Tuesday, April 1, 2025
Homeन्यूज अँड व्ह्यूजपालकमंत्रीपदाबाबतही एकनाथ शिंदेंना...

पालकमंत्रीपदाबाबतही एकनाथ शिंदेंना झुलवणार?

राज्यात महायुती सरकारला मोठे बहुमत मिळूनही सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीतील कटकटी वाढतच आहेत. सुरुवातीला मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे अडून बसले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ नेत्याचे नाव जाहीर करण्यास विलंब झाला. एकनाथ शिंदे यांना शेवटपर्यंत झुलवत ठेवत अखेर मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात घालण्यात आली. त्यानंतर खातेवाटपावरून जोरदार घमासान महायुतीत घडले. तेव्हाही एकनाथ शिंदे नगरविकास खात्यासाठी अडून बसले होते. त्यांना गृहखाते मिळणार नाही हे माहीतच होते. परंतु नगरविकास खाते गेले तर आपल्याला फारशी किंमत राहणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी थेट गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संधान साधून नगरविकास खाते मिळवले. त्याचबरोबर गृहनिर्माण खातेही मिळवण्यात त्यांना यश आले.

भाजपचे दुसरे सहकारी अजितदादा पवार मात्र शांतपणे आपल्याला पाहिजे ते मिळवत होते. त्यांनी शिवसेनेकडील उत्पादनशुल्क (एक्साईज) हे महत्त्वाचे खाते खेचून घेतले. एक्साईज खात्याच्या भ्रष्टाचाराबाबत मोठ्या तक्रारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्या होत्या. तत्कालीन एक्साईज खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांना आता पर्यटन खाते देण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांचे शिलेदार नाराज होते. परंतु भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नगरविकास आणि गृहनिर्माण ही दोन खाती देऊन फारसे महत्त्व न देण्याचा निर्णय घेतला. भाजपला आता शिंदेंच्या शिवसेनेची फारशी गरज उरलेली नाही. त्यामुळे दोनएक वर्ष लाड करून नंतर त्यांना त्यांची जागा त्यांना दाखवण्यात येईल.

एकनाथ

खातेवाटप झाल्यानंतर गेले अनेक दिवस पालकमंत्रीपदाबाबत निर्णय घेण्यास विलंब होत होता. अखेर पालकमंत्रीपदाचे वाटप करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला निघून गेले.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगड जिल्हा आपल्या ताब्यात राहावा यासाठी पालकमंत्रीपदाचा हट्ट करून आपल्या मुलीसाठी पालकमंत्रीपद मिळवले. परंतु रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे विरुद्ध सर्व पक्ष अशी परिस्थिती आहे. नुकतेच मंत्री झालेले भरत गोगावले तर पालकमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसले होते. परंतु त्यांचा भ्रमनिरास झाला. आदिती तटकरे यांच्या पालकमंत्रीपदाला सेनेच्या रायगड जिल्ह्यातील सर्व आमदारांनी आक्षेप घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत पालकमंत्रीपद शिवसेनेकडे राहावे हा त्यांचा आग्रह आहे. पालकमंत्रीपद तटकरे कुटुंबियांकडे गेल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रायगडमध्ये जोरदार आंदोलन केले आणि आपला संताप व्यक्त केला.

नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबतही शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात जोरदार संघर्ष आहे. नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आहेत. तरीसुद्धा रायगड आणि नाशिक या दोन पालकमंत्रीपदांना मुख्यमंत्र्यांनी परदेशात बसून स्थगिती दिली. आता रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा प्रतिष्ठेचा झाल्यामुळे तेथे गोगावले आणि तटकरे या दोन्ही मंत्र्यांना डावलून तिसराच मंत्री येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा भाजपच्या पथ्यावर पडला आहे. खरे म्हणजे जळगावचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांना हवे होते. ते शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना देण्यात आले आहे. उद्या नाशिकचे पालकमंत्रीपद दादा भुसे यांना दिले तर जळगावचे पालकमंत्रीपद गुलाबराव पाटील यांना सोडावे लागेल. कृषीमंत्री राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे यांची जरी नाशिकचे पालकमंत्रीपद मिळवण्याची इच्छा असली तरी ते त्यांना मिळण्याची शक्यता फारच धूसर आहे.

एकनाथ

कोल्हापूरचे पालकमंत्रीपद शिवसेनेच्या वाट्याला आले आहे. नवीन मंत्री प्रकाश आबिटकर यांना कोल्हापूरचे पालकमंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांची लाहीलाही झाली आहे. कारण आपण एवढे सीनियर मंत्री असताना आपली वर्णी वाशिम या विदर्भातील जिल्ह्यात लावली आहे अशी खंत त्यांना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवले आहे. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मुंबई शहर अशी दोन पालकमंत्रीपदे स्वतःकडे ठेवली आहेत. अजितदादांनी नेहमीप्रमाणे पुण्याचे पालकमंत्रीपद मिळवून आब राखली आहे. बहुचर्चित बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही अजितदादांनी स्वतःकडे ठेवले आहे. भविष्यात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना क्लीन चीट दिल्यानंतर बीडचे पालकमंत्रीपद त्यांच्याकडे सोपवण्यात येईल. पंकजा मुंडे यांनीही बीडचे पालकमंत्रीपद मिळण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती. मात्र हे राष्ट्रवादीच्या वाट्याला असल्याने त्यांना मिळू शकले नाही. बीडचे सरपंच हत्त्याप्रकरण अजूनही थंडावलेले नाही. त्यामुळेही पंकजा व धनंजय या दोघाही भावंडांना बीडचे पालकमंत्रीपद मिळणे सध्यातरी कठीण आहे. बीडचे पालकमंत्रीपद घेऊन दादा बीडमधली अनागोंदी कशी नियंत्रित करतात हे पाहायचे..

Continue reading

शिंदेंना गद्दार म्हणणारे कुणाल कामरा कोण?

स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा यांच्या राजकीय विडंबनामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या कुणाल कामरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता राजकीय विडंबन केले आहे. शिंदे यांच्या शिवसैनिकांनी कुणाल कामरा यांचा शो जेथे रेकॉर्ड केला होता त्या स्टुडिओची नासधूस...

छावा ते औरंगजेबाची कबर, निवडणुकीपर्यंत कायकाय बघावे लागणार?

सीमेवर सैन्याची जमवाजमव सुरु होत असेल किंवा शहरात जातीय दंगे सुरु झाले की समजावे निवडणुका जवळ आल्या आहेत,असे एका शायरचे म्हणणे आहे. राज्यात नुकताच अर्थसंकल्प सादर झाला. पण या अर्थसंकल्पाविषयी चर्चा होण्याऐवजी छत्रपती संभाजी महाराज नगरजवळ असलेल्या औरंगजेबाच्या कबरीची...

देवाभाऊंच्या काळात पूर्वीप्रमाणेच आताही ‘फिक्सर’!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिक्सर अधिकाऱ्यांना मंत्र्यांचे पीएस किंवा ओएसडी होऊ देणार नाही असा धमकीवजा इशारा दिला आहे. मुळात मुख्यमंत्र्यांच्या लेखी फिक्सरची व्याख्या काय? असा प्रश्न विचारण्याचे धैर्य त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांमध्ये तर नाहीच, मात्र शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी...
Skip to content