Homeमाय व्हॉईसतीन हात नाक्यावर...

तीन हात नाक्यावर 72 मजल्यांचे ‘थडगे’ हवेच कशाला?

“ओम नमो जी नोकरशहा

साम्राज्य तुमचे प्रचंड महा, 

बुडाखाली फायली दहा, 

सामर्थ्य बैठकीचे, 

शासनशास्त्र तुम्हाची कळते,

तुमचेमुळेच समृद्धी कळते, 

विद्या-विज्ञान खालमुंडी वळते,

तुमच्याचि आश्रया!”

सन 1980च्या सुमारास कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी आपल्या विलक्षण शैलीत नोकरशहांचे जे अस्खलित वर्णन केले आहे ते आजही लागू होत नाही असे कोण म्हणेल? नोकरशहांची (यात लबाड व ढोंगी राजकीय नेतेही आहेत) आठवण होण्याचे कारण म्हणजे राज्यातील प्रमुख इंग्रजी वर्तमानपत्र समजले जाणाऱ्या एका वर्तमानपत्राने आपल्या पहिल्या पानावर ठाणे येथील तीन हात नाका परिसरसतील गगनचुंबी अशा प्रस्तावित इमारतीची भली मोठी जाहिरात छापली आहे. हीच जाहिरात दुसऱ्या दिवशी या इंग्रजी वर्तमानपत्राच्या मराठी भावंडांच्या अंकातही प्रसिद्ध झालेली आहे. आता व्यवस्थापन आणि समाजाशी बांधिलकी असलेले संपादक काय भूमिका घेतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

संपादक मात्र जाहिरात खात्याशी आमचा काही संबंध नसतो, असे गुळमुळीत समर्थन करतीलच. इंग्रजी वर्तमानपत्रांचे एक बरे असते ते म्हणजे ही मंडळी कुठल्याही नवीन गोष्टींचे समर्थन करायला एका पायावर तयार असतात. मात्र एखादा प्रकाल्प पूर्ण झाला की हीच मंडळी त्या प्रकल्पात दोष शोधायला सुरुवात करतात. त्यातील पर्यावर्णीय दोष दुर्बिणीतून शोधतात. समाजात कशी प्रचंड तफावत आहे, याचाही त्यांना एकदम साक्षात्कार होतो. वाहतूक व्यवस्थेवरील ताणही त्यांना जाणवू लागतो. असो. ही यादी कितीही वाढवली जाऊ शकते.

जे ठाणेकर आहेत आणि जे कामानिमित्त ठाण्यात ये-जा करत असतात त्यांना तीन हात नाका म्हणजे काय चक्रव्यूह आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. जरी उड्डाणपूल झाला असला तरीही उड्डाणपुलाखाली किती आणि किती काळ वाहतूककोंडी असते याचा अनुभव घेऊन जनतेच्या नाकीनऊ आलेले आहेत. खरे तर दररोजच नाकीनऊ येत असतात. नितीन कंपनी नाक्यावरही अशीच परिस्थिती असते. राजकीय नेते, मंत्रीगण, सनदी अधिकारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांना मात्र ठाण्यातील वाहतूक कोंडीचा कधीच त्रास होत नसतो. कारण त्यांचा दिनक्रम वाहतूक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आधीच समजलेला असतो. त्यामुळे शिटी वाजवणारे वाहतूक हवालदार त्या परिसरात उगाचच पी.टी. करत असतात. तिरकी टोपीधारक अधिकारीही कधी नव्हे इतकी धावपळ करताना दिसत असतात.

हे मी संगोवांगीचे सांगत नाही. हे सर्व प्रकार मी डोळ्याने पाहिलेले आहेत. आपल्यापैकीही अनेकांनी पाहिलेले असतील. थोडक्यात, तीन हात नाका परिसर हा वाहतूककोंडीचा स्फोटक बाँब बनलेला असताना तेथे 72 मजल्यांची गगनचुंबी इमारत हवीच कशाला? या 72 मजल्यांमधून दररोज सुमारे 500 मोटारगाड्या ये-जा करतील. म्हणजे आता सिग्नल पार करायला जी पाच-सात मिनिटे लागतात ती चक्क दहा मिनिटे लागण्याची वा जास्तच लागण्याची भीती आहे.

मला यावेळी अनेक वर्षांपूर्वीची एक गोष्ट आठवते. गिरगावातील मॅजेस्टिक सिनेमा बंद झाल्यावर पुनर्विकास झालेल्या इमारतीत चित्रपटगृहाची तजवीज होती. परंतु यामुळे गिरगावात वाहतूककोंडी होऊ शकते अशी शंका निर्माण करून वाहतूक पोलिसांनी चित्रपटगृहास कडाडून विरोध केला होता. तत्कालीन मुंबई महापालिकेचे अधिकारी तसे राज्य सरकारनेही हा विरोध मान्य करून चित्रपटगृहास मंजुरी नाकारली होती. मग तीन हात नाक्याच्या या प्रकल्पाच्या वेळी ठाणे वाहतूक शाखेचे मत विचारले का गेले नाही? की वाहतूक पोलिसांचे मत केवळ मराठी चित्रपटगृहाबद्दलच घेतले जाते. याचा खुलासा सरकारने करणे गरजेचे आहे.

ठाणे महापालिकेचे आयुक्त हल्ली बऱ्याच भागांना भेटी देत आहेत. एकदा त्यांनी तीन हात नाक्याला जाऊन जनतेची काय हालत असते, हे याची डोळ्यांनी पाहवे. “the skyscrapers continues to serve an global barometer of urbanised and the accumulation of wealth power” हे जर खरं असेल तर धनदांडग्यांना आपला प्रभाव दाखवण्यासाठी इतरत्र जागा देण्यात यावी. आधीच ठाणे येथील सर्वच सुविधांवर नको इतका ताण आहे. एका दिवसाची पाणीकपात जाहीर करून त्याचे परिणाम पुढचे आठ दिवस पाणी कमी सोडून जनतेस जेरीस आणणाऱ्या महापालिकेने हा प्रकल्प मंजूरच कसा केला, हे जनतेला सांगायला हवे.

गेल्या काही वर्षांपासून ठाणे शहराचा अस्ताव्यस्त विकास होत आहे. त्याला काही नियम नाहीत. शहर नियोजन नावाचा काही विषय असतो आणि त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे असते हे महापालिका अधिकाऱ्यांच्या जणू गावीच नाही. हा अस्ताव्यस्त विकास पाहून ढसाळांच्या या ओळी आठवतात…

“आता हरवण्यासारखं काही उरलं नाही

आता काहीच मिळण्यासारखं राहिलं नाही…”

अशी जरी परिस्थिती असली तरी असले पांढरे हत्ती पोसून पालिकेला वा सरकारला काय मिळणार? महसूल मिळेलही. पण त्यासाठी समाजजीवनाचा बळी देणार? इतके आपण निर्ढावलेले आहोत का? महापालिका आयुक्तांनी वाढलेल्या वा वाढवलेल्या ठाण्यात नागरी सेवासुविधा पुरवण्यात आपल्याला कितपत यश आले आहे वा येऊ शकते याचा आढावा घेऊनच नवीन प्रकल्पना मंजुरी देण्याबाबत विचार करावा.

“तुम्ही लाल फितीने बांधता केस

फुटे भल्या भल्यांच्या तोंडाला फेस

कोणी तुमची सत्ता वेस

वोलांडू सकेना 

तुमचेमुळे राज्यशकट धावे

तुमचेमुळे बोरू प्रतिष्ठा पावे

तुमची कृपा होता फावे

कोणत्याही मूर्खाचे..”

असे होऊ न देणे आपल्याच हाती आहे…

Continue reading

लांब जटा.. टिळा-टोपी-माळा, अशा प्रतिमेला छेद देणारा भोंदू!

कॅप्टन नसलेल्या आणि इयत्ता दहावी नापास असलेल्या अशोक खरात नामक भोंदूबाबाच्या विविध कथांनी राज्यातील वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने सध्या भरून वाहत आहेत! तसे पाहिले तर आपल्या राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला बुवाबाजींनी ग्रासलेले आहे. कुठे आसाराम आहेत तर कुठे बाबा...

सत्यमेव जयते!

अलीकडे आपल्या सार्वजनिक व खासगी बँकामधील गैरप्रकारांची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. भविष्यात आणखीही येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे अशा सर्व प्रकरणाची एक खासियत आहे की, बँकेचे संबंधित अधिकारी वा संबंधित व्यवसायिक एकदा का न्यायालयात गेले की न्यायांचे 'दळण' सुरु...

वर्णमुद्राचे ‘मोहोळ’- कौशल्य सारे रचनेत आहे!

ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण...
Skip to content