Homeटॉप स्टोरीजपानी बँक सुमितोमो...

जपानी बँक सुमितोमो घेणार भारतातल्या यस बँकेचा ताबा?

जपानमधल्या दुसऱ्या क्रमांकाच्या सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन (SMBC), या बँकेने अलीकडेच भारतातल्या खाजगी क्षेत्रातल्या यस (YES) बँकेत सुमारे ₹ १३ हजार कोटींची गुंतवणूक करून २०% हिस्सा विकत घेतला आहे. पुढील टप्प्यात हीच बँक ₹ ३० हजार कोटींची अतिरिक्त गुंतवणूक करून ५१% हिस्सेदारीसह YES बँकेवर संपूर्ण ताबा मिळवण्याची त्यांची योजना आहे, असा दावा बँकिंग क्षेत्रातील अभ्यासक व नुकतेच काँग्रेसमध्ये दाखल झालेले नेते विश्वास उटगी यांनी काल एका पत्रकार परिषदेत केला. हा व्यवहार भारताच्या बँकिंग सार्वभौमत्वावर गदा असून या संपूर्ण व्यवहाराची न्यायालयीन चौकशी करावी तसेच ही यस बँक परदेशी बँकेच्या हाती जाऊ देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली.

विश्वास उटगी म्हणाले की, सध्या YES बँक आर्थिकदृष्ट्या सुदृढ स्थितीत आहे. या बँकेत ₹ २,८५,००० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत तर कर्जवाटप ₹ २,४८,००० कोटींचे आहे. गुंतवणूक पोर्टफोलिओ ₹ ८६,००० कोटींचा आहे. अशा चांगल्या स्थितीत असलेली YES बँक RBI आणि केंद्र सरकार एका परदेशी बँकेकडे का सोपवत आहे? YES बँक एकेकाळी आर्थिक संकटात होती. पण RBI व केंद्र सरकारने “Too Big To Fail” या संकल्पनेअंतर्गत बँकेला वाचवले आहे. भारतीय स्टेट बँक आणि आठ खासगी बँकांनी लोकांचे पैसे गुंतवून YES बँकेचे पुनरुज्जीवन केले आहे. SBI कडे या बँकेचा सध्या सुमारे २४% हिस्सा आहे आणि २०२०पासून प्रशांत कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली YES बँकेचा कारभार SBI संचलित करत आहे. तर मग आता केंद्र सरकार आणि RBI यस बँकेतील आपला हिस्सा जपानी बँकेला का विकत आहे? हे कुणाच्या हितासाठी आहे?

या व्यवहारावर महत्त्वाचे धोरणात्मक प्रश्न निर्माण झाले आहेत. बँकिंग नियामक संस्था म्हणून रिझर्व्ह बँकेची भूमिका काय आहे? अर्थ मंत्रालय आणि केंद्र सरकार यांची जबाबदारी काय आहे? सेबी, जो शेअर बाजाराचा नियामक आहे, तो गप्प का? एक व्हिसलब्लोअरचा फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट सध्या सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध झाला आहे (२०१४–२०२५ कालावधीसाठीचा YES बँकेचा). हा रिपोर्ट बँकेतील गंभीर आर्थिक गैरव्यवहार, NPA विक्रीतील संशयास्पद व्यवहार तसेच चुकीच्या पद्धतीने नफा दाखवण्यासारख्या गंभीर प्रकारांची माहिती देतो. पण केंद्र सरकार, RBI आणि इतर संबंधित संस्थांनी या रिपोर्टकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

सेबी, रिझर्व्ह बँक व अर्थ मंत्रालय यांचे उत्तरदायित्व निश्चित करावे, यस बँकेचा सुमितोमो बँकेकडून होणारा ताबा त्वरित थांबवावा. जर यस बँकेसारखी नव्या पिढीची खासगी बँक परदेशी बँकेकडे सहज विकली जात असेल तर मग भारतातील कोणतीही बँक सुरक्षित राहणार नाही. हा व्यवहार झाला तर IDBI बँकसह इतर सार्वजनिक बँकांनाही अशाच “स्पॉन्सर केलेल्या” गुंतवणूकदारांकडून ताब्यात घेण्याचा धोका निर्माण होईल. सार्वजनिक बँकिंग व्यवस्था देशाच्या अर्थव्यवस्थेच्या कणा आहेत. देशाला मजबूत सार्वजनिक तसेच खासगी बँकिंग व्यवस्था हवी आहे. त्यामुळे YES बँक जर खरोखरच अपयशी ठरत असेल तर तिचा ताबा स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा इतर सार्वजनिक बँकेकडे दिला जावा. १९६९ साली बँकांचे राष्ट्रीयीकरण केल्यानंतर गेल्या ५६ वर्षांत अनेक खासगी बँका सार्वजनिक बँकांमध्ये विलीन करण्यात आल्या आहेत. RBI आणि केंद्र सरकारने या प्रश्नांना उत्तर द्यायलाच हवे, असेही उटगी म्हणाले.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content