नाशिकमध्ये अशोक खरात या स्वयंघोषित ‘तांत्रिक’ व्यक्तीने अनेक महिलांवर बलात्कार केल्याचे, त्यांची मानसिक-आर्थिक लूट केल्याचे प्रकरण उघडकीस आले तेव्हा पहिला प्रश्न अनेकांच्या मनात आला, तो हा- “या बायका शिकलेल्या नव्हत्या का? त्यांना कळले नाही का?” पण हा प्रश्न जितका साधा वाटतो, तितका तो साधा नाही. कारण खरातच्या जाळ्यात अडकलेल्यांमध्ये केवळ अशिक्षित, भाबड्या महिला नव्हत्या, तर सुशिक्षित, नोकरदार, समाजात प्रतिष्ठित अशा स्त्री-पुरुषांचाही समावेश होता. हे वास्तव आपल्याला एका अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नाकडे घेऊन जाते- शिक्षण घेतलेला, जगाचा अनुभव असलेला, विचार करण्याची क्षमता असलेला माणूस भोंदूच्या जाळ्यात का आणि कसा अडकतो? त्याचा विवेक जातो कुठे? त्याची विचारशक्ती गोठते का? आणि सर्वात महत्त्वाचे- हे रोखता येऊ शकते का?
अशोक खरातसारखे भोंदू हे उपजत चलाख असतात, यात शंका नाही. पण त्यांची खरी शक्ती त्यांच्या ‘जादू’मध्ये नसते, ती असते माणसाच्या आतल्या भीतीत, असुरक्षिततेत आणि अनुत्तरित प्रश्नांच्या पोकळीत. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा तो हतबल असतो. मुलाचे करिअर, आजारपण, लग्न जुळत नाही, नोकरी जातेय, व्यवसाय बुडतोय, कुटुंबात कलह, या परिस्थितीत माणूस आतून मोडलेला असतो. तर्कशास्त्र नव्हे, तर तातडीचा दिलासा हवा असतो त्याला, आणि नेमक्या याच क्षणाची वाट पाहत असतो भोंदू. तो समस्या सोडवण्याचे आश्वासन देत नाही, तो “सगळं ठीक होईल” हे ऐकण्याची तीव्र भूक भागवतो. माणूस तेव्हा डॉक्टर, वकील यांचे तर्कशुद्ध उत्तर नाकारतो आणि तांत्रिकाची जादुई भाषा स्वीकारतो, कारण तर्क थंड असतो, पण भोंदूचे बोलणे उबदार असते. मानसशास्त्रात याला ‘डेस्परिट कॉग्निशन’ म्हणतात. माणूस अत्यंत तणावात असताना त्याच्या मेंदूतील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, जो तर्क, विश्लेषण आणि विवेक यांचे केंद्र आहे, तो मागे सरतो आणि भावनिक प्रतिसाद देणारा अमिग्डाला पुढे येतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, संकटात माणूस विचार नाही, तर भावनेने निर्णय घेतो आणि भोंदू हेच नेमके ओळखतो.
शिक्षण म्हणजे विवेक नव्हे- हा घातक गैरसमज
“पण हे सुशिक्षित लोक होते ना?”- हा प्रश्न विचारताना आपण एक मूलभूत चूक करतो. आपण शिक्षण आणि विवेक यांना समानार्थी मानतो. पण ते समानार्थी नाहीत. शिक्षण म्हणजे माहितीचा संचय. विवेक म्हणजे त्या माहितीचा योग्यवेळी, योग्यप्रकारे उपयोग करण्याची क्षमता. आणि हा विवेक, क्रिटिकल थिंकिंग हे शाळा-महाविद्यालयांत शिकवले जात नाही. एखादा माणूस इंजिनीअर असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, पण त्याला “हा माझ्याशी खोटे बोलतोय का?”, “यामागे काय हेतू असेल?”, “पुरावा काय आहे?” हे प्रश्न विचारण्याची सवय नसेल, तर त्याच्या पदव्या त्याला भोंदूपासून वाचवत नाहीत.
भारतीय शिक्षणव्यवस्था आणि विशेषतः आपली- प्रश्न विचारण्याला नव्हे, तर उत्तरे पाठ करण्याला प्राधान्य देते. “गुरू म्हणतो ते खरे” ही मानसिकता वर्गखोलीत रुजते आणि आयुष्यभर टिकते. मग ‘तांत्रिक’ किंवा ‘बाबा’ किंवा ‘गुरुजी’ म्हणवून घेणाऱ्या भोंदूसमोरही हीच मानसिकता काम करते- “हे सांगतात ते खरेच असेल.” शिक्षणाने माहिती दिली, पण संशय घेण्याचे धाडस दिले नाही. परीक्षेत गुण मिळवण्यासाठी जे शिकलो, ते जगण्यासाठी किती उपयोगी पडते- हा प्रश्न कधी विचारलाच गेला नाही.

भोंदूचे मानसशास्त्र- एक क्रमबद्ध सापळा
खरातसारखे भोंदू हे उत्स्फूर्तपणे काम करत नाहीत. ते एक सुनियोजित मनोवैज्ञानिक सापळा रचतात, ज्याचे टप्पे अत्यंत ठरलेले असतात.
पहिला टप्पा असतो- विश्वासार्हता निर्माण करणे. भोंदू सुरुवातीला कधीही पैशांची मागणी करत नाही. तो आधी “ओळखतो”- तुमच्या आयुष्यातील एखादी समस्या, एखादी वेदना अचूक बोलतो. हे तो आधीच्या माहितीतून, सोशल मीडियावरून किंवा मध्यस्थांकडून मिळवलेले असते. पण बळीला वाटते- “याला कसे कळले? हा खरोखर विशेष असावा.”
दुसरा टप्पा- भावनिक अवलंबित्व निर्माण करणे. एकदा विश्वास बसला की, भोंदू स्वतःला अपरिहार्य बनवतो. “माझ्याशिवाय तुमचे काम होणार नाही”, “हे फक्त मलाच जमते” असे सांगत तो पीडिताला मानसिकदृष्ट्या परावलंबी बनवतो. माणूस स्वतःच्या निर्णयक्षमतेवरचा विश्वास गमावतो आणि भोंदूवर विसंबू लागतो.
तिसरा टप्पा- एकांत आणि गोपनीयता. “हे कुणाला सांगू नका, अन्यथा उपाय चालणार नाही” – हे वाक्य भोंदूच्या व्यवसायाचे सर्वात महत्त्वाचे शस्त्र आहे. एकट्या पडलेल्या माणसावर नियंत्रण ठेवणे सोपे असते. कुटुंबापासून, मित्रांपासून तुटलेला माणूस भोंदूच्या वाटेव्यतिरिक्त दुसरा मार्ग पाहू शकत नाही.
चौथा आणि सर्वात भयंकर टप्पा- शरीर, पैसा आणि मन यांचे शोषण. हे सगळे एकट्याने नाही, तर हळूहळू, एकापाठोपाठ होते आणि प्रत्येक टप्प्यावर पीडिताला वाटत असते की, “मी स्वतःहून यात आलो आहे.” हीच भोंदूची सर्वात मोठी करामत असते- पीडिताला स्वतःला गुन्हेगार वाटायला लावणे.
‘लाज’ हे भोंदूचे संरक्षणकवच
खरात प्रकरणात आणखी एक भयाण वास्तव समोर आले- अनेक पीडितांनी वर्षानुवर्षे तोंड उघडले नाही. का? लाजेमुळे. “लोक काय म्हणतील?”, “माझ्यावर कुणी विश्वास ठेवेल का?”, “मीच मूर्ख ठरेन” – या भीतीने अनेक बळी वर्षानुवर्षे एकट्याने नरक भोगत राहिले. आणि त्या गुप्ततेचा सर्वाधिक फायदा भोंदूला होतो. तो आणखी नव्या सावजाकडे निर्भयपणे वळतो. ही लाज समाजाने पेरलेली आहे. “तू सुशिक्षित असून फसलास” हे वाक्य माणसाला आतून इतके पोखरते की, तो न्याय मागण्याऐवजी स्वतःलाच दोष देत बसतो. यातच भोंदूचे खरे बळ दडलेले आहे. तो कायद्याला इतका घाबरत नाही, कारण, त्याला माहीत असते की पीडित बोलणार नाही.
विवेक जागृत ठेवणे- एक सामाजिक जबाबदारी
या सगळ्यावर उपाय काय? तर तो केवळ कायदेशीर नाही. तो सांस्कृतिक आणि शैक्षणिक आहे. शाळांमध्ये क्रिटिकल थिंकींग, मीडिया लिटरसी आणि प्रश्न विचारण्याची सवय रुजवणे, ही काळाची गरज आहे. “का?” हा प्रश्न विचारणे म्हणजे अनादर नाही, हे मुलांना शिकवावे लागेल. कुटुंबात मोकळ्या संवादाची संस्कृती असणे आवश्यक आहे, ज्यात माणूस फसल्यावर लाजेने नाही, तर विश्वासाने बोलू शकेल. “मी चुकलो” हे सांगणे कमकुवतपणाचे नाही, हे धाडसाचे आहे, हे समाजाने स्वीकारले पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचे, भोंदू उघड झाला की “बळी मूर्ख होते” असे न म्हणता, “या व्यवस्थेने त्यांना असुरक्षित सोडले होते” हे ओळखण्याची समज समाजाला यायला हवी. खरात एकट्याने इतका मोठा होऊ शकला नाही. त्याला मूकसाक्षीदारांची, व्यवस्थेच्या निष्क्रियतेची आणि समाजाच्या उदासीनतेची साथ मिळाली. अशोक खरात तुरुंगात जाईल. पण प्रश्न आहे तो माणसाच्या आतल्या असुरक्षिततेचा, शिक्षणाने न दिलेल्या विवेकाचा आणि बोलण्याची हिंमत नसल्याचा. जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरे आपण शोधत नाही, तोपर्यंत अनेक ‘खरात’ तुरुंगात जात राहतील, पण ‘खरात’ संपणार नाहीत!
(लेखक गार्गी नितीन सावंत, पुण्याच्या वेलिंग्डन कॉलेज इंटरनॅशनल स्कूलमधल्या मानसशास्त्रज्ञ आहेत.)

