Homeमाय व्हॉईसशिंदेंना गद्दार म्हणणारे...

शिंदेंना गद्दार म्हणणारे कुणाल कामरा कोण?

स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा यांच्या राजकीय विडंबनामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या कुणाल कामरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता राजकीय विडंबन केले आहे. शिंदे यांच्या शिवसैनिकांनी कुणाल कामरा यांचा शो जेथे रेकॉर्ड केला होता त्या स्टुडिओची नासधूस केली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना थंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपली आक्रमकता दाखवली आहे. गेली अडीच वर्षे सत्तेत नसताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने कोणतेही आक्रमक आंदोलन केले नाही. कुणाल कामरा यांची कॉमेडी योग्य की शिवसैनिकांची तोडफोड योग्य, हा विषय बाजूला ठेवला तरी शिंदे यांची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करीत आहे हे यानिमित्ताने सिद्ध झाले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून अडीच वर्षे उलटले तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मनातला राग जात नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी किंवा ठाकरे कुटुंबियांनी शिंदे यांचा उल्लेख वारंवार गद्दार म्हणून केला असला तरी एक विडंबनकार म्हणून कुणाल कामरा यांना शिंदेंना गद्दार म्हणण्याचा काडीमात्र अधिकार नाही. कामरांनी शिंदे यांच्यावर नाव न घेता विडंबनात्मक काव्य केले असले तरी हे एकनाथ शिंदे यांच्याच संदर्भात आहे हे स्पष्ट दिसत आहे.

कामरा

कुणाल कामरांच्या या शोचे चित्रिकरण ज्या हॅबिटॅट स्टुडिओत झाले तेथे शिंदे यांच्या शिवसैनिकांनी तोडफोड केली. एका बाजूला संविधानाची प्रत दाखवायची आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्याचा स्वैराचार करायचा हे कलाकाराचे लक्षण नाही. कुणाल कामरांचा वादग्रस्त व्हिडिओ शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरवर टाकला आहे. त्याचबरोबर तोडफोड झाल्यानंतर या व्हिडिओची बऱ्यापैकी चर्चा झाली. आज राजकारणातील अनेक प्रसंगावर विडंबन करण्याची संधी असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वैयक्तिक टार्गेट करणे एखाद्या कलाकाराला शोभादायक नाही. हा व्हिडिओ पाहिला असता एकनाथ शिंदे यांच्यावरील हे विडंबनात्मक काव्य कुणाची तरी सुपारी घेऊन केले असावे यामध्ये तीळमात्र शंका नाही.

कामरा

एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्य केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गोटात आनंद आहे. मात्र हाच प्रसंग तुमच्यावर ओढवला असता तर काय प्रतिक्रिया असती याचासुद्धा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सेनेने विचार करायला हवा. एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकानी तोडफोड केल्यानंतर पूर्ण महाविकास आघाडी कुणाल कामरांच्या पाठीशी उभी राहिली. परंतु यास विरोधात विरोध करणे असे म्हणता येईल. कामरांनी या व्हिडिओत सरळसरळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांचा अपमान केल्याचे दिसून येते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेनाप्रमुखांवर किंवा शिवसेना पक्षावर टीका करणाऱ्या सर्वांनाच शिवसैनिकांचा प्रसाद मिळाला आहे. यापैकी शिवसैनिकांचा मार खाणारे निखिल वागळे यांनाही या प्रकरणात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचा पुळका आला आहे. त्यांनीही कुणाल कामरा आणि शिवसेनेचे समर्थन करणारे व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

कामरा

मुळात एकनाथ शिंदे यांनी फार धारिष्ट्याने शिवसेनेतून बाहेर पडून मूळ पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि तो भाजपच्या मदतीने यशस्वीही झाला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत ते जेवढे आमदार घेऊन गेले त्यापेक्षा जास्त आमदार निवडून आणण्यात यशस्वी ठरले. आता पराभव मान्य करून चोख विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याऐवजी एखाद्या नेत्याचा सारखा गद्दार.. गद्दार.. असा उल्लेख करणे किती दिवस चालणार आहे? आता यामध्ये सामील होणाऱ्या राजकारणाबाहेरील मंडळींना शिवसैनिकांचा प्रसाद मिळाला तर त्यामध्ये वावगे काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. त्यांनी शिवसेना आणि त्यांच्या शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोडीचे समर्थन केले नसले तरी त्यांनी कुणाल कामरा आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या पक्षांवर टीका केली आहे. जे सुपारी घेऊन टीका करतात त्यांना धडा शिकवला पाहिजे असे फडणवीस यांचे म्हणणे आहे.

कामरा

कुणाल कामरांनी माफी मागावी अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे. आपण माफी मागणार नाही अशी हेकेखोर भूमिका कुणाल कामरांनी घेतली आहे. मात्र कामरा यांना कारवाईचा प्रसाद मिळेल त्यावेळेला हे राजकीय पक्ष त्यांच्या पाठीशी अजिबात उभे राहणार नाहीत. मुळात कामरा यांच्या पाठीशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी उभे राहणे समजू शकतो. परंतु कामराही मराठी नाहीत आणि त्यांचा प्रेक्षकवर्गही मराठी नाही. अशा कामरांच्या पाठीशी उभे राहण्यात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला काय राजकीय फायदा मिळणार आहे हे तेच जाणोत.

संपर्कः 9820355612

Continue reading

ठाकरे ब्रँडला धूळ चारत शशांक राव निघाले ‘डार्क हॉर्स’!

बेस्ट कामगारांच्या सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत प्रथमच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. बेस्टची ही क्रेडिट सोसायटी ताब्यात घेण्यासाठी तब्बल चार पॅनल रिंगणात उतरले होते. ठाकरे बंधूंचा पराभव करण्यासाठी महायुती सरकारचे भक्कम...

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधी रश्मी वहिनींचाही झाला दिल्ली दौरा?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी नुकतेच एकाचवेळी दिल्ली दौरे केले. उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी तर एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह...

उद्धव ठाकरेंचा भाजपकडे काणाडोळा!!

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडणे अपेक्षित असते. परंतु सर्वाधिक आमदार आणि मंत्री असलेला भारतीय जनता पक्ष यावेळी आनंदात होता. विशेष म्हणजे भाजपच्या एकाही मंत्र्यांवर एकही आरोप या अधिवेशनात झाला नाही. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषीमंत्री...
Skip to content