एप्रिल महिन्याच्या मध्यास इथेच आम्ही ‘काही सेकंदात’ दुसरी लोकल गाडी धावणार, या रेल्वेमंत्र्यांच्या घोषणेवर टीका केली हॊती. तीच गत सध्या मुंब्रा रेल्वेस्थानकादरम्यान घडलेल्या दुर्दैवी अपघातासंदर्भात सरकार, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते पुन्हा करत असल्याचे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे. एका वळणावर समोरासमोरून येणाऱ्या (परंतु वेगळे मार्ग) रेल्वेगाड्यांमधील लोम्बकळणारे प्रवासी एकमेकांना घासून रेल्वेमार्गांवर पडून गंभीर अपघात झाला. या अपघातात चौघे मृत्यू पावले तर इतर नऊजण जखमी झाले आहेत. कल्याणकडे निघालेली लोकल खच्चून भरल्याने अनेक प्रवासी दरवाजातच लोंबकळत प्रवास करत होते. त्यातच त्यांच्या बॅकपॅकमुळे (सॅक) विरुद्ध दिशेने येणाऱ्या लोकलला हे प्रवासी वेगात घासले गेल्याने साहजिकच या सर्वांचा तोल गेला आणि हा अपघात घडला.
नेहमीप्रमाणे मुंब्रा अपघातानंतर रेल्वेयंत्रणा व सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. तावातावाने आपलाच मुद्दा पटवण्याच्या नादात चर्चेच्या सीमारेषाही धूसर झाल्याचे दिसत होते. आता हे हे काही मुंब्र्याजवळचे वळण आहे ते काही कालपरवा निर्माण झालेले नाही. गेली अनेकवर्षे ते वळण तेथे आहे. जवळजवळ 75 वर्षांचा हा लोहमार्ग काही विचार करूनच बनवला गेला असेल ना? सध्याच्या तुलनेत तेव्हा अभियांत्रिकी क्षेत्रात काही हेराफेरी नव्हती. वा झाडाखाली अभियांत्रिकी शिक्षण दिले जात नव्हते, याचे भान तरी टीका करणाऱ्यांनी ठेवायला नको का? माध्यमातील सूत्रसंचालकांनी थोडेतरी भान ठेवून आपला ‘वकिली’ युक्तिवाद करायला नको का? गेल्या महिन्यातील हुंडाबळी प्रकरणापासून हे भान काहीसे सुटले आहे असे म्हणणे भाग पडत आहे. त्यानंतर हुंडा प्रथेविरुद्धही जी चर्चा अनेक माध्यमांनी केली तीही निरर्थक वाटते. कारण पुणे शहराच्या आसपास व जवळच्या ग्रामीण भागात ‘शाही’ लग्नसमारंभांसाठी जे शेकडो हॉलवजा गढ्या उभारल्या आहेत त्या कशासाठी? हे विचारण्याचे धाडस मात्र कुणी केले नाही!

अपघाताचे मूळ कारण शोधणार कधी?
आता मुंब्रा अपघातावर बोलू.. मुंब्र्याच्या गंभीर अपघाताचे मूळ कारण कोणी शोधतच नाही.लोकलगाड्यांतील प्रचंड गर्दीचे प्रमुख कारण जरी लोंढे असले तरी गेल्या दोन-तीन वर्षांपासून मध्य रेल्वेवर वेळापत्रकानुसार लोकलगाड्या अजिबात धावत नाहीत, हे खरं कारण आहे. कुठलाही रेल्वे अधिकारी हे सांगणार नाही व मान्यही करणार नाही. गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वेच्या लोकलगाड्या सुमारे 20 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहेत. गाडीला चार-पाच मिनिटांचा विलंब समजू शकतो. परंतु 20 मिनिटांचा विलंब म्हणजे फलाटावर चार गाड्यांचे हजारो प्रवासी गाडीची वाट पाहत उभे असतात व मग येणारी गाडी ती कुठलीही असो त्यात ते हजारो प्रवासी एकाचवेळी घुसतात. काही नशीबवान असतात त्यांना बसायला जागा मिळते व अन्य एका पोत्यात कांदेबटाटे भरले जातात तसे स्वतःच स्वतःला ‘कोंबून’ घेतात. त्यात त्यांच्या पिशव्या, बॅकपॅक, सॅक, काहींच्या बॅगा वगैरे सर्व असते.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वीचे व्हिटी) ते कल्याणपर्यंतचा लोहमार्ग सहापदरी जरूर झाला आहे. परंतु कल्याण ते कर्जत अजूनही चौपदरी मार्गच आहे तर कल्याण ते कसारा अवघा दोनपदरीच लोहमार्ग आहे. उत्तरेकडून येणाऱ्या सर्व प्रमुख रेल्वेगाड्या या नोकरदार मंडळीच्या कामाच्या वेळेतच महानगरात प्रवेश करत असल्याने साहजिकच लोकलगाड्या थांबवून या सर्व गाडयांना प्राधान्याने सोडण्यात येते व लोकलगाड्यांची रखडपट्टी होते. उत्तरेतून येणाऱ्या गाड्या एक-दोन असत्या तर काहीच म्हणणे नव्हते, परंतु या गाड्यांची संख्या तब्बल 10च्या आसपास असल्याचे समजते. उत्तरेतून येणाऱ्या या गाडयांना आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु त्यांच्यासाठी चाकरमान्यांनी दररोज प्रचंड त्रासातून का जावे? या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेत्यांनी जनतेला द्यायलाच हवे. ‘A public, unified and integrated railway hardly controversial’ हे सर्वच राजकीय पक्षांनी व त्यातल्यात्यात सत्तारूढ पक्षाने विशेष लक्षात ठेवले पाहिजे. म्हणूनच लोकलगाड्यांच्या वेळापत्रकाची किमान अंमलबजावणी तरी सुरु करा, रेल्वेची समस्या आपोआप कमी होत जाईल.
छायाचित्रः वसंत प्रभू