अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून पुणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे शहरातल्या अनेक भागात पुराने हाःहाकार केला तेव्हाही ते मुंबईतल्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून संपूर्ण लक्ष ठेवून होते. पुण्याचे पालकमंत्री असल्यामुळे पुणेकरांना भेडसावणाऱ्या प्रत्येक प्रश्नावर त्यांचे लक्ष असते. पुण्यात पूर येण्याआधीच प्रथमच ते पुणेकरांना भेडसावणाऱ्या एका ज्वलंत प्रश्नावर बोलले. पुणे शहरातील वाहतूक कोंडी!! खरंच उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केल पाहिजे. कारण आजकाल कुठलाही नेता हवेत बोलतो आम्ही हे करू, ते करू, त्यांनी सर्व घाण केलीय वगैरे.. किंवा आश्वासानांचं गाजर तरी दाखवतो. तुम्ही पहिल्यापासूनच हटके आहात म्हणून फटकेही मारू शकता आणि जनतेच्या वतीने नोकरशहांना कुणी फटके लगावत असेल तर त्याचे स्वागतच व्हायला हवे.
खरंतर दादा तुमच्यासमोर आणि तुम्ही सर्वेसर्वा असताना पुणे शहर अवाढव्य वाढलं किंवा वाढवलं गेलं. तुम्हाला यातील खाचखळगे खळग्यांसकट माहित आहेत. कारण आपण गेली कित्येक वर्षे पुणे विकास प्राधिकरणाचे कॅप्टन होतात. हरकत नाही काही.. उशिरा का हा होईना, आपले सरकार जमिनीवर आले व जमिनीवर राहणाऱ्या नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रमुख प्रश्नांपैकी एक असलेल्या वाहतूककोंडी या प्रश्नावर तुम्ही काहीतरी बोललात. अधिकाऱ्यांना कामाला लावणारी भाषा बोललात. परंतु उपमुख्यमंत्री महोदय, आपण केवळ पुणे शहर वा पुणे जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री नाहीत. सर्व महाराष्ट्र तुमचा आहे. महिन्यातले सुमारे 20 दिवस मुंबईत राहूनही तसेच मुख्यमंत्री स्वतः ठाणे शहरातून असूनही आपण मुंबई वा ठाणे शहराला भेडसावणाऱ्या वा अजगरासारखी मिठी मारून बसलेल्या मोठ्या वाहतूककोंडीबाबत मात्र काहीच बोलला नाहीत. बहोत ना इन्साफी है जनाब!!
मुंबई आणि ठाणे हे राज्याला सर्वाधिक महसूल उत्पन्न देणारे जिल्हे व शहरे आहेत. ठाण्यातील वाहतूककोंडीने तर तमाम ठाणेकर त्रस्त झालेले आहेत. एकवेळ मुंबईला जाऊन परत येणे सोपे आहे पण ठाण्यातला ठाण्यात कुठे जायचे म्हटले तर पोटात गोळाच येतो. अगदी सकाळी सात वाजल्यापासून मुंबईकडे जाणारे रस्ते वाहनांनी भरून वाहत असतात. घोडबंदरमार्गे दहिसरला जावे तर फाऊंटन परिसरातील जीवघेणी वाहतूककोंडी तर गेली 20 वर्षे झाली संपतच नाही. संपलेली नाही. आता भुयारी मार्गाची योजना जाहीर झाली आहे. अहो, पण तोपर्यंत गाड्यांची संख्या नाही का दसपट वाढणार?
ठाणे शहरात वाहतूककोंडीच्या दृष्टीने किचकट असलेल्या माजिवडा चौक, तीन हात नाका चौक, माजिवड्यानजीक असलेल्या पोखरण रस्ता, कोपरी नाका, कोपरी बसस्थनकाचा परिसर, कोर्ट नाका, त्याच्या शेजारील ती चिंचोळी गल्ली, गायमुख परिसर आदी ठिकाणे म्हणजे वाहतूककोंडीचा कळसच असतो. त्यात पुन्हा सर्वत्र मेट्रोची अर्धवट कामे.. यातून मार्ग काढत सकाळी ऑफिसला जाणे आणि संध्याकाळी घरी परतणे यातच डोक्याचा पार भुगाच होतो.
तीच गोष्ट मुंबईची. मुक्त मार्गांवरून तुम्ही भले मुंबईच्या पी डिमेलो मार्गापर्यंत अवघ्या 15 मिनिटांत जालही. पण मग फोर्टला जायला किमान पाऊण तास किंवा कधीकधी त्याहूनही अधिक काळ का लागतो, याचा विचार तुमच्या सनदी अधिकाऱ्यांनी कधी केलाय का? हे तुम्ही त्यांना खडसावून विचारले आहे का? हे तर काहीच नाही. बांद्रा-कुर्ला संकुलात होणारी वाहतूककोंडी तर तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. प्रशस्त मोठे रस्ते, आखून दिलेल्या मार्गिका वगैरे सर्व तामझाम असतानाही वांद्र्यापर्यंत जाताना दम निघतो. तेथून निघाले की पश्चिम द्रूतगती मार्ग द्रूतगती केवळ नावाला.. खरंतर कुठलीच गती नसते. यापेक्षा गंभीर स्थिती स्वामी विवेकानंद मार्गाची आहे. सांताक्रूज, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कंदिवली, बोरिवली व थेट दहिसरपर्यंत दोन्ही बाजूंनी गाडयांचे भलेमोठे थवे लागतात. चेंबूर, घाटकोर, भांडुप, कांजूरमार्ग, तेथून पवईमार्गे सहारला जाताना काय त्रास भोगावा लागतो तो त्या प्रवाशांनाच माहित.
देशातील व राज्यातील सर्वच छोट्यामोठ्या शहरात वाहतूककोंडीची समस्या आहे. वाहतूककोंडीचे प्रमुख कारण गाड्यांची संख्या हे आहे. हे काही राज्याच्या हातात नाही. केंद्रानेच जर याबाबत काही धोरण ठरवले पाहिजे. दुसरे प्रमुख कारण म्हणजे बाईक्स आणि स्कूटर यांची संख्या, रिक्षाही भरमसाठ वाढलेल्या आहेत. संख्यापेक्षाही गाडी चालवण्याचे योग्य शिक्षण नसल्याने स्टियरिंग हाती आले की आपली गाडी पुढे कशी जाईल हेच प्रत्येकजण पाहतो. शिवाय वाहतूक पोलिसांचा जराही धाक वाहनचालकांवर नसल्याने ते काही प्रमाणात (ड्राइव्हर मंडळी) मस्तवाल झालेले दिसतात. महत्वाचे म्हणजे या वाहतूककोंडीमुळे वाहतूक पोलीस खात्याची पुनःर्चरना करण्याची वेळ आली आहे असे वाटते. वाहतूककोंडीच्या वेळी फौजदार दर्जा सोडून इतर वरिष्ठ अधिकारी कधीच रस्त्यावर दिसत नाहीत. आपल्या वातानुकुलीत केबिनमध्ये बसून कोंडीवर विचार व्यक्त करणे सोपे आहे. परंतु रस्त्यावर उभे राहून कोंडी नियंत्रित करताना खरोखरीच घाम फुटतो. म्हणूनच हे पोलिसांपासून वेगळे काढून वाहतूक पोलीस आयुक्तालय स्वतंत्र करून त्याचा अभ्यासक्रम काहीसा वेगळा करून अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे झालेले आहे. वाहतूक महासंचालक हे पद निर्माण करून त्यांच्या देखरेखाली हे नवीन आयुक्तालय निर्माण केले जावे असे वाटते.
पोलिसांनी या नवीन व्यवस्थेस सहकार्य करणे अपेक्षित आहेच. शिवाय या नवीन आयुक्तालयात राजकीय नेत्यांनी मुळीच हस्तक्षेप करू नये. नियमानुसारच वाहतूक केली जावी यावर सर्वांचा कटाक्ष हवा. शिवाय वाहतूककोंडीवर उपाय म्हणून रस्ते वाढवा किंवा रुंद करा इतकाच कुणी सल्ला देऊ नये. कारण “Adding highway lane to deal with traffic congestion is like loosing your belt to your obesity” हेही लक्षात ठेवावे. सिग्नललाही थांबताना एका रेषेत थांबावे, प्रथम जाण्यासाठी पुढे कोंडाळे करून सर्वांनीच उभे राहू नये, असे जरी चालकांनी केले तरी थोडीतरी कोंडी कमी होईल. अजितदादांनी ठाणे शहरात एकदा मुक्कामालाच यावे. सकाळपासूनच तिथली वाहतूककोंडीची मनोहारी दृश्ये अनुभवावीत. मग ठरवावे की आपण फक्त पुण्यावरच लक्ष केंद्रीत करणार की मुंबई-ठाण्यावरही..
छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर