महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, तरुण बेरोजगारीने त्रस्त आहे, महागाईने जनतेला जगणे कठीण झाले आहे. पण सत्ताधारी भाजपाला त्याचे काहीही देणेघेणे नाही. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मकाऊ येथे जुगार खेळत असल्याचे फोटो मीडिया व सोशल मीडियात दिसत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बावनकुळे जुगार खेळत असल्याचा फोटो ट्विट केला आहे. हा फोटो खरा आहे का? बावनकुळे जुगार खेळत होते का? आणि जुगार खेळण्यासाठी बावनकुळे यांच्याकडे कोट्यवधी रुपये आले कोठून? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज माध्यमांशी बोलताना केली.
हॉटेलमध्ये रेस्टॉरंट व कॅसिनो एकाच ठिकाणी
त्याचवेळी बावनकुळे यांनी मात्र यावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटूंब मुक्कामी होतो त्या हॉटेलच्या तळमजल्यावर रेस्टॉरंट आणि कॅसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबियांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे.
शासन आपल्या दारी ही ‘महानौटंकी’...
भाजपाचे तिघाडी सरकार काँग्रेस सरकारच्याच योजना शासन आपल्या दारी म्हणून राबवत आहे. ही योजना म्हणजे महानौटंकी आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. एका कार्यक्रमाला तीन ते चार कोटी रुपये खर्च गेले जातात व ते पैसे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च केला जात आहेत. शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे कंत्राट ठाण्यातील एका व्यक्तीला दिले आहे. जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी थांबवली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली.
मोदी जेथे जातात तेथे पराभव अटळ…
वन डे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील पराभवाच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, नरेंद्र मोदी व भाजपा हे इव्हेंटबाजी करण्यात व श्रेय घेण्यात पटाईत आहेत. वन डे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यालाही मोदी स्वतःच्या नावाच्या स्टेडियममध्ये गेले आणि वर्ल्ड कपमधील सर्व सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा अंतिम सामन्यात मात्र पराभव झाला. भारतीय संघ जिंकला असता तर त्याचे श्रेय मात्र मोदी व भाजपाने घेतले असते. पण मोदी जेथे जातात तेथे पराभव होतो, त्यांना नशीब व प्रभू रामही साथ देत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
समाजा-समाजात आग लावण्याचे सरकारचे षडयंत्र
महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता भीषण आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनता दुष्काळ व महागाईत होरपळून निघाली आहे. महागाई व दुष्काळामुळे शेतकरी, कष्टकरी तसेच महिला व बेरोजगार तरुणांच्या आत्महत्त्या वाढत आहेत. परंतु राज्यातील तिघाडी सरकारी त्याकडे लक्ष देत नाही. जनतेच्या ज्वलंत प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सरकार जाणीवपूर्वक मराठा व ओबीसी समाजात वाद निर्माण करत आहे. राज्यातील अशांततेला एक-दोन मंत्री नाहीतर सर्व सरकारच जबाबदार असून महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजात आग लावून सरकार मजा पाहत आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.
राज्यपाल महोदयांनी या प्रकरणी हस्तक्षेप केला पाहिजे. आरक्षणाच्या वादात महाराष्ट्र जळता ठेवण्याचे पाप भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. २०१४ साली भाजपा व फडणवीस यांनीच आरक्षणाचे आश्वासन देऊन सत्ता मिळवली व मागील ९ वर्षांत भाजपाने कोणत्याच समाजाला आरक्षण दिले नाही. आरक्षणाच्या नावाखाली समाजा-समाजात भांडणे लावण्याचे काम केले आहे. काँग्रेस जर राज्यात व केंद्रात सत्तेत आला तर आरक्षण प्रश्नावर मार्ग काढू. आरक्षण प्रश्नावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधी यांनी ती जाहीरपणे मांडलेली आहे. जातनिहाय जनगणना करणे व ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवली पाहिजे आणि काँग्रेस पक्षाचे सरकार आल्यास त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.