनंदन करते. कारण आमचे शून्य होते, त्यांनी आमचे सगळे नेले होते. उद्धव ठाकरेंकडे ८४ नगरसेवक होते, पैकी त्यांनी (शिंदे) ६५ नेले. आम्ही ६ तर उद्धव यांनी ६५ निवडून आणले. आम्ही चांगली लढत दिली… निकालानंतर उद्धव ठाकरेंनीही शिवसेना संपलेली नाही, असे ठणकवून सांगितले. भाजपाने मुंबईसह सारा महाराष्ट्र जिंकला म्हणून सर्वत्र गुलाल उधळला. देवेंद्र हेच महाराष्ट्राचे बॉस, देवेंद्र हेच धुरंधर म्हणून मीडियातून कौतुकाचा वर्षाव झाला. सर्व परिस्थिती प्रतिकूल असताना ठाकरे बंधुंनी दाखवलेली हिम्मत, दिलेली लढत आणि मिळालेले यश आश्चर्यकारक म्हटले पाहिजे. भाजपाच्या रणनितीतून जून २०२२मध्ये शिवसेनेत मोठी तोडफोड झाली. ऐंशी टक्के संघटना एकनाथ शिंदे बरोबर घेऊन गेले. उबाठा सेनेचे निधीचे स्त्रोत जवळपास बंद झाले. बहुसंख्य, आमदार, खासदार,

नगरसेवक, पदाधिकारी, नेते साथ सोडून गेले. उमेदवार पळवले गेले, अनेकांचे उमेदवारीअर्ज बाद झाले, धाकधपटशा-अमिषे दाखवून उमेदवारांना माघार घेणे भाग पाडले, मो्ठ्या उ्द्योगसमुहांची सत्ताधारी पक्षाला साथ, मोठे बिल्डर्स सत्ताधाऱ्यांबरोबर, सरकारी यंत्रणा सत्ताधारी पक्षांबरोबर, पैशाचा प्रचंड वापर, नोटांनी भरलेल्या बॅगा पकडूनही पुढे काहीच कारवाई नाही, अमराठी व्होट बँकेची सत्ताधारी पक्षांना साथ अशा वातावरणात ठाकरे बंधुंना ७१ जागा कशा मिळाल्या, याचेच मोठे आश्चर्य आहे. ज्या महापालिकांवर पूर्वी अविभाजित शिवसेनेचे महापौर होते, त्या शहरात आता भाजपाचे महापौर दिसणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर भाजपाला मिळालेली ही देणगी आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडे जेमतेम वीस नगरसेवक उरले असताना त्यांना ६५ जागी विजय मिळाला. भाजपाकडे मावळत्या महापालिकेत ८२ नगरसेवक असताना ८९ नगरसेवक निवडून आले. भाजपाचे ११० नगरसेवक निवडून आणण्याचे टार्गेट होते. मग पक्षाची रणनिती कुठे चुकली? ठाकरेंचा पक्ष कमजोर करूनही भाजपाला मुंबईत शंभर नगरसेवक निवडून आणता आले नाहीत.
निकालानंतर ठाकरे बंधू काय करणार आहेत, आता तीन-साडेतीन वर्ष महाराष्ट्रात निवडणूक नाही. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ठाकरे बंधुंना रस नाही. आजवर उबाठा सेना व मनसे दोन्ही पक्षांनी अनेक पराभव पाहिलेले आहेत. पण निकालानंतर पक्षात कधी आत्मचिंतन होत नाही. उबाठा सेनेत उद्धव तर मनसेमध्ये राज, हे सुप्रीम आहेत. नेते, पदाधिकारी किंवा सामान्य सैनिकांना काय वाटते याची ते एकत्र बोलावून चर्चा करतात असे कधी घडलेले नाही. सन १९८५ मध्ये ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपाचे प्रमोद महाजन यांचा पराभव झाला होता. पराभवानंतर प्रमोद महाजन लगेच त्यांच्या घरी निघून गेले नाहीत. तेव्हा भाजपा-शिवसेना युतीचे ते उमेदवार होते. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी चेंबूरला युतीचे नेते, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांना भोजनासाठी बोलावले. त्यांनी आपला पराभव खिलाडू वृत्तीने स्वीकारला. पण पराभव का झाला, त्याची कारणे काय, कुठे कमी पडलो, पराभवाला कोण जबाबदार? याची मोकळेपणाने चर्चा भोजनप्रसंगी झाली. प्रमोदजी म्हणाले, तुम्ही सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते प्रत्यक्ष प्रचारात होतात, तुम्ही सांगा की आपण कुठे कमी पडलो… तुम्ही चुका सांगा म्हणजे पुढील वेळी त्या दुरूस्त करता येतील… ठाकरे बंधुंचा पराभव झाला. निवडून आलेले नगरसेवक मातोश्रीवर किंवा शिवतीर्थावर जाऊन उद्धव किंवा राज यांना भेटतात. पण पराभूत उमेदवार, पदाधिकारी यांच्याशी हेच नेते कधी संवाद साधणार? एकनाथ शिदेंचे निकटवर्तीय खासदार नरेश म्हस्के पराभूत उमेदवारांना त्यांच्या घरी भेटून धीर देण्याचे काम करीत आहेत.
उद्धव व राज हिंदी सक्तीच्या निमित्ताने गेल्यावर्षी पाच जुलैला एकत्र आले. पण आपण महापालिका एकत्र लढणार याची घोषणा त्यांनी सहा महिन्यांनी केली. ठाकरे बंधुंनी नाशिक, ठाणे व मुंबई अशा तीनच सभा घेतल्या. इतरत्र फिरलेही नाहीत. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत दोघे एकत्र जीपमधून फिरले असते तरी त्याचा सकारात्मक परिणाम दिसला असता. तेरा महापालिकांमध्ये उबाठा सेनेला भोपळा फोडता आलेला नाही. राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर अडीच वर्षे राहिलेल्या नेत्याच्या पक्षाची ही अवस्था का झाली? एकनाथ शिंदेंपेक्षा मुंबईत आमचे नगरसेवक जास्त, अशी बढाई मारून आता साध्य काय होणार? एकनाथ शिंदे यांनी उबाठा सेनेशी लढत दिलीच, पण सत्तेत असूनही त्यांना भाजपाशीही लढावे लागत आहे. त्यांची मेहनत, परिश्रम, दौरे, जनसंपर्क अहोरात्र व अखंड चालू आहे. त्यांनी पक्ष व चिन्ह पळवले. पण तीन वर्षांत त्यांना सोडून पळापळ झालेली नाही. मराठी, मराठी करून मते मिळतील. पण सत्ता काबीज करता येत नाही, हा संदेश निकालाने ठाकरे बंधुंना दिला आहे. मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतदानाने एमआयएम पक्षाचे १२५ नगरसेवक राज्यात विजयी झाले. मराठी मतदार भाजपा, काँग्रेस, शिवसेना, उबाठा सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर अशा सर्व पक्षात विभागला गेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईला तेवीस महापौर दिले. त्याला यंदाच्या निवडणुकीने ब्रेक लागला.
(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत.)

