पिक्चरने धुवांधार “सुपर डुपर हिट” यश मिळवू देत अथवा त्याला चित्रपटरसिकांनी नाकारु देत (चित्रपटसृष्टीच्या भाषेत सुपर फ्लाॅप) त्यावर विचारमंथन (आत्मपरीक्षण) करण्याची खरंच काही गरज आहे का? एक विशेष उदाहरण सांगतो, देव आनंद कुठेही असला तरी तो देव आनंद असे. मग तो पाली हिलवरील झिगझॅक रोडवर असलेल्या आपल्या आनंद रेकाॅर्डिग स्टुडिओत असो वा जुहू येथील सन ॲण्ड सॅण्ड, या पंचतारांकित हॉटेलमधील आपल्या चित्रपटाच्या पार्टीत असो, आपण देव आनंद आहोत हे तो विसरत नसे. वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओ त्याचा फेवरेट (आजही हा स्टुडिओ कार्यरत आहे, बरं का?). आपल्या नवीन चित्रपटाचा मुहूर्त याच मेहबूब स्टुडिओत करणं आणि तेव्हा आम्हा चित्रपट पत्रकारांना आवर्जून आमंत्रित करणे ही त्याची हौसमौज. तेव्हा त्याचं ते प्रत्यक्षातही देव आनंद असणे अनुभवायला मिळे. त्याने अभिनित, निर्मित आणि दिग्दर्शित केलेला “इश्क इश्क इश्क” (१९७४) हा चित्रपट पडद्यावर आला तोच फ्लाॅप झाला आणि… तुम्हाला कल्पना नसेल, या धक्क्यातून सावरायला देव आनंदला फार काळ लागला नाही. तो हिरमुसला, आपली मेहनत वाया गेली असं त्याला वाटणं स्वाभाविक होतेच (तो देव आनंद असला तरी त्यालाही संवेदनशील मन होतेच.) पण काही क्षणांतच तो सावरला आणि चलो, नयी फिल्म शुरु करते है असे म्हणतच तो “देस परदेस”च्या निर्मितीच्या कामात गुंतला…

हा झाला फ्लॅशबॅक. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीने सोशल मीडियात एखाद्या चित्रपटावर लहानमोठी पोस्ट लिहिली की समजावे की चित्रपट यशस्वी वाटचाल करतोय. “धुरंदर”वर इतके नि असे लोक लिहिताहेत की या चित्रपटाची जवळपास सर्वच माध्यमांतील समीक्षा पूर्णपणे झाकली गेली आहे. पन्नास वर्षांपूर्वी जी. पी. सिप्पी निर्मित आणि रमेश सिप्पी दिग्दर्शित “शोले”च्या बाबतीत अगदी असेच झाले होते. तत्कालिक समिक्षकांना “शोले” फारच हिंसक चित्रपट वाटला. त्याची लोकप्रियता आजही कायम आहे. “धुरंदर”च्या बाबतीत आणखी एक गोष्ट, रहमान डकैतच्या बहुचर्चित भूमिकेतील अक्षय खन्नाच्या नृत्य स्टेप्सने इन्स्टाग्रामवर रिलच्या रुपात नवीन विक्रम ठरावा असा झपाटा लावलाय. मराठी मनोरंजन क्षेत्रातील नीलेश साबळे, भाऊ कदम, पल्लवी वैद्य यांसह जनसामान्यातील अनेकांनी तसं नाचकाम केले आणि भरपूर लाईक्स मिळवले. चित्रपटरसिक चित्रपट डोक्यावर घेतो तेव्हा तो केवळ पडद्यावर राहत नाही. तो सामाजिक सांस्कृतिक माध्यम या क्षेत्रात असा मुरत जातो.

“धुरंदर”च्या खणखणीत यशात आणखी एक घटक महत्त्वाचा ठरल्याची चर्चा होतेय. कोणती माहित्येय? चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीची सगळी भिस्त टीझर आणि ट्रेलर यावर ठेवली. ते कमालीचे इम्प्रेसिव्ह ठरतील यावर लक्ष केंद्रित केले आणि त्यात त्यांना यश प्राप्त झाले. चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला रे झाला की “मुलाखत वाटप सोहळा” आयोजित करा. भरभरून मुलाखतीतून या चित्रपटावर इतकं आणि असं सांगा की चित्रपट पाहयची गरज भासू नये. उपग्रह वाहिन्यांच्या कार्यालयात जाऊन एकेक तासाची मुलाखत द्या, वेगवेगळ्या शहरांतील माध्यम कार्यालयात जा, अनेक माॅलमध्ये इव्हेंटस करा, मनोरंजक इव्हेंटसमध्ये नृत्य अथवा किट्स करा. इतकी आणि अशी प्रचंड पूर्वप्रसिद्धी करुनही पहिल्या शुक्रवारी सकाळच्या खेळास ऑनलाईन बुकिंग नाही… असं काहीही न करताही “धुरंदर”, या चित्रपटाने लोकप्रियतेचे जणू वादळ निर्माण केले. चित्रपटरसिकांच्या सद्सद्विवेक बुद्धीवर त्यांनी विश्वास ठेवला आणि चित्रपट रसिकांच्या मनावर राज्य करतोय हे लक्षात येताच राकेश बेदी वगैरे काही कलाकार मीडियात दिसले. चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीत त्याचे पोस्टर डिझाईन, टीझर, ट्रेलर आणि काही वेगळ्या बातम्या या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे “धुरंदर”ने अधोरेखित केले. आणि एकदा का पब्लिकला चित्रपट आवडला रे आवडला की त्याचे सोशल मीडियात सर्चिंग वाढते. त्याला आज महत्त्व आहे. जे आपल्याच चित्रपटावर आपणच तेचतेच बोलून बोलून जे साध्य होत नाही ते अशा पद्धतीने होते. आज आपण लाऊडस्पीकरच्या युगात नाही, डिजिटल युगात आहोत. आजच्या युवा पिढीला जगभरातील अनेक देशांमध्ये अनेक गोष्टीत काय काय घडतंय, चाललंय याची कल्पना असते. त्यांना गृहित धरून नवीन चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी करत राहाल तर आजूबाजूच्या जगात बराच बदल झाला आहे याची आपणास कदाचित कल्पना नसावी. “धुरंदर”च्या खणखणीत यशात त्याच्या पूर्वप्रसिद्धीचे चातुर्य आहे हे आता लक्षात येत चाललंय… नेटीझमचा जमाना आहे. सगळा खेळ त्यावर रंगला तर मल्टीप्लेक्समध्ये गर्दी वाढत वाढत जाईल!

