राजधानी दिल्ली तर भाजपाने जिंकली. परंतु तिथल्या मुख्यमंत्री निवडीचा विषय अजूनही गुलदस्त्यातच राहिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी या निवडणुकीत जायंट किलर ठरलेले प्रवेश वर्मा किंवा दिल्लीभर स्कूटरवरून फिरणारे आमदार जितेंद्र महाजन यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या दिल्लीच्या निवडणुकीत 70 जागांपैकी तब्बल 48 जागा जिंकत भारतीय जनता पार्टीने पूर्ण बहुमत मिळवले. त्याखालोखाल आम आदमी पार्टीने उरलेल्या 22 जागा जिंकत विरोधी पक्षाचे स्थान प्राप्त केले. काँग्रेसला या निवडणुकीत सतत तिसऱ्यांदा भोपळाही फोडत आलेला नाही. असे असले तरीही भाजपाच्या केंद्रीय नेतृत्त्वाने दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाला बसवायचे याचा निर्णय अजूनही घेतला नाही. जाणकारांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या पाच दिवसांपासून फ्रान्स तसेच अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. कालच ते मायदेशी परतले आहेत. त्यामुळे आज किंवा उद्या पक्षाच्या केंद्रीय नेत्यांची बैठक होऊ शकते. या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित केले जाईल. त्यानंतर 17 किंवा 18 तारखेला म्हणजेच सोमवारी किंवा मंगळवारी दिल्लीतल्या भाजपा आमदारांची बैठक बोलावली जाईल. या बैठकीत केंद्रीय नेतृत्त्वाने निश्चित केलेल्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल. त्यानंतर 19 किंवा 20 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांच्या आणि भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एका शानदार समारंभात शपथविधी सोहळा पार पडेल, असे कळते.

दरम्यान, काल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिल्लीत निवडून आलेल्या काही आमदारांशी चर्चा केली. एकेक आमदाराशी स्वतंत्रपणे चर्चा करण्यात आली. भाजपाच्या साधारण दहा आमदारांना त्यांनी या चर्चेसाठी बोलावले होते. यामध्ये भाजपाचे दिल्लीचे माजी प्रदेशाध्यक्ष विजेंद्र गुप्ता, सतीश उपाध्याय, अरविंद सिंग लवली, शिखा राय, अजय महावर, रेखा गुप्ता, अनिल कुमार शर्मा, डॉ. अनिल गोयल यांचा समावेश होता. विजेंद्र गुप्ता रोहिणी मतदारसंघातून सतत तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. सतीश उपाध्याय यांनी आम आदमीचे पार्टीचे नेते सोमनाथ भारती यांचा पराभव केला आहे. अरविंदर सिंग लवली काँग्रेसच्या शीला दीक्षित मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात चार वेळा मंत्री राहिलेले आहेत. शिखा राय, दिवंगत भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जातात. सौरभ भारद्वाज, हे आम आदमी पार्टीचे नेते त्यांच्याकडून पराभूत झाले आहेत. अजय महावर धोंडा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले आहेत. रेखा गुप्ता भाजपाच्या महिला विभागाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. अनिल कुमार शर्मा हेही भाजपाचे दिल्लीचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत.
भाजपा अध्यक्षांनी या आमदारांशी जरी स्वतंत्रपणे चर्चा केली असली तरी या नेत्यांपैकी एकाच्याही गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार नसल्याचे जाणकारांनी सांगितले. या निवडणुकीत आम आदमी पार्टीचे प्रमुख संयोजक, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नई दिल्ली मतदारसंघातून पराभूत करणारे प्रवेश वर्मा ही भाजपाची पहिली पसंत ठरू शकते. प्रवेश वर्मा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहेब सिंग वर्मा यांचे चिरंजीव आहेत. 2013पासून या परिसरातून ते सतत दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. नवी दिल्लीची त्यांना चांगली जाण असून केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या आमदारांना व्यवस्थितपणे तोंड देण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचे बोलले जाते. जितेंद्र महाजन हे आणखी एक आमदार भाजपाचे आहेत जे रोहतास नगर येथून सतत तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते निकटवर्तीय मानले जातात. जर संघाने त्यांच्या नावाचा आग्रह धरला तर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे नावही निश्चित होऊ शकते. भाजपाचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांच्या नावाचीही चर्चा दिल्लीत होत आहे. मात्र या निवडणुकीत ते स्वतः निवडणूक लढले नाहीत. त्यांनी फक्त पक्षाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी मेहनत घेतली. याचे बक्षिस म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपदाची जागा दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. परंतु सूत्रांच्या मते, त्यांना मुख्यमंत्रीपद देऊन पक्षसंघटनेवरील अंकुश कमी करणे भाजपाला तितकेसे मानवणार नाही. त्यामुळे त्यांना इतर कोणत्यातरी मार्गाने समाधानी केले जाईल.