हिंदी चित्रसृष्टीतला गाजलेले अभिनेता, माजी खासदार गोविंदा यांची आज रिपब्लिकन पार्टीचे नेते, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना गोविंदा यांची ही भेट अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे. गोविंदा पुन्हा राजकारणात सक्रिय होणार का, अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे.
गोविंदा म्हणजेच गोविंद आहुजा यांनी आतापर्यंत १२०हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. २००४ साली काँग्रेसकडून त्यांनी उत्तर मुंबईत भारतीय जनता पार्टीचे मात्तबर उमेदवार राम नाईक यांचा पराभव करून लोकसभा सदस्यत्व मिळवले होते. त्यानंतर मात्र गोविंदा राजकारणापासून दूर राहिले. आजच्या भेटीत गोविंदा यांनी उत्स्फूर्तपणे कविता सादर केली. काही काळ रामदास आठवले आणि अभिनेते गोविंदा यांच्यात शेरोशायरीची जुगलबंदीही रंगली.