तब्बल २२ वर्षे भारतीय टेबल टेनिसची सेवा केल्यानंतर ४२ वर्षीय शरथ कमलने अखेर आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला नुकताच विराम दिला. आपल्या चमकदार खेळाचा ठसा उमटवणाऱ्या शरथने या खेळात यशाची अनेक नवनवी शिखरे सर केली. त्यामुळे भारताचा तो आतापर्यंतचा सर्वोत्तम टेबल टेनिसपटू ठरला आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. भारतीय टेबल टेनिस संघाचा अनेक वर्षे तो प्रमुख आधारस्तंभ होता. आपल्या झळझळत्या कारकिर्दीत शरथने अनेक शानदार विजयाची नोंद केली. प्रमुख आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धांत त्याने भारताला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले. तब्बल दोन दशकांपेक्षा जास्त काळ त्याने भारतीय युवा टेबल टेनिसपटूंना सर्वोत्तम खेळासाठी प्रेरणा दिली. जागतिक टेबल टेनिसमध्ये चीन, द. कोरिया, जपान या देशांच्या दिग्गज खेळाडूंना नमविण्याचा पराक्रम त्याने अनेकदा करुन दाखविला.

चेन्नईत १२ जुलै १९८२ रोजी जन्मलेल्या शरथने वयाच्या अवघ्या ४थ्या वर्षी पहिल्यांदा टेबल टेनिसची बॅट हातात धरली. मग तब्बल २२ वर्षे त्याने टेबल टेनिस बॅटची साथ सोडली नाही. त्याचे वडिल श्रीनिवास राव, काका मुरलीधर राव हे दोघे चांगले टेबल टेनिसपटू होते. ते तामिळनाडूतर्फे राज्य स्पर्धेत खेळले. नंतर दोघांनी प्रशिक्षक म्हणून या खेळात बन्यापैकी नाव कमावले. त्यामुळे टेबल टेनिस खेळाचे वातावरण कमलच्या घरातच होते. मग तो टेबल टेनिसपटू नसता झाला तरच नवल होते. बकलम शाळेत त्याचे शालेय शिक्षण तर लोयला कॉलेजात कमलने वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली. सुरुवातीच्या काळात त्याला फारसे यश मिळाले नाही. परंतु त्याने खचून न जाता त्याने आपला सराव अधिक वाढवत आणि चुका सुधारत आपल्या यशाचा मार्ग तयार केला. २००३ साली त्याने पहिल्यांदा मानाची वरिष्ठ गटाची राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा जिंकली. मग तेथूनच त्याची विजयी दौड सुरु झाली. त्यानंतर त्याने मागे वळून बघितलेच नाही.
तब्बल १० वेळा त्याने राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. २००६ ते २०१०दरम्यान त्याने सलग ५ वर्षे ही स्पर्धा जिंकली. २००७च्या या स्पर्धेत त्याने सुवर्णाचा चौकार ठोकून आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. त्याने या स्पर्धेत पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, मिश्र दुहेरी आणि सांघिक जेतेपद अशी ४ सुवर्ण पदके पटकावली. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. राष्ट्रीय स्पर्धेतील त्याच्या चमकदार कामगिरीची दखल लगेचच घेण्यात आली. २००४च्या राष्ट्रकुल अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेसाठी पहिल्यांदाच त्याची भारतीय संघात निवड झाली. त्याने आपल्याच पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतातर्फे सर्वाधिक पदके जिंकण्याचा पराक्रम त्याने करून दाखवला. त्याने या स्पर्धेत ७ सुवर्ण, ३ रौप्य, ३ कांस्य पदकांची कमाई केली. त्याचे हे यश त्याच्या अथक मेहनतीचेच फळ होते असे म्हटले तर वावगे ठरु नये. आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत त्याने २ कांस्य पदके मिळवली. आयटीएफ प्रोटूर स्पर्धा दोन वेळा जिंकणारा शरथ पहिला भारतीय टेबल टेनिसपटू ठरला. इजिप्तमध्ये झालेल्या या स्पर्धेत त्याने बाजी मारली. २००४ साली त्याने पहिल्यांदा अथेंस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर आणखी ४ ऑलिम्पिकमध्ये तो भारतातर्फे खेळला. ऑलिम्पिकमध्ये मात्र त्याला पदकाने हुलकावणी दिली. हे अपयश आपल्याला शेवटपर्यंत सलत राहणार असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते.

५ ऑलिम्पिक स्पर्धा खेळणारा तो पहिला टेबल टेनिसपटू ठरला. गतवर्षी पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत तो भारतीय पथकाचा ध्वजधारक होता. असा मान मिळविणारादेखील तो भारताचा पहिला टेबल टेनिसपटू ठरला. महिलांमध्ये त्याच्यासोबत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूदेखील ध्वजवाहक होती. त्याने आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धात पदार्पण केले तेव्हा तो जागतिक क्रमवारीत ४०० क्रमांकाच्या पुढे होता. परंतु आपल्या खेळात कमालीची सुधारणा करत आणि सातत्यपूर्ण खेळ करत त्याने या क्रमवारीत अव्वल ३० खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. जागतिक क्रमवारीत पुरुष गटात असा मान मिळवणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. वाढत्या वयानंतरदेखील शरथची जिंकण्याची भूक कायम राहिली. सतत नव्या गोष्टी तो शिकत राहिला. खेळाच्या स्वरुपात, तंत्रात होणारे बदल त्याने स्वीकारले. आजच्या तरुण खेळाडूंनादेखील लाजवेल, असा त्याचा उत्साह चाळीशीनंतरदेखील त्याच्या खेळात बघायला मिळत होता. शरथची ऊर्जा आणि यश अनेक युवा खेळाडूंना निश्चितच प्रेरणा देणारे आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.

आक्रमक खेळ करणाऱ्या कमलच्या भात्यात या खेळातील सर्वच फटके होते. त्याचा खुबीने वापर करण्यात तो माहिर होता. त्याचे ताकदवान वेगवान फोरहॅन्ड आणि बैंकहॅन्डचे फटके हमखास गुण मिळवून देणारे असायचे. मध्ये काही काळ दुखापतीने तो त्रस्त झाला होता. परंतु त्यावर जिद्दीने मात करत त्याने जोरदार पुनरागमन केले आणि लक्षणीय यशदेखील मिळविले. एवढे यश मिळवूनदेखील त्याचे पाय जमिनीवर होते. कधीच कुठल्या वादात तो अडकला नाही. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाने त्याची या खेळातील शानदार कामगिरी बघून त्याला आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्या खेळाडू आयोगात स्थान दिले. यात स्थान मिळालेला तो पहिला भारतीय ठरला. भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या खेळाडू गटातदेखील त्याचा समावेश आहे. त्याच्या या खेळातील कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारचा अर्जुन, खेलरत्न पुरस्कार त्याला मिळाला. पद्मश्री पुरस्कारानेदेखील शरथला गौरविण्यात आले. विदेशात होणाऱ्या जर्मन, स्वीडन, फ्रेंच लिग स्पर्धेतदेखील शरथने चमकदार कामगिरी करून दाखवली. त्याने या खेळाचा श्रीगणेश चेन्नईत केला होता. तेथेच त्याने डब्ल्यूटीटी कन्टेडर मालिकेतील मार्चमध्ये झालेल्या स्पर्धेत आपल्या कारकिर्दीला निरोप दिला. आता निवृत्तीनंतरदेखील तो या खेळाची सेवा करणार असल्याचा मनोदय त्याने व्यक्त केला आहे. लवकरच तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत कदाचित भारतीय टेबल टेनिसप्रेमींना पाहयला मिळेल. भारतीय टेबल टेनिसच्या इतिहासात अचंता शरथ कमलच्या कामगिरीची नोंद नक्कीच सुवर्णाक्षरांनी करावी लागेल यात शंका नाही.