मुंबईत झालेल्या २६ / ११चा मास्टरमाईंड तव्वहूर राणा सध्या एनआयएच्या ताब्यात असून साधारण १२ वाजल्यापासून त्याच्या चौकशीला सुरूवात होईल. या चौकशीत राणाचा पाकिस्तानमधला बोलविता धनी कोण, त्याला पैसा पुरवणारा कोण तसेच त्याचे भारतातले जाळे शोधून काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे समजते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर आणि कोर्टकचेऱ्यांचा मार्ग खंडित झाल्यानंतर काल तव्वहूर राणाचे भारताकडे प्रत्यार्पण झाले. अमेरिकेच्या बुखारेस्टमधून दिल्लीत आणण्यात आलेला राणा सध्या एनआयएच्या ताब्यात आहे. काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्याला एनआयएच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी राणाला चौकशीसाठी २० दिवसांची पोलीस कोठडी मागितली. परंतु दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पाहता न्यायालयाने राणाला १८ दिवस एनआयएच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कोठडीत रवाना होण्यापूर्वी तसेच १८ दिवसांनंतर कोठडीतून बाहेर पडताना त्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करावी, तसेच त्याला काही आजारपण असल्यास त्यावर योग्य ते उपचार केले जावेत, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास राणाची न्यायालयाकडून कोठडीकडे रवानगी करण्यात आली.

तव्वहूर राणाला एनआयएच्या दिल्लीतल्या मुख्यालयात तिसऱ्या मजल्यावर १४x१४ फुटांच्या खोलीत ठेवण्यात आले आहे. तेथे २४ तास सीसीटिव्हीची निगराणी असणार आहे. आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास राणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांची बैठक होईल. या बैठकीनंतर उपमहानिरीक्षक जया रॉय यांच्या नेतृत्त्वाखाली १२ अधिकाऱ्यांचे पथक राणाच्या चौकशीला सुरूवात करेल. चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी १००हून जास्त प्रश्नांची यादी तयार केली आहे. या प्रश्नांची तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या उपप्रश्नांची सरबत्ती राणावर केली जाईल. रॉ, आयबी, महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र एटीएस अशा दहाहून अधिक तपासयंत्रणांना तव्वहूर राणा चौकशीसाठी ताब्यात हवा आहे. त्यांच्याकडे त्याला सोपविण्यापूर्वी एनआयएचे अधिकारी त्याच्याकडून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राणाला ज्या इमारतीत ठेवण्यात आले आहे. त्याच्या चारही बाजूंचे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. संपूर्ण इमारतीला सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस, आयटीबीपी, अशा विविध निमसुरक्षा दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या लष्करात काही काळ काम करणारा राणा कॅनडाचा रहिवासी आहे. डेव्हिड हेडली याच्याबरोबर त्याने मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे प्लॅनिंग केले होते, असा आरोप आहे. त्याचे आयएसआय, या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेबरोबर काय संबंध आहेत, लष्कर-ए-तय्यबाबरोबरचे, त्याचा प्रमुख हाफिज सईद याच्याबरोबर त्याचे काय संबंध आहेत, ८ ते २१ नोव्हेंबर २००८ या काळात तो भारतात कशासाठी आला होता, भारतात तो कोणा-कोणाला भेटला, मुंबईत त्याचे जाळे कसे विणले गेले, दहशतवादी हल्ल्याच्या प्लॅनिंगमध्ये आणखी कोमकोण सहभागी होते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राणाकडून मिळवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.